पोषण आहार अनुदानात एक रुपया १२ पैसे वाढ !

शालेयवृत्त सेवा
0


मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) : 

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवीमधील प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यासाठी सरकारकडून प्राथमिक आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी पोषण आहार पुरविण्यात येतो. अनेक महिन्यांपासून पोषण आहार पुरवणाऱ्या संस्थांकडून महागाईमुळे दरवाढीची मागणी होत होती. त्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने नवीन शासन निर्णयानुसार आहार खर्चात दरवाढ मंजूर केली आहे. प्राथमिक गटातील विद्यार्थ्यांच्या आहारासाठी ७४ पैसे आणि उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांच्या आहारासाठी एक रुपया १२ पैसे दरवाढ करण्यात आली. 


       धान्य, कडधान्यापासून आहार बनविण्यासाठी प्राथमिक आणि उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यासाठी प्रतिविद्यार्थी निश्चित केलेल्या आहार खर्चात धान्य, भाजीपाला आणि इंधन या खर्चाचा समावेश होता. प्राथमिक विभागासाठी सहा रुपये १९ पैसे खर्च दिला जाणार आहे. यामध्ये तीन रुपये ८३ पैसे धान्यासाठी तर दोन रुपये ३६ पैसे इंधन आणि भाजीपाला यासाठी विभागाला जाणार आहे.


दरवाढ १ मार्चपासून लागू

उच्च प्राथमिक विभागासाठी नऊ रुपये २९ पैसे खर्च दिला जाणार आहे. यामध्ये पाच रुपये ७५ पैसे धान्यासाठी तर तीन रुपये ५४ पैसे इंधन आणि भाजीपाला यासाठी आहे. १५ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या निर्णयानुसार प्रतिदिन प्रतिलाभार्थी आहार खर्च मर्यादा प्राथमिक वर्गासाठी ५.४५ रुपये आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी ८.१७ रुपये याप्रमाणे निश्चित होती. साधारण दोन वर्षांनंतर आताची नवी दरवाढ करण्यात आली. ही दरवाढ १ मार्चपासून लागू होईल.


वेळेत पैसे द्यावेत

गेले दोन वर्ष पोषण आहार पुरवणाऱ्या विविध संस्थांकडून प्रतिविद्यार्थी किमान १० रुपये खर्च मिळावा अशी सातत्याने मागणी केली जात आहे. मिळालेली दरवाढ नगण्य आहे. गेले काही महिने मिळणारा खर्चही वेळेवर मिळत नव्हता. मात्र, १ मार्चदरम्यान जानेवारीपर्यंतचा खर्च मिळाला आहे. मात्र सध्याच्या महागाईचा विचार करून दरवाढ करावी, तसेच ती वेळेत द्यावी, असे सुचिता महिला मंडळ, चेंबूरच्या प्रतिनिधीकडून सांगण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)