नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेडची शाळा क्र एक वजीराबाद या शाळेच्या विद्यार्थ्यांची सहल भारताची राजधानी दिल्ली येथे संपन्न झाली. महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त अजितपाल सिंग संधू व शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांच्या मार्गदर्शनात ही सहल झाली.
या सहलीसाठी मनपा शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी, प्रभू सज्जन यांनी नांदेड रेल्वेस्थानक येथे हिरवी झेंडी दाखवून सहली बद्दल प्रोत्साहन पर मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षण विभागाचे संजय ढवळे, संदीप लबडे, हिंगोले इत्यादी उपस्थित होते. ही सहल पुढे मुख्याध्यापक परमेश्वर माहुरे यांच्या मार्गदर्शनात भारताची राजधानी दिल्ली येथे सुखरूप पोहोचल्यानंतर भारताचे महामहीम राष्ट्रपती यांचे राष्ट्रपती भवन, तसेच संसद भवन, इंडिया गेट, अक्षरधाम मंदिर, कुतुब मिनार व लाल किल्ला, महात्मा गांधी यांची समाधी राजघाट येथे जाऊन त्यांच्या समाधीला अभिवादन करण्यात आले. भेट दिलेल्या सर्व ठिकाणांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
तसेच जगातील सात आश्चर्यापैकी एक आश्चर्य असणारे आग्रा येथील ताजमहल हे सुद्धा विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. विद्यार्थ्यांना वास्तुकलेचा अतिशय उत्तम नमुना त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांची सुरक्षित नेणे आणणे जेवण राहणे याचीसुद्धा अतिशय उत्तम सुविधा करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना या सहलीतून आनंदासोबत अनेक वेगवेगळ्या ऐतिहासिक वास्तू व या देशाच्या महत्त्वाच्या वास्तू पाहायला मिळाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमधून आनंद व्यक्त होत होता. ही सहल म्हणजे मनपा शाळेच्या सहलीतील एक ऐतिहासिक क्षण ठरला.
या सहलीसाठी मुख्याध्यापक परमेश्वर माहुरे व शिक्षक, वर्षा उन्हाळे, केरबा मगरे, विठ्ठल चांदणे, तानाजी केंद्रे अपर्णा वडजे, शुभांगी पतंगे, मयूर कदम, महेश यम्मेवार, राजकुमार देवकते, मुरलीधर पवार, निखिल डुकरे, सेवक सोमनाथ धनमने, धम्मदीप खिल्लारे, पूजा गिरी इत्यादींनी परिश्रम घेतले.
मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांना राजधानीतील ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन घडवून आणल्याबद्दल शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .