मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :
यशवंतराव चव्हाण सेंटर, शिक्षण विकास मंचच्यावतीने डाॅ. कुमुद बन्सल गुणवंत शिक्षक पुरस्कार मागील वर्षापासून सुरु करण्यात आला आहे. एक पुरूष आणि एक महिला शिक्षक यांना हा राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार दिला जातो. सन २०२४ चा डाॅ. कुमुद बन्सल गुणवंत शिक्षक पुरस्कार अकोला येथील उमेश पांडुरंग चोरे आणि पुणे येथील मनिषा रविंद्र मालुसरे यांना देण्यात येणार आहे.
उमेश चोरे हे जि.प. वरिष्ठ प्राथमिक सेमी इंग्रजी आदर्श पीएमश्री शाळा बोर्डी पं.स . अकोट-अकोला येथे तर मनिषा मालुसरे या पी. एम, श्री. जि. प. प्राथमिक शाळा,लवळे, मुळशी-पुणे येथे कार्यरत आहेत. येत्या ५ जानेवारी रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे होणाऱ्या पंधराव्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
उमेश चोरे हे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्य करत आहेत. त्यांनी आदिवासीबहुल भागात कार्य करून बोर्डी शाळेचा कायापालट केला. त्यांनी परिसरातून दहा लाखापेक्षा अधिक वर्गणी करून तालुक्यातील पहिली शंभर टक्के डिजिटल शाळा तयार केली.
ते इयत्ता पहिली ते आठवी इंग्रजी विषयाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण व तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य करतात. त्यांनी अकोट तालुक्यातील केंद्रांना तीन वर्ष 'TAG COORDINATOR’ म्हणून विशेष कार्य केले आहे. ‘बाला पेंटिंग’ हे उमेश चोरे यांचे वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. बाला ( BALA ) उपक्रमाची जिल्हास्तरीय पुस्तिका निर्माण करण्यात संपादकीय भूमिका त्यांनी बजावली आहे. जि.प. शाळा बोर्डी ला आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून संलग्नता मिळवून देण्यास त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.
मनिषा मालुसरे यांनी तब्बल बारा वर्षे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एच.आय.व्ही.ग्रस्त बालकांच्या शाळेमध्ये मनोभावे सेवा केली आहे. मानव्य संस्थेद्वारे या अनाथ मुलांसाठी ही शाळा चालवली जाते ज्या शाळेमध्ये सहसा कोणी काम करण्यास तयार नसते अशा ठिकाणी मुलांना अत्यंत मायेने प्रेमाने शिकवणे, त्यांना समाजाशी जोडून ठेवणे, त्यांच्यावर उत्तम संस्कार करणे हे मोठे कार्य त्यांनी केले आहे. यासह मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे काम त्या करत आहेत. कविता लेखन, लहान मुलांसाठी उपयुक्त शैक्षणिक साहित्य निर्मिती शिक्षकांसाठी मार्गदर्शक लेख असे त्यांचे उपक्रम सुरू आहेत.
माजी विभागीय शिक्षण सचिव, महाराष्ट्र बोर्ड, मुंबई श्रीमती बसंती रॉय यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या शोध समितीने राज्यभरातील मुख्याध्यापक, शिक्षक, सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी, पालक, शिक्षण अभ्यासक, शिक्षणतज्ज्ञ यांच्याकडून शिक्षक पुरस्कारांसाठी शिक्षकांच्या शिफारशी मागवल्या होत्या. अनेकांकडून आलेल्या शिफारशीची छाननी करून, मुलाखती घेऊन, प्रत्यक्ष शाळाभेटी झाल्यानंतर या पुरस्कारांसाठी शिक्षकांची निवड करण्यात आली. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे, शिक्षण विकास मंचचे मुख्य संयोजक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. वसंत काळपांडे यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .