नाजूक, कोमल आणि चिंतनशील कविता: मोराच्या गावाला जाऊया !

शालेयवृत्त सेवा
0

 



         चिंतनशील, भावगर्भ आणि निराळेपणाचा शोध घेत लेखन करणाऱ्या प्रशांत असनारे यांचा 'मोराच्या गावाला जाऊया' हा आकर्षक, सुंदर ,चित्तवेधक आणि पाहता क्षणी हवाहवासा वाटणारा कुमार काव्यसंग्रह ठाणे येथील अष्टगंध प्रकाशनचे संचालक संजय शिंदे यांनी नुकताच प्रकाशित केला. यापूर्वी त्यांचे 'मीच माझा मोर', 'वन्स मोर' हे दोन कवितासंग्रह प्रकाशित आहेत. त्यांनी मोराच्या गावाला जाऊया हा कुमार कवितासंग्रह लिहून बालकवितेचा मळा फुलविला आहे . यात शंका नाही.

        त्यांची कविता वाचताना आपण बाल होऊन जातो .त्यांना बालमानसशास्त्राची भाषा चांगलीच अवगत आहे .ते कधीही बेसावध  राहून कविता लिहीत नाहीत ही त्यांच्या जमेची बाजू आहे. म्हणून मराठी साहित्यात प्रशांत असनारे हे प्रतिभाशाली  व हाडाचे कवी म्हणून परिचित आहेत.

त्यांनी कवितासंग्रह लिहिताना कवितेत जिवंत सुगंध पेरला आहे .निसर्गाच्या स्वप्नालाच त्यांनी मुक्त केलंं आहे .आनंद वाटीत निघालेल्या या कवीने निसर्गात आनंदऋतूची भर घातली ती अशी -


बाहेर कोणताही असला

 मोसम किंवा हंगाम 

तरी आपण आपल्या आत 

खूप आत खोलवर 

आपलाच ऋतू पेरावा

 तोच असतो खरा ऋतू 

तोच असतो आनंदऋतू !


मुलांच्या भावविश्वाचे विविध शक्तीरुपे या संग्रहात कवीने प्रवर्तित केली आहेत. मुलांना त्यांनी ध्येय गाठण्याचा सल्ला दिला आहे. थांबला तो संपला हा उपदेश करताना ते 'नवे जग'  या कवितेत म्हणतात - 

दोन्ही मुठीत काजवे धर 

अन् सरळ 

धुक्यात मिसळून जा

 माझी खात्री आहे,

 जेव्हा हे धुकं विरघळून जाईल 

तू एका नव्या गावात असशील! 


        जीवनात हसत सामोरे जाताना आपण कधीच तक्रार करायची नाही. मिळेल ते आपलं हे तत्व अंगिकारून जगणं सुंदर करायचं. मनात शंकेची पाल चुकचुकत ठेवून जगण्याला निरस कधीही करायचं नाही हा मोलाचा संदेश मुलांना देण्याचं काम या कविता करतात. उरात आनंदाच युग वागवायचं असतं आणि आनंदाचा बहार मोजायचा असतो .हे सांगताना एका फुलपाखरावर रूसलेल्या मुलांची गोष्टच कवी प्रशांत असनारे सांगतात ती अशी- 


अगदी तेव्हाच 

ते फुलपाखरू भिरभिरत येते 

अन् हळूच बसते 

त्याच्या फुगलेल्या गालावर 

एक गुलाबी फुल समजून.


        मुलं कल्पना करतात. स्वप्न पाहतात .त्यांच्या कल्पनेत नावीन्यचा शोध असतो. त्यांची मन नाजूक, कोमल आणि संवेदनशील असतात .याची जाणीव कवीला आहे.

 ते कवितेच्या पानापानावर बालरंग शिंपडताना दिसतात .म्हणून तर दोर  लावून आकाशात बादली सोडायला निघालेल्या मुलाला कवी धीर देऊन सांगतात--


येत राहतील बादलीत 

कधी मूठभर ढग 

 तर कधी घोटभर आकाश 

कधी उडणारी पाखर 

तर कधी कटलेले पतंग 


आणि काय सांगावं 

कदाचित 

एखादवेळी येईल त्या बादलीत

 तो टांगलेला सूर्यही! 


         पशू,पक्षी, प्राणी ,किटक कितीही कडक उन्हात डोळ्यांना चष्मा लावत नाहीत. मुसळधार पावसात छत्री वापरत नाहीत. अंगात स्वेटर घालत नाहीत .ती सगळ्याच ऋतूना अंगावर घेतात म्हणून चिरतरुण होऊन ऋतू पण कीटकासाठीच पृथ्वीवर पुन्हा पुन्हा येतात की काय ? 

          फुलांनी डवरलेल्या झाडांमुळे  मुकुट घातलेल्या राजपुत्रासारखं दिसणार घर, अलवार उमगलेली रंगीबेरंगी फुलं,  वासाच्या शोधात निघालेली मनमोहक फुलपाखरं, आणि चैतन्याचा समुद्र कवितामधून खळाळता  ठेवणारे प्रशांत असनारे यांनी रानावनातून वेचलेले प्रतिमासृष्टी आपल्या शैलीनी फुलवत ठेवली आहे .झाडाविषयी कविला अपार प्रेम आहे. झाडं माया देतात त्यांचा हात जगन्नाथ असतो आणि मन देणेकरी असतं. त्यांना कधीही दुर्गूण शिवत नाहीत .झाडाइतकं पवित्र काहीच नाही. ही भावना प्रशांत असनारे यांची कविता सतत सांगत आली आहे.

           शोध, हिरवाकंच देव, झाडाचे दुःख, बी, आनंदाचे झाड, झाडासारखं जगू या, अजूनही आशा आहे, हे झाड ते झाड, स्वच्छंद या कविता मधून त्यांनी झाडाची महती वर्णन केली आहे. फक्त आपणाला झाडात लपलेली माणसं किंवा माणसात लपलेली झाडं शोधता आली पाहिजेत एवढेच ! 

         मंदिराच्या कळसाहून उंच असलेल्या झाडावर हिरवाकंच देव राहतो, कुंडीतल्या झाडाकडे पाहून मला प्रकर्षाने जाणवायला लागतं की झाडांना बोलता यायला हवं! आयुष्याचे सगळे क्षण आपण झाड होऊन जगूया आणि माणूस म्हणून जगताना झाड होऊन पाहूया ! 

पक्षांना अजूनही आशा आहे की त्यांनी म्हटलेली गाणी ऐकून झाडाला नक्कीच लुसलुशीत पालवी  फुटले ! 

          झाड जरी वेगळी असली तरी मातीनं  झाडाची मूळ खूप घट्ट धरून ठेवली आहेत खरंच आपण सगळ्यांनी झाडासारखं हिशोब न ठेवता जगायला काय हरकत आहे .असंच बालकांच्या मनाच झाड कायम उंच होत जावं आणि परोकारी वृत्ती वृद्धिंगत व्हावी असा अट्टाहास ही कविता करताना दिसते.कवीनी  झाडाविषयी खोटा कळवळा मुळीच बाळगला नाही तर त्यांच्या अंगप्रत्यांगात झाड मुरलेलं आहे.

         बालकांना संस्कारीत केलं पाहिजे तेच उद्याचं उज्ज्वल भविष्य आहे हे जाणून प्रशांत असनारे यांनी कवितेच्या माध्यमातून संस्कार पेरण्याची प्रकृती जपली आहे. फुलांच्या आत या कवितेत ती आढळून येते.


 देव नाराज झाला तरी चालेल

 पण निजलेल्या त्या तान्ह्याला 

 कधीही उठवू नये...

 झाडावरची जिवंत फुलं

 कधीही तोडू नयेत! 


          मुलांना झाडावरच्या पाखराचा चिवचिवाट ऐकायला आवडतो. छतावर ऐकू येणाऱ्या थेंबाची सळसळ त्यांना भावते, दिवाणखान्यात लावलेल्या कुंडीतल्या झपाट्यानं वाढणाऱ्या झाडाचं कुतुहल असते. कागदी विमानावर काढलेल्या फुलपाखराच्या चित्राचं त्यांना भारी आकर्षण असतं. हळूच दार उघडणारे पांढरेशुभ्र आजोबा पाहून मुलांना आधार वाटतो. रंगलेली मेहंदी दाखवत घरभर हुंदडण त्यांना पसंत असतं हे मुलांच्या ठायी असणारी निरागस वृत्ती अनेक कवितामधून सतत तेवती ठेवण्यात प्रशांत असनारे कमालीचे यशस्वी झाले आहेत.

          ससा आणि कासव, चिमणी चिमणी दार उघड, सिंह आणि सशाचं पिल्लू ,ससा कासवाची गोष्ट या कथा काव्यरूपात मांडताना कवीने त्यात आत्मा ओतला आहे. मुलांना एका पायात ससा आणि एका पायात कासव घेऊन धावायला सांगणारी, प्रत्येक वेळेस दार उघडताना कावळाच असतो असं नाही तर दार उघडल्यावर मोरही असू शकतो म्हणून चिमणीला दार उघडण्याचा सल्ला देणारी, सिंह म्हणजे कोण हे माहीत नसलेल सश्याच चुणचणीत पिल्लू उड्या मारत बिनधास्तपणे सिंहा समोरून जाताना मंद हसून सिंहाला गुहेत धाडणारी , गाणं  पक्षाच्या  चोचित नाही तर त्यांच्या पंखातही असतं असं सांगणारी, वेलीनंं लपेटून गेलेल्या भिंतीवर फुलं येण्याची वाट पाहणारी, पक्षाच्या पायाखालून खूप पाणी वाहून गेलं तरी त्यांच्या चोचीनं आभाळगाणं जिवंत ठेवलय हे जाणीव करून देणारी प्रशांत असनारे यांची कविता अलगत  उमलत जाते.

           मोर, घरट, बगीचा ,रंगपंचमी  ,मैफल या कविता मुलांना विचार देणाऱ्या आणि क- कवितेचा  या कवितेत कविता फेसाळणारी, भिजवणारी, बहरणाणारी असून दिवसभर आपल्या आत खोल उतरत जाणारी आहे.


          प्रशांत असनारे यांची कविता विविधांगी आहे.त्यांनी कुमार कवितेमध्ये कुठेच यमक जुळवणारी कविता लिहिली नाही तर मुक्त छंदातली कुमार कविता लिहून साहित्यात एक नवा प्रयोग केला आहे .त्यांच्या कवितांना विषयाचे वावडे नाही .

सजगपणा जपत कुमारांच्या धिटाई आणि कलंदरपणाचे दर्शन घडवत निघालेली ही कविता निश्चित मुलांच्या भावविश्वाला संरक्षण देणारी आहे असे वाटते .


वीरभद्र मिरेवाड 

नायगाव (9158681302) 


मोराच्या गावाला जाऊया 

(कुमार काव्यसंग्रह) 

प्रशांत असनारे 

प्रकाशन: अष्टगंध प्रकाशन, ठाणे 

मूल्य:200 पृष्ठे: 52

मुखपृष्ठ व चित्रे: संतोष घोंगडे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)