पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :
बालभारती ... अर्थात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ. महाराष्ट्राच्या घराघरात आणि मनामनात पोहचलेल्या बालभारतीचा आज ५८ वा वर्धापन दिन. महाराष्ट्रातील हजारो शाळा, लाखो शिक्षक आणि कोट्यवधी विद्यार्थी आणि पालकांशी आपुलकीच्या धाग्याने जोडली गेलेली ही संस्था महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागांतर्गत काम करते.
पाठ्यपुस्तक हे ज्ञानप्राप्ती व शिक्षणाचा प्रसार करण्याचे प्रमुख साधन आहे. पाठ्यपुस्तके हा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. आपल्या मनाचा एक कोपरा लहानपणी शिकलेल्या पाठ्यपुस्तकांसाठी कायम राखीव असतो. लहानपणी शिकलेल्या कथा, कविता, चित्रे यांचा एक विलोभनीय ठसा मनावर उमटलेला असतो. पाठ्यपुस्तकांतून भाषेचे, साहित्याचे आणि वाचनाचे संस्कार तर होतातच, शिवाय जीवनाचे, जगण्याचे अनेक संस्कारही याच पाठ्यपुस्तकांतून होत असतात.
अशी ही आयुष्यभर साथसंगत करणारी, उत्तम संस्कारांची शिदोरी देणारी पाठ्यपुस्तके बालभारतीत तयार होतात.मागील ५८ वर्षांपासून दरवर्षी करोडो पुस्तकांची छपाई करून त्यांचे वितरण बालभारती मार्फत केले जाते. बालभारती हे तब्बल दहा भाषेत पाठ्यपुस्तके तयार करणारे देशातील एकमेव पाठ्यपुस्तक मंडळ आहे.
पाठ्यपुस्तकांबरोबरच इतर पूरक साहित्यही बालभारती प्रकाशित करीत असते. यामध्ये विविध विषयांच्या स्वाध्यायपुस्तिका, प्रात्यक्षिक पुस्तके, छत्रपती शिवाजीमहाराज स्मृतिग्रंथ, छत्रपती शाहू महाराज गौरवग्रंथ, ग्रामगीता, स्फुर्तीगीते, कथा स्वातंत्र्याची, शिक्षणगाथा हे त्रैमासिक इ.चा समावेश आहे. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान मिळावे, त्यांच्या संवेदनशील मनावर उत्तम मूल्यांचे संस्कार व्हावेत ही उद्दिष्टे ठेवून बालभारती मार्फत 'किशोर' हे मासिक चालवले जाते. गेल्या 54 वर्षांत किशोर मासिकाने अनेक पिढ्यांवर वाचनाचे ज्ञान-विज्ञानाचे व मूल्यांचे संस्कार केले आहेत.
मागील ५८ वा वर्षाच्या काळात नवीन शैक्षणिक विचारप्रणाली, कालसुसंगत शैक्षणिक धोरणे, नवीन अध्ययन- अध्यापन पद्धती अशा विविध बाबींचा विचार करून बालभारतीने पाठ्यपुस्तकांच्या स्वरूपात, आशयात अनेक बदल केले आहेत. कालानुरूप बदलाची ही प्रक्रिया आजही सुरु आहे. नव्या काळाची नवी आव्हाने पेलत विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण पाठ्यपुस्तके पोहचवण्यासाठी बालभारती कायम सज्ज आहे.महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या बालभारतीस खूप साऱ्या शुभेच्छा !
किशोरचे कार्यकारी संपादक व बालभारतीचे जनसंपर्क अधिकारी किरण केंद्रे यांनी विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. बालभारती म्हणजे ज्ञानाचा खजिना व विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही साहित्याची मेजवानी आहे असे प्रतिपादन हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलच्या ग्रंथपाल आरती शर्मा यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .