आर्ट्स, कॉमर्सचे विद्यार्थीही आता बनणार वैमानिक

शालेयवृत्त सेवा
0



मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) : 

कला आणि वाणिज्य शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आगामी काळात वैमानिक बनता येईल यावर सध्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयात विचार सुरू आहे. या संदर्भातील धोरण निश्चित झाल्यानंतर नागरी हवाई मंत्रालयाकडे ते मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.


        सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आजच्या घडीला ज्यांना व्यावसायिक वैमानिक बनायचे आहे त्यांना विज्ञान शाखेतून किमान १२ वी उत्तीर्ण असावे, अशी अट आहे. भौतिकशास्त्र आणि गणित हे दोन विषय अनिवार्य आहेत. हा नियम १९९० च्या दशकापासून लागू झाला होता. त्यापूर्वी केवळ दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वैमानिक बनता येत होते. मात्र, आता सध्याच्या नियमात बदल करून १२ उत्तीर्ण कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनादेखील वैमानिक बनविण्याचा विचार डीजीसीएने सुरू केला आहे.


         आजच्या घडीला ज्यांची स्वतःची विमाने आहेत आणि ती विमाने जे स्वतः उडवतात त्यांच्यासाठी विज्ञान शाखेतून किमान १२ वी उत्तीर्ण हा नियम लागू नाही. मग व्यावसायिक विमान उड्डाणासाठी या नियमाची सक्ती का, असा मुद्दा वैमानिक संघटनांतर्फे वेळोवेळी उपस्थित केला जात आहे. तसेच, शालेय शिक्षणात जेवढे विज्ञान शिकले आहे त्याचे ज्ञान विमान उड्डाणासाठी पुरेसे असल्याचेदेखील वैमानिक संघटनांचे म्हणणे आहे. त्या पार्श्वभूमीवर डीजीसीए वैमानिक भरतीच्या नियमात बदल करण्याचा विचार करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)