विद्यार्थ्यांनी प्रत्येक गोष्टींकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे.. मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांचे बालविज्ञान मेळाव्यात मार्गदर्शन

शालेयवृत्त सेवा
0



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

आपल्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी - घडामोडींकडे विद्यार्थ्यांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे म्हणजे आपली विज्ञानविषयक दृष्टी अधिक डोळस होते असे मार्गदर्शन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले.


      नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या विज्ञान बालमेळाव्याचे उद्घाटन वजिराबाद येथील शाळेत दि. १० डिसेंबर रोजी संपन्न झाले. या मेळाव्यास आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती होती तर   उद्घाटक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मराठी भाषा संकुलाचे अधिष्ठाता डॉ. पृथ्वीराज तौर, व प्रमुख पाहुणे म्हणून अजितपालसिंघ संधू, बालसाहित्यिक पंडित पाटील, प्रकाशक दत्ता डांगे, विजयकुमार चित्तरवाड आदींची उपस्थिती होती. प्रारंभी माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याच मेळाव्यात शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी लिखित 'तत्त्वज्ञ आचार्य डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन' या चरित्र पुसँतकाचे प्रकाशन संपन्न झाले. मान्यवरांच्या स्वागतानंतर मनपाचे शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी बालवयापासून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड व कुतुहल निर्माण व्हावे म्हणून अशा बालविज्ञान मेळाव्यांची गरज आहे. हे ओळखूनच महानगरपालिका आपल्या शाळांमधून बालविज्ञान मेळावे घेत आहे असे म्हटले.


      आपल्या भाषणात आयुक्त डोईफोडे पुढे म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्यांनी अशा विज्ञान प्रदर्शनात सहभागी झाले पाहिजे. शिक्षकांनीही ते सहभागी होतील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येक शाळांमधून अशी प्रदर्शने आणि विविध उपक्रम आयोजित केले पाहिजेत. अशा उपक्रमांमुळेच उद्याचा विज्ञानमय भारत घडेल असे ते म्हणाले.


          मेळाव्याचे उद्घाटक डॉ. पृथ्वीराज तौर यांचे हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते म्हणाले, प्रश्न विचारणारे विद्यार्थी निर्माण झाले पाहिजेत. कारण असे विद्यार्थी कुतूहल जाणून घेणारे असतात. ते विज्ञान जाणून घेतात. त्यांची विज्ञानाची दृष्टी उत्तम होते. काही काही वेळेला प्रश्नांतूनच नवीन उत्तरे मिळतात. नवे शोध लागतात. याबाबत डॉ. तौर यांनी थोर शास्त्रज्ञ न्यूटन, कोपर्निकस, गॅलिलिओ, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची उदाहरणे दिली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला आपले हक्क सांगितले आणि कर्तव्येही सांगितले. तसेच त्यांनी विज्ञानाचा दृष्टिकोनही दिला असे सांगून ते म्हणाले की, प्रश्न विचारणारे मुले निर्माण झाली पाहिजेत तरच डॉ. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील विज्ञानात आघाडीवर असलेला भारत घडेल असे त्यांनी म्हटले.


         प्रमुख पाहुणे पंडित पाटील यांनी आजची बालकांची पिढी ही हुशार, चाणाक्ष आहे. ही पिढी भविष्यात नवनवीन शोध लावेल. परंतु आज त्यांना योग्य वातावरण व प्रशिक्षण मिळाले पाहिजे असे सांगून अशी विज्ञान प्रदर्शने विद्यार्थ्यांना उभारी देणारी आहेत असेही म्हटले.


         या बाल विज्ञान मेळाव्याचे परीक्षण प्रा. सीमा चंद्रकांत पांडे आणि प्रा. नुरी बेगम अब्दुल आला यांनी केले. मेळाव्याचे सूत्रसंचालन तानाजी केंद्रे यांनी केले तर आभार शुभांगी पतंगे यांनी मानले.  बाल विज्ञान मेळाव्याच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक परमेश्वर माहुरे, सुरेश गुंडे, संजय ढवळे, संदीप लबडे, हनुमंत भालेराव, बाबू पठाण, परमेश्वर माहुरे, केरबा मगरे, मुस्तफा खान, यांनी परिश्रम घेतले. 



आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी बाल विज्ञान मेळाव्यामध्ये सहभाग घेतलेल्या बालवैज्ञानिकांचे प्रयोग आस्थापूर्वक पाहून त्यांचे कौतुक केले. तसेच बाल विज्ञान मेळाव्याच्या सुरेख आयोजनासाठी शिक्षणाधिकारी मनपा व्यंकटेश चौधरी यांचे आणि टीमचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)