अधिकाऱ्यांच्या भेटी दोष पाहण्यासाठी नाही दिशा देण्यासाठी झाल्या पाहिजेत -शिक्षण संचालक महेश पालकर

शालेयवृत्त सेवा
0



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
         नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्याचे काम अभिनंदनीय आहे. नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यांनीही चांगल्या प्रकारचे काम करून या कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. साक्षरता कार्यक्रमांतर्गत वर्ग भेटी देताना स्वयंसेवकांच्या जीवनात प्रेरणा निर्माण झाली पाहिजे, अशा पद्धतीने पर्यवेक्षण करावे. अधिकाऱ्यांनी भेटी देताना उणिवा किंवा दोष पाहण्यासाठी भेट देऊ नये तर पुढील घटकाला दिशा देण्यासाठी ती भेट उपयुक्त असली पाहिजे, असे प्रतिपादन शिक्षण संचालक योजना महेश पालकर यांनी केले. 

         ते नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर आले होते. यावेळी लातूर विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे, शिक्षणाधिकारी (योजना) दिलीप कुमार बनसोडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) माधव सलगर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ सविता बिरगे, उपशिक्षणाधिकारी गौसिया वडदकर यांची उपस्थिती होती. 

        प्रारंभी नांदेड जिल्हा शिक्षण विभागाच्या वतीने अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर तालुका निहाय आढावा घेण्यात आला. यावेळी कंधार, मुखेड आणि हिमायतनगर या तीन तालुक्यांनी शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल त्या तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी संजय येरमे, कैलास होनधरणे, केशव मेकाले यांचा शिक्षण संचालकांनी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
 
          शिक्षण संचालकांनी यावेळी नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत सर्व तालुक्यांनी शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन करून जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम कशाप्रकारे राबवावेत याबाबत मार्गदर्शन केले. आणि शिक्षण विभागाच्या अंतर्गत ज्या विविध शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना दिल्या जातात, त्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना संबंधित शिष्यवृत्तांचा लाभ मिळाला पाहिजे, यासाठी जिल्हा कार्यालय तसेच तालुका कार्यालय आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे, अशी सूचना केली. 
     
         यावेळी बैठकीचे आभार प्रदर्शन शिक्षणाधिकारी (मनपा) व्यंकटेश चौधरी यांनी केले. बैठकीच्या आयोजनासाठी सहाय्यक योजना अधिकारी माधव शिंगडे, जिल्हा अल्पसंख्यांक समन्वयक शेख रुस्तुम आदींनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)