'जागर शिक्षणाचा जागर नारीशक्तीचा' उपक्रम
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वाजेगाव येथे बीटचे कल्पक व उपक्रमशील विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांच्या संकल्पनेतून मराठी साहित्यातील लेखकांची भेट हा उपक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून लेखिका समुपदेशक, डॉ. अर्चना सावंत यांची उपस्थिती लाभली होती.
या कार्यक्रम प्रसंगी डॉ अर्चना सावंत यांनी आई होण्याची गोष्ट ज्या पुस्तकातून लिहिलेली आहे, त्या पुस्तकाबद्दल सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यासोबत उपस्थित सर्व माता भगिनींना बालमनावर संस्कार करताना स्वतः आधी आपण पालक या नात्याने त्या संस्काराचे अनुपालन करावे तरच आपली मुले आपण सांगितलेल्या गोष्टींचे पालन करतील असे मार्गदर्शन केले. सुजान पालकत्व कसं असावं याविषयी त्यांनी महिला भगिनींचे सविस्तर समुपदेशन केले. या कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
बालिका दिन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंती निमित्त जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वाजेगाव येथे 'जागर शिक्षणाचा जागर नारी शक्तीचा' उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष ताहिरा बेगम शेख जलाल तर प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या कर्तबगार महिला शिक्षिका, साहित्यिक डॉ. अर्चना सावंत यांची उपस्थिती लाभली.
या वेळीं शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष शमीम बाजी, सदस्य ज्योत्स्ना तारू, यास्मिन बेगम शेख कफिल यांची उपस्थिती लाभली. गावातली अनेक माता भगिनींनी या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला. माता पालक या नात्याने आपल्या पाल्यासोबत त्यांच्या शिक्षणाशी संबंधित अनेक गोष्टी त्यांनीं आपल्या गप्पांमधून व्यक्त केल्या. या मेळाव्यात डॉ. अर्चना सावंत यांनी मातापालकांनी आधी आपल्या भावनिक, मानसिक, शारीरिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करावे. कारण त्याचे प्रतिबिंब आपल्या वर्तनातून दिसते, असे प्रभावी मार्गदर्शन केले. आपले व्यक्तित्त्व सुधारण्यासाठी त्यांनी आपल्या तील हॅप्पी हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी प्रयत्न कसे करावे, याचे मार्गदर्शन केले. माता आदर्श असेल तर मूल देखील आदर्श बनेल यासाठी प्रत्येक मातेने आपले व्यक्तिमत्त्व घडवावे. यासाठी योगा, प्राणायाम करावा संतुलित आहार घ्यावा असे प्रभावी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका फरहत बानो, ज्येष्ठ शिक्षक सलीम शहजाद, युसूफ खान जमील अहमद, शेख सोहेल, अख्तरी बेगम, नुरबाजी, सदफ मारिया, सुमैया खुटाणबुजे, वसीमबानो, शाजिया, सफाना, नाजैमा, शाहीन, सविता पाटील, कपिल वाघमारे, नामदेव वाघमारे हाजी अन्सारी यांनी सहकार्य केले आभार गोरगिळे यांनी मानले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा देवरे यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .