" बाप कळला का कुणा ?
कुणीतरी सांगा मला
भासे नारळ वरून
गोड गरे तो आतला !"
बाप अशी प्रतिमा आहे की, त्याला कुणालाही सहजासहजी पारखता येत नाही. बापाचं भावविश्व खुप विशाल आहे . बापाविषयी प्रत्येकांच्या वेगवेगळ्या भावना/कल्पना असतील, पण मला जो कळला तो बाप असा आहे . सुख ओरबाडणा-या सकल संकटापासून घराचं रक्षण करणारं छत असतो बाप, विद्रुप संस्कृतीचंं प्रदुषण व नराधमाच्या नजरा रोखणारा घराचा दरवाजा असतो बाप, चोहोबाजूंनी वादळाने घेरलेल्या जीवनसागरात ताठपणे उभं असलेलं बेट असतो बाप, दुःखातही हसणारा व इतरांना हसविणारा विदुषक असतो बाप, अशक्तांचा सशक्त पाय, अंधारात प्रकाशझोत , मुलांच्या भविष्याचा शिल्पकार असतो बाप. बाप आयुष्यात विविध भूमीका जगणारा उत्तम नट असतो, दुर्जनांसाठी साप असतो, बिघडलेल्यांसाठी चाप असतो, भल्यासाठी अमाप असतो, करुणेनं भरलेलं माप असतो आणि बापाचाही बाप असतो बाप, कसाही असो, कुणाचाही असो , बाप हा न उलगडणारं कोडं असतो , बाप हा शेवटी बाप असतो .
स्त्री- पुरुष ही संसाररुपी रथाची दोन चाके . या संसारवेलीवर फुले उमलली की तेच आई-बाप होतात. आयुष्याचा खरा प्रवास येथूनच सुरू होतो . एकेक वळण पार करतांना जिवनाची खरी कसोटी लागते . या परिक्षेनंतर जेव्हा मुलं आई-बापाचा कृतज्ञतापूर्वक स्विकार करतात, तेव्हा त्यांना जगण्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतं . या प्रवासात कुणाला आई तर कुणाला बाबा, किंवा दोघेही जवळचे वाटतात. आईवर अनेक रचना आल्या आहेत, येत आहेत. कारण आई ही असतेच तशी . ती प्रत्येक मुला-मुलीना आपल्या जवळची व्यक्ती वाटत असते .आईला ब-याच रचनाकारांनी अनेक उपमांनी प्रस्तुत केले आहे . बालपणी मुल हे आईच्या अधीक जवळ असतात, ती त्याला माया लावते, प्रेम देते, हवं नको ते पुरविते, ममता, करुणा देऊन संगोपण करते. एवढच नव्हे तर ते मुल नऊ महिने तिच्या गर्भात असते, तेथे त्याला सुरक्षीतता जाणवते. त्याचेवर संस्कारही होत असतात .त्यामुळे कदाचित आई ही बाळाला अधिक जवळची वाटत असावी . पण काही मुलं-मुली दोहोवरही सारखेच प्रेम करतांना दिसतात. बाप हा कामानिमित्ताने अधिक काळ घराच्या बाहेर असल्यामुळे किंवा बापाचा मुलांशी संवाद कमी होत असल्याने लहान मुलांना बाप खुप जवळची व्यक्ती वाटत नसावी . याची प्रचिती अलीकडे नोकरीत असणा-या आई-वडील दोघांविषयी मुलांना येत असावी .
कवी, लेखक, संपादक प्रभाकर पवार यांनी वेगवेगळे काम करणारा , विशेषतः ग्रामीण भागातील बाप या संकल्पनेतून महाराष्ट्रातील 93 कवी-कवयित्रींना घेऊन ' बाप ' नावाचा एक प्रतिनिधिक कवितासंग्रह प्रकाशीत केला आहे . यात गौपाशा शेख व डाँ. चंदू पवार यांचे विशेष सहकार्य दिसते. दादासाहेब जगदाळे यांच्या तेजश्री प्रकाशन, कोल्हापूर यांनी प्रकाशीत केलेल्या कवितासंग्रहाची प्रस्तावना डाँ. शीतल शिवराज मालुसरे यांनी समर्पकपणे लिहिलेली आहे . किशोर माणकापुरे यांच्या मुखपृष्ठात एक संदेश दिसतो, तो असा की, ग्रामीण भागातील आजोबाच्या खांद्यावर शहरी मुलगी(नात) बसलेली दिसते. यातून शहरी मुलांच्या मनात ग्रामीण भागात राहणा-या आपल्या आप्तेष्ठांच्या नात्यांची नाळ जोडून राहावी, असा आशय असावा .
या कवितासंग्रहात कवि-कवियित्रींनी आपापल्या रचनांतून बाप या प्रतिमेविषयी वेगवेगळ्या भूमिकेतून किंवा स्वतःच्या वडीलाचं जगणं वर्णनातून साकारलं असावं . मग तो शेतकरी बाप असेल, व्यावसायीक बाप असेल, शिक्षक बाप असेल, रीक्षा, मालवाहू गाडी लोटणारा बाप असेल, हमालीचं काम करणारा बाप असेल, लोहाराचं काम करणारा असेल, कृषितज्ञ बाप असेल, उसतोड कामगार बाप असेल,गोदामात काम करणारा बाप असेल, रंगारी काम करणारा बाप असेल,दुकानदार बाप असेल, गवंडी काम करणारा बाप असेल किंवा पैलवान बाप असेल. बाप ही प्रतिमा शब्दात न सामावणारी आहे . त्याचं काळीज व कष्ट शब्दबद्ध करणं म्हणजे तारेवरची कसरत आहे . बापाविषयी कुणाला काय वाटतं ? याबद्दल भरभरून लिहिल्या गेलं . त्यापैकी काही रचनांचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे . प्रा.सुनंदा पाटील यांना 'बाप जळती मशाल' वाटतो...
" मंद उजेड देणारी आई असते पणती
संकटांच्या अंधारात बाप मशाल जळती "
बाप हा सतत आपल्या कुटुंबासाठी मशालीसारखा तेवत असतो .तर डाँ.शैलजा करोडे यांच्या रचनेतून लेकीच्या पंखात बळ देणारा आणि डोळ्यात स्वप्नं पेरणारा बाप अधोरेखीत होतांना दिसतो . सौ.सुलभा कुळकर्णी यांना 'कृषिवल' रचनेत बापाचे आयुष्य म्हणजे ज्वलंत कथा आणि न संपणारी व्यथा वाटते . तर कृष्णा हरले हे बापाची महती व-हाडी बोलीतून मांडतात . संगीता देवगडे म्हणतात , "बाप हा ऊन ,पाऊस ,वादळ ,वा-यात हक्काचा आशियाना असतो" .सौ.राणी दबडे यांच्या रचनेतील बाप "धनवान नसला तरी त्याला गावात मान होता ". अशोक गायकवाड म्हणतात साधाभोळा असो पण बाप असला पाहिजे लेकराला .डाँ.चंदू पवार यांनी वर्णनीत केलेला 'शेतकरी बाप' हा अतिशय विश्वासू असल्याचे अधोरेखीत होते.
" काळ्या मातीच्या गर्भात,कष्टाच्या घामाची
कमाई ठेवून ,खुल्या आभाळाला, राखणीला ठेवतो बाप अगदी पूर्ण विश्वासाने ."
गावातील शेतकरी हा साधाभोळा असतो, तो कुणालाही भुलतो किंवा त्याचे पिकाचे शेत 'जागल' न करता विश्वासाने सोडून देतो.
सौ.मनीषा ताम्हणे यांना आपले वडील "कडक शिस्तीचे, दरारा असलेले पण हळव्या मनाचे " वाटतात . विजय सावंत यांच्या मते बाप वटवृक्षाची छाया असतो , तर प्रा.व्यंकटेश सोळंके यांनी वर्णन केलेला शेतकरी बाप हा कर्जाच्या बाजारात सुलतानीने लुटलेला जाणवतो . हे वास्तव आहे येथील शेतक-याच्या जिवनातील. प्रशांत ढोले यांना "बाप हा आपल्या कष्टाचंच खात असतो ", असं वाटतय . कवयित्री शालिनी बेलसरे यांच्या रचनेतील 'दैवत' या व्यावसायीक भूमीकेतील बाप , जेव्हा व्यवसाय ठप्प होतो तेव्हा तो चिंतातूर व भयग्रस्त होऊन दिवसभर गप्प बसलेला दिसतो . सौ.कविता लोखंडे यांच्या रचनेत व्यसनाधीनतेने कुटुंबाची पर्वा नसलेला बाप दिसतो . मारुती पुनसे यांनी ताकदीने साकारलेल्या 'प्रतिमा' या रचनेतून राख झालेला चिरस्थायी स्मरणातला बाप जाणवतो .
" भिंतीवर खिळलेला बाप प्रतिमाच नसून
प्रेरणा, प्रेरक असतो घरासाठी !
अंकुरल्या बिजाचा सूत्रधार अन् रक्ताचा
मुळाधार असतो बाप !"
कवी पुनसे यांनी विविध भूमीका जगणारा बाप सिकारला आहे . रविंद्र देशमुख यांचा 'रक्तातला बाप' यात " तो आभाळ की सूर्य ? असा प्रशनच उपस्थित केला आहे.
डाँ. विवेक कानडे यांच्या रचनेत " लेकरांच्या शिक्षणासाठी दुस-याचे उंबरठे झिजविणारा बाप " दिसतो . तर सौ.वृंदा पंकज गंभीर यांनी 'मायाळू' या बोलीतील रचनेतून "आपल्या मुलीला शिक्षणासाठी आपल्यापासून दूर ठेवणारा धाडसी बाप साकारला आहे . मुलगी आपल्या काळजाचा तुकडा असतांनाही तिच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तो काही कठोर निर्णय घेतांना दिसतो . काळजावर दगड ठेऊन हे करू शकणाराही बापच असतो . अनील सपकाळ यांनी बापाचं महत्व आणि कर्तव्य विषद केलं आहे. सौ.मधुराणी बनसोड यांना बाप हा अलगच रसायन असल्याचे वाटते . उमेश साळुंकेंच्या रचनेतील बाप हा "दिसतो तसा नसतो , संकटांना एकटाच भेटत असतो ". तर पोर्णिमा शिंपी यांच्या रचनेतील बाप हा मुलीच्या व कुटुंबाच्या सुखासाठी रोजच लोटगाडी लोटत असतो, पै पै कमावत असतो . जयश्री चौधरी यांना बाप आधारवड वाटतो तर सुषमा पाखरे यांना आपले बाबा नीती, नियमाचे , संस्कारांचे खुले दालन व एक चालते बोलते विद्यापीठ वाटतात .
भानुदास धोत्रे यांचे वडील अडानी असले तरी नदीत सूर मारण्यात पटाईत होते.त्यांनी गावात कितीतरी चांगली कामगीरी केली आहे .पण प्रसिद्धीचे ते कधीच भुकेले नव्हते. आनंद घायवट यांच्या रचनेत ग्रामीण भागातील बाप ठिगळ लावलेले कपडे घालायचे पण संसारासाठी ईमाने ईतबारे राबायचे . डाँ. देवमन कामडी यांची बोलीतील रचना मनाला भावली .
" तुह्या नांगराचा फाया
चिरे धरणीची काया
आयुष्य गेले रे राबाया
जिंदगी आली रे नासाया !"
आयुष्यात राबताना शेतकरी घामाने व कष्टाने आपली शेती कसतो पण त्याचे आयुष्य राबण्यातच संपून जाते .काहीही उरत नाही , ही पोशींद्याची व्यवस्थेमुळे झालेली अवस्था आहे . बाप मुलांविषयी किती दूरचा विचार करतो , किती माफक स्वप्न असतात त्याची....प्रवीण देवरे यांच्या रचनेतील बाप आपल्या मुलीला म्हणतो , तू लवकर मोठी हो, नंतर मी तुझा विवाह गावातील एका महालात राहणा-या राजकुमाराशी लाऊन देईल . अमोल पाटील यांनी बोलीतून पोयीवाला बाबा साकारला तर डाँ. राजेंद्र केंगार यांनी स्टेथोस्कोपवाला बाप साकारला आहे . महादेव सुरवसे यांनी गावातील मोठ्या शेतक-याकडे साल मांडून वर्षभर काम करणारा 'सालगडी बाप' साकारला आहे .सुनील शेंडे यांनी विविध उपमा देत बाप साकारला आहे ..
" शेतीच्या कुरूक्षेत्रात राबराब राबून
उत्पन्नाचे स्तोत्र शोधणारा एकमेव यौद्धा
.....तो म्हणजे बाप !"
तो खूप राबतो पण जेव्हा त्याच्या मालाचा कवडीमोलात लिलाव होतो, तेव्हा त्या बापाने काय करावे ? असा बाप अरविंद कुलकर्णी यांनी साकारला आहे .डाँ.अनिल कुळकर्णीच्या मते बाप हा मुलाचा पहिला गुरू असतो . माधुरी चौधरी या आपल्या शिक्षक वडीलांच्या जिवनाचे वास्तव मांडतांना म्हणतात... शिक्षकांच्या निरंतर बदल्या होत असल्यामुळे आम्हाला गावोगाव फिरावं लागायचं .त्यांना मुलं घडवायची आवड होती . रमेश मोटे यांनी कुंभार बाप साकारलेला दिसतोय, जसे शिक्षक मुलांच्या जिवनालि आकार देत असतात तसाच कुंभार मातीला आकार देऊन अनेक जिवनोपयोगी वस्तू घडवीत असतो . त्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागते . पद्माकर अंबादे यांनी मुक्तछंदात आईबाप मांडलेत. काळजाच्या अंकुराच्या आयुष्यात उजेड पेरण्यासाठी आई आयुष्य जाळत असते , बाप अंगणातलं सूर्याचं झाड होऊन कुणाला काहीतरी देण्यासाठी निरंतर संघर्षरत असतो .तर किरण उपाध्ये यांनी बापाच्या भूमीकेतून आपल्या मुलाला स्वाभिमानी माणूस बणण्याचा सल्ला देणारा बाप रेखाटला आहे.
या कवितासंग्रहात समाविष्ट असलेल्या सर्वच रचनाकारांनी आपल्या वडीलांवर शब्द सुमनांचा मनमुराद वर्षाव केलेला दिसतोय.
ही एक दर्जेदार साहित्यकृती झालेली आहे. वाचनीय व संग्राह्य अशी ही साहित्यकृती सर्वांनाच आवडणारी असावी .संपादकांचा यशस्वी प्रयत्न म्हटल्यास वावगे ठरू नये . ते अनेक नवनवे प्रयोग करतांना दिसतात.
शेवटी बाप हा बाप असतो . शशांक देशमुख म्हणतात, "गरीब असो वा धनवान मोठा, विसरू नका रे अपुल्या बापाला!" तर बाबासाहेब कडू म्हणतात , "वखद पडला तर घरचे भांडेकुंडे ईकून पोराईले शिकवा, हे गाडगेबाबांचं वचन ज्यानं मनी बांधलं थो बाप !" डाँ शशिकांत गंगावने हे म्हणतात ख-या बापाचे ( बाबासाहेबांचे) दर्शन घडविले माझ्या बापाने .सौ.आशा जाधव यांच्या रचनेतील बाप "हाती थापी घेऊन गवंडीकाम करून लोकांची घरे बांधून निवारा देण्याचं महत्कार्य करतो". सौ.निलीमा नेहते यांनी रचनेत रंगारी बाप साकारलाय. " असा रंगारी बाप घर दुज्याचे रंगायतो, संसार बायकापोरायसंगं एका झोपडीत मांडतो !" तर तुषार पोपळकर यांनी गोदामात काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा बाप साकारलेला दिसतो .सौ.तनुजा महाजन यांनी आपल्या रचनेत 'हौसी' बापाची व्यथा मांडली आहे . ऊसतोड करण्यासाठी गावोगाव भटकून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करतो आणि निर्मिकाकडे विनंतीही करतो की मुलांच्या वाट्याला हे काम येऊ नये . सुनील खळदकर यांनी हमाल बापाची व्यथा मांडलीय . "ओझं दुनियेचं वाहताना त्याचे,रक्त जळते अन् गाळतो घाम ! " संजय गोडघाटे म्हणतात बाप जसा बालपणी मुलांचं बोट धरून आधार देतो तसंच मुलाने म्हातारपणाची बापाची काठी व्हावं . अशी विविध कामं करून तो आपल्या कुटुंबाची जबाबदारी निष्ठेने व कष्टाने वाहतो .
मलपृष्ठावर विराजमान असलेली अनुया काळे यांच्या 'प्रिय बाबा' या रचनेतील मुलगी बापाच्या निखळ प्रेमाची अपेक्षा करताना दिसते . यात गैर काहीच नाही. या संग्रहात मला वेगवेगळ्या भूमीका जगणारा बाप भेटला, मिळेल ते काम करून चार पैसे घरात आणणारा बाप दिसला, कुठे व्यसनांध झालेला बाप दिसला, तर कुठे मुलगी सासरला जातांना , डोळ्यात आलेले अश्रू आडोशाला जाऊन धोतराने पुसणारा हळव्या मनाचाही बाप दिसला. कुठे धाडसी, खंबीर, कष्टाळू,शिक्षक, कुणबी, गवंडी, लोहार, पैलवान बाप भेटला . पण सर्वांचं ध्येय एकच दिसलं ,आपल्या कुटुंबासाठी राबून त्यांचे पालन पोषण करून त्यांना योग्य शिक्षण व संस्कार देणे . मोठ्या काळजाचा बाप हा या समीक्षेत तरी कसा मावणार ? म्हणून मी येथेच थांबतो . सर्वच रचना छान आहेत. सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन येथेच थांबतो .
◾️अरुण हरिभाऊ विघ्ने
( वर्धा )
◾️कवितासंग्रहाचे नाव : बाप
◾️संपादकांचे नाव: प्रभाकर पवार
◾️प्रकाशन : तेजश्री प्रकाशन
◾️प्रस्तावना: डाँ.शितल मालुसरे
◾️पृष्ठसंख्या : 104
◾️स्वागतमूल्य : 150/-
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .