नांदेड / भोकर ( शालेय वृत्तसेवा ) :
विद्यार्थ्यांमध्ये भूगोल आणि खगोलशास्त्राची गोडी वाढवण्यासाठी मागील वर्षी प्रत्येक शाळेत ॲस्ट्रॉनॉमी क्लब स्थापन करण्यात आले. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून भोकरच्या जिल्हा परिषद कन्या शाळेत दिनांक १० मार्च रोजी अवकाश निरीक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कन्या शाळेतील विज्ञान शिक्षक मिलिंद जाधव यांनी घेतलेली ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरली. डायट नांदेड येथे उपलब्ध असलेल्या उत्तम दर्जाच्या दुर्बिणीच्या मदतीने विद्यार्थ्यांना चंद्र निरीक्षणाची संधी मिळाली. या दुर्बिणीद्वारे चंद्रावरील खड्डे, त्याच्या किनारी आणि तेजस्वी भाग विद्यार्थ्यांना अगदी जवळून पाहता आले.
कार्यशाळेत प्रथम दुर्बिणीची ओळख करून देण्यात आली. तिचे प्रकार, भाग, कार्य आणि वापर याविषयी विद्यार्थ्यांना समजावले गेले. मोबाईल ॲप्सच्या साहाय्याने सूर्यमालेतील ग्रहांचे स्थान कसे शोधावे? याची माहितीही यावेळी देण्यात आली.
या कार्यशाळेत उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि काही पालक यांनी सहभाग घेतला. शिक्षकांमध्ये श्री. नरसिंग पसनूवार, निवृत्त शिक्षक श्री. रत्नाकर सुरंगळीकर सर, संजय बाचेवाड, माधव सोनटक्के, संभाजी वाघमारे, पंडित तोटेवाड, कांचन जोशी, विद्या जाधव (वाघमारे), अश्विनी खोगरे, कोमल रामपुरकर, प्रणिता जाधव यांचा समावेश होता.
या कार्यशाळेसाठी अकरावीतील विद्यार्थी तन्मय जाधव याने तांत्रिक सहाय्य पुरवला. दुर्बिणीची योग्य प्रकारे जोडणी करण्यासाठी आणि निरीक्षण प्रक्रियेसाठी त्याचा विशेष हातभार लागला. या उपक्रमासाठी डायटचे प्राचार्य श्री. सुदर्शन चिटकुलवार यांनी दुर्बिणीची व्यवस्था केली. तसेच भोकरचे गटशिक्षणाधिकारी श्री. सुधीर गुट्टे यांनी शुभेच्छा दिल्या. शाळेचे मुख्याध्यापक श्री. विष्णुकांत लांडगे यांनी या कार्यशाळेसाठी परवानगी दिली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. भविष्यात अशा कार्यशाळा अधिक प्रमाणात घेतल्या तर विद्यार्थ्यांना भूगोल व खगोलशास्त्रासारखे विषय अधिक सहज आणि आनंददायी होतील, असा विश्वास कार्यशाळेचे सुलभक मिलिंद जाधव यांनी उपस्थित व्यक्त केला.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .