व्यंकटेश चौधरी यांचे 'डॉ. राधाकृष्णन' पुस्तक विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे -डॉ. पृथ्वीराज तौर

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

मुलांना थोर पुरुषांबद्दल कुतुहल असते. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल, त्यांनी दिलेल्या शिकवणी, संस्कारांबद्दल जाणून घ्यायची जिज्ञासा असते. ही जिज्ञासा पूर्ण करण्याचे काम शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी पूर्ण केले असून त्यांचे 'तत्त्वज्ञ आचार्य डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन' हे पुस्तक विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारेही आहे असे उद्गार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मराठी भाषा संकुलाचे अधिष्ठाता डॉ. पृथ्वीराज तौर यांनी काढले.


       नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वजिराबाद येथील शाळेत दि. १० डिसेंबर रोजी या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मराठी भाषा संकुलाचे अधिष्ठाता डॉ. पृथ्वीराज तौर, व अजितपालसिंघ संधू, बालसाहित्यिक पंडित पाटील, विजयकुमार चित्तरवाड आदींची उपस्थिती होती. प्रारंभी माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.


       मान्यवरांच्या स्वागतानंतर प्रास्ताविक इसाप प्रकाशनाचे संचालक दत्ता डांगे यांनी केले. त्यांनी 'थोरांची चरित्रे वाचली म्हणजे पोरांची चारित्र्य घडत असतात' हा उद्देश समोर ठेवून हे पुस्तक प्रकाशनासाठी तयार केले असल्याचे सांगितले. यानंतर डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या हस्ते 'तत्त्वज्ञ आचार्य डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी मनपाचे शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांचा थोरांची चरित्रे लिहिण्याचा उपक्रम महत्त्वपूर्ण असून विद्यार्थ्यांना घडविणारा आहे असे उद्गार काढले.

            

         मनपाचे शिक्षणाधिकारी व लेखक व्यंकटेश चौधरी यांनी बालवयापासून विद्यार्थ्यांमध्ये लेखनाची आवड निर्माण व्हावी, त्यासाठी त्यांच्या वाचनात महान व्यक्तींची चरित्रे यावीत म्हणून आपण यापूर्वी 'राष्ट्रनिष्ठ झंझावात लालबहादूर शास्त्री' व आता आचार्य तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली डॉ. राधाकृष्णन' हे पुस्तक लिहिले आहे असे म्हटले.


            प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना बालसाहित्यिक पंडित पाटील म्हणाले की, विद्येमुळे जीवनास कृतार्थता आणि व्यक्तीस श्रेष्ठता लाभते या प्रमेयाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन होत. अखंड वाचन चिंतन अध्ययन अध्यापन, ग्रंथलेखन परिशिलन आणि तत्त्वचिंतन या प्रक्रियांनी संपन्न असलेले राधाकृष्णन म्हणजे एक नवलकथा होते. यांच्या जीवनचरित्रातून शालेय विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल. व्यंकटेश चौधरी यांनी अत्यंत बालसुलभ पद्धतीने चरित्र लेखन करून बालसाहित्यात मोलाची भर घातली आहे असे म्हटले आहे.

        या प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन तानाजी केंद्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन शुभांगी पतंगे यांनी केले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)