विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीच्या विकासासाठी शालेय विज्ञान प्रदर्शन सारखे उपक्रम हे प्रेरणादायी - मा.आ.शिरीष चौधरी

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा ) :

विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून नवनिर्मितीची आवड निर्माण व्हावी, सृजनशीलता व कल्पनाशक्तीला वाव मिळावा, तसेच बोलके होण्यासाठी आत्मविश्वास निर्माण होऊन संशोधन व संशोधक वृत्तीचा विकास व्हावा या हेतूने शालेय स्तरावर आयोजित होणारे शालेय विज्ञान प्रदर्शन सारखे उपक्रम हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात तसेच मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे आपल्या अंगी असलेले कलागुण,संशोधन व संशोधक वृत्ती याचे सादरीकरण करण्यासाठी शालेय स्तरावर हक्काचे व्यासपीठ या माध्यमातून मिळते म्हणून शालेय विज्ञान प्रदर्शन हे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाची आवड निर्माण करून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी प्रेरणादायी आहेत असे मत हिरा प्रतिष्ठान संस्थेचे सचिव तथा अमळनेर विधानसभेचे मा.आमदार श्री. शिरीष चौधरी  यांनी हिरा प्रतिष्ठान संचलित श्री काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर व संस्कृती शिशू विहार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय विज्ञान प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी आपल्या भाषणातून व्यक्त केले.


      पुढे त्यांनी आपल्या भाषणातून प्रदर्शनात इयत्ता बालवाडी पासून ते चौथीपर्यंतच्या सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांनी तयार केलेल्या उपकरणांचे व मान्यवरांनी विचारलेल्या प्रश्नांवर  हजरजबाबीपणे दिलेल्या उत्तराचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.


           कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.राजेंद्र महाजन यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात सादर केलेले साहित्य व त्यांचा प्रतिसाद हा कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांची उपक्रमाबद्दलची आवड व उत्सुकता यातून दिसून आली. परिसर अभ्यासावर आधारित विद्यार्थ्यांनी तयार केलेली उपकरणे ही विद्यार्थ्यांच्या निरीक्षण क्षमतेचे कौतुक करणारी असे आहेत असे म्हणत विद्यार्थी,पालक, शिक्षक व शाळा यांच्या मेहनतीचे देखील कौतुक त्यांनी केले.


       कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख मान्यवर संस्थेच्या उपाध्यक्षा सौ.अनिता चौधरी यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत मैदानी खेळही खेळावेत कारण मानसिक विकासासोबत शारीरिक विकासालाही महत्त्व आहे याविषयी मार्गदर्शन केले.


         कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख मान्यवर नंदुरबार जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी श्री निलेश लोहकरे, जिल्हा गाईड संघटक श्रीमती संगीता रामटेके, समुत्कर्ष क्लासेसचे संचालक श्री ललित महाजन यांनी आपल्या मनोगतातून शालेय विज्ञान प्रदर्शन उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावेत यासाठी विद्यार्थ्यांमध्ये क्षेत्रभेटी सारखे उपक्रम घडवून आणावेत तसेच जिल्हा स्तरावर आयोजित होणाऱ्या नावीन्यपूर्ण उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्नशील राहण्याविषयीचे मार्गदर्शन केले.


      कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून सहकार महर्षी श्री अण्णासाहेब पि.के. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी प्राचार्य तथा ज्येष्ठ शिक्षक श्री महेंद्र फटकाळ व सौ. ताईसाहेब इंदुबाई हिरालाल चौधरी प्राथमिक विद्या मंदिराचे मुख्याध्यापक श्री किरण त्रिवेदी उपस्थित होते.


       कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री रुपेश चौधरी यांनी सादर करत प्रास्ताविकातून त्यांनी शाळेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचा लेखाजोखा मान्यवरांसमोर सादर केला. सदर शालेय विज्ञान प्रदर्शन उपक्रमात विद्यार्थ्यांनी परिसर अभ्यासावर आधारित विविध विषयांवर उपकरणे व शैक्षणिक साहित्य तयार केली होती ज्यात इयत्ता बालवाडी पासून ते इयत्ता चौथी पर्यंतच्या एकूण ६० विद्यार्थ्यांनी सहभागी होत ६० उपकरणे व शैक्षणिक साहित्य सादर केली.


       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सतीश काटके व आभार प्रदर्शन श्री विशाल चौधरी यांनी केले तर श्री युवराज भामरे श्रीमती अमिता नाईक, श्रीमती कीर्ती नाईक, श्रीमती भारती मोरे, श्री सुधाकर ठाकूर, श्री रवी चौधरी, श्री शेखर पाटील यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)