नांदेड / देगलूर ( शालेय वृत्तसेवा ) :
देगलूर महाविद्यालय देगलूर पदवी व पद्व्यूत्तर विभाग मराठी विभाग व मराठवाडा साहित्य परिषद शाखा देगलूर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त नुकतेच दि.२२/०३/२०२५ रोजी गझल कविसंमेलनाचे आयोजन देगलूर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश निवृत्तीराव पाटील बेंबरेकर व डॉ.कर्मवीर पोशट्टी उनग्रतवार,डॉ.मोहन खताळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.मान्यवरांच्या सत्कार व प्रास्ताविकानंतर प्रा.गौतम भालेकर यांनी सुमधुर स्वागतगीत सादर केले.त्यानंतर गझल कविसंमेलनास सुरुवात झाली.
वयाने वाढताना तू..जरा सांभाळ पोरी
जरा सावध रहा आता..भटकणे टाळ पोरी
उडावे पंख पसरावे तुलाही वाटते जर
तसे निर्माण कर तूही तुझे आभाळ पोरी
कशाला कारणे शोधू..तुला भेटायला येते
तुझ्यावर प्रेम जडलेले..तुला सांगायला येते
मनाचा मोगरा होतो..तुझ्या प्रेमात असताना
सुगंधी स्पंदने माझी तुझी गुंफायला येते
अशा तरुणाईला साद घालणाऱ्या गझलकारा रोहिणी पांडे यांच्या शेरांनी रसिकांची दाद मिळवली व गझल कविसंमेलनाचा आगाज झाला.
लोकनिंदेच्या मुळावर वार झाला पाहिजे
शेर गझलेचा असा दमदार झाला पाहिजे
आग धगधगती असावी एवढी डोळ्यांमधे
फक्त नजरेनेच शत्रू ठार झाला पाहिजे
मूर्खपणाचा फक्त घातला सदरा आहे
तोच तर खरा नंबर वनचा 'चतरा' आहे
आरसा सांगतो आरशाला पुन्हा
पारखावे जरा माणसाला पुन्हा
अशा आशयघन दमदार शेरांनी पुसदच्या गझलकारा निशा डांगे यांनी गझल संमेलनात रंग भरले व रसिकांना खिळवून ठेवले.
एकटी जातेस..सांभाळून जा
ऐक..यावेळेस सांभाळून जा
सावळी साधी जरी आहेस तू
पोरगी आहेस सांभाळून जा
जरी एकही कधी टाळली जबाबदारी नाही
अग्निपरीक्षा पुन्हा द्यायची तिची तयारी नाही
पदराखाली कधी मुलांची चूक झाकली नाही
कायम उघडे डोळे माझे मी गांधारी नाही
अशा देगलूरच्या गझलकारा दीपाली कुलकर्णी यांच्या वैचारिक शेरांनी मुलींना व रसिकांना विचारप्रवृत्त केले.
अरे..झुंजण्याचे जिगर लागते
सहज काय हाती शिखर लागते?
तिथे रोज माझी गझल स्फुंदते
जिथे प्रेयसीची कबर लागते
भरतात घाव दुखरे..तू हासतेस तेंव्हा
सुचतात गोड मिसरे..तू हासतेस तेंव्हा
जग बीग सोड नसते मजला खबर स्वतःची
दोघात कोण तिसरे..तू हासतेस तेंव्हा?
अशा हलक्या फुलक्या गुलाबी गझलांच्या तरन्नुम सादरीकरणाने गझलकार चंद्रकांत कदम (सन्मित्र) यांनी तरुणाईला व रसिकांना प्रभावित केले.
मैं कहाँ रिक्षा खिंचता हूँ
तीन पहियोंपे अपना घर खिंचता हूँ
मरीज़ को दवाखाने,शराबी को मयखाने पहुँचाता हूँ
मैं कहाँ रिक्षा चलाता हूँ
तीन पहियोंपे अपना घर चलाता हूँ
अशा आशयघन हिंदी चिंतनशील रचनांनी देगलूरच्या कवी मिलिंद शिकारे यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
कळीने प्राण त्यागावा हळू देठास खुडताना
रडावे पुर्ण बागेने फुलांचा जीव जाताना
अताशा भासते मोठी चिमुकली पोरगी माझी
खुबीने आवरे सारे घराचे खांब झुकताना
स्मरते चिठ्ठी तेव्हाची ती धुंद किनारा
आठवणींच्या केवळ आता मुठीत गारा
अजूनही ती तशीच आहे मंतरलेली
तीच खळी अन् गंध केवडा दरवळणारा
अशा दमदार व हळूवार शेरांनी सूत्रसंचालक ज्येष्ठ गझलकार कवी बापू दासरी यांनी गझल संमेलनात रंग भरले.भारतीय वंशाची अवकाशयात्री सुनीता विल्यम्स व कल्पना चावला यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारी 'तेजाच्या पुंजक्यातून' ही रचना बापू दासरींनी रसिकाग्रहास्तव सादर करून बहारदार गझल कविसंमेलनाचा शानदार समारोप केला.देगलूर महाविद्यालय देगलूरच्या प्राध्यापक,कर्मचारी वृंद तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा देगलूरच्या कार्यकारिणीने आयोजनात मोलाची भूमिका बजावली.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .