मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनपा शाळेच्या'अंकुर' हस्तलिखिताचे प्रकाशन
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
शालेय हस्तलिखित अंक म्हणजे भविष्यात लेखक कवींची जडणघडण करणारी प्रयोगशाळा आहे. अशा उपक्रमांतून आजचे विद्यार्थी भविष्यात मोठे लेखक कवी होतात असे मत शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी व्यक्त केले.
महानगरपालिका शाळा क्र १ वजिराबाद येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या 'अंकुर' या हस्तलिखिताचे प्रकाशन प्रसिद्ध कथाकार राम तरटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चौधरी बोलत होते.
हस्तलिखितात विद्यार्थ्यांनी त्यांच्या कथा, कविता, लेख आणि चित्रांमधून त्यांची कल्पनाशक्ती आणि लेखन कौशल्ये दाखवली आहेत, मुख्याध्यापक आणि त्यांचे सहकारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन असेही शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी म्हणाले. राम तरटे यांनी, आपले आईवडील एखाद्या कलेक्टर किंवा आयपीएस अधिकाऱ्यांचे आईवडील म्हणून गौरवाने जगावेत यासाठी तुम्ही मेहनत घेऊन अभ्यास केला पाहिजे, असे बोलून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक केले आणि त्यांना भविष्यातही लेखन करत राहण्यासाठी प्रोत्साहित केले.
या हस्तलिखितात अठरा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. प्रमुख पाहुण्यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. हस्तलिखितामध्ये विविध विषयांवरचे लेखन आहे, ज्यात सामाजिक समस्या, निसर्ग, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांसारख्या विषयांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या कथा आणि कवितांमधून त्यांची कल्पनाशक्ती आणि भावनिक अभिव्यक्ती दिसून येते. लेखांमधून विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरचे त्यांचे विचार मांडले आहेत. चित्रांमधून विद्यार्थ्यांनी त्यांची कलात्मकता आणि रंगसंगतीची जाण दाखवली आहे.
'अंकुर' हस्तलिखित विद्यार्थ्यांना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी आणि त्यांच्या लेखन कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ आहे, असे शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर माहुरे यांनी सांगितले. 'अंकुर' हस्तलिखित शाळेच्या ग्रंथालयात उपलब्ध आहे.
यावेळी शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष प्रकाश गजभारे शिक्षक वर्षा देशमुख, केरबा मगरे, विठ्ठल चांदणे, तानाजी केंद्रे, अपर्णा वडजे, शुभांगी पतंगे, मयुर कदम, महेश यम्मेवार, राजकुमार देवकत्ते, मुरलीधर पवार, निखिल डुकरे, सेवक सोमनाथ धनमणे, धम्मदीप खिल्लारे, पूजा गिरी उपस्थित होते.
सर्व मनपा मराठी आणि उर्दू शाळेत मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा
आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भीम संदेश कॉलनी मनपा शाळेत 'आरंभ', आंबेडकर नगर मनपा शाळेत 'गगनभरारी', खय्युम प्लॉट मनपा उर्दू शाळेत 'नई उडान', गणेश नगर मनपा शाळेत घे भरारी स्वातंत्र्यसैनिक कॉलनी मनपा शाळेत किलबिल, मनपा शाळा केला रोड लेबर कॉलनी, जंगमवाडी मनपा प्राथमिक व माध्यमिक तसेच इस्लामपुरा मनपा उर्दू शाळेत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तलिखितांचे प्रकाशन करण्यात आले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .