बुलढाणा जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
बुलढाणा ( शालेय वृत्तसेवा ) :
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत काही शिक्षकांनी दिव्यांग असल्याचे बोगस प्रमाणपत्र सादर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
हे प्रकरण शिक्षण विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर, संबंधित शिक्षक विभागाच्या रडारवर आले असून, दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा शिक्षणाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.
सध्या सुरू असलेल्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत शिक्षक आपल्या सोयीच्या ठिकाणी बदली मिळवण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करत आहेत.
वैधतेसाठी संबंधित विभागांशी समन्वय :
या पार्श्वभूमीवर काही शिक्षकांनी वैद्यकीयदृष्ट्या अपात्र असतानाही दिव्यांग प्रमाणपत्र जोडल्याचे आढळून आले आहे. शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली असून, अशा बोगस प्रमाणपत्रांची वैधता तपासण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधण्यात येत आहे. प्रमाणपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधित शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाईचा इशारा दिला आहे.
शिक्षणाधिकारी बीडीओना दिले पत्र :
जे शिक्षक खोट्या व बनावट कागदपत्राच्या आधारे संवर्ग १ वा इतर संवर्गाचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आल्यास कठोर प्रशासकीय कारवाई केली जाईल. याची जाणीव सर्व संबंधितांना आपले स्तरावरून करून देण्यात यावी, असे पत्र शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांनी १३ पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे.
दिव्यांगाची जे. जे. हॉस्पिटल येथे होणार पुनर्तपासणी :
संवर्ग १ चा लाभ घेणारे दिव्यांग कर्मचारी / पाल्याची / जोडीदारांची जे. जे. हॉस्पिटल, मुंबई येथून पुनर्तपासणी करून प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे त्यामुळे, बोगस प्रमाणपत्रावर दिव्यांगाचा लाभ घेणाऱ्या शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .