सामान्य स्त्रीतील असामान्यत्व शोधणारी कादंबरी - डिळी

शालेयवृत्त सेवा
0


सुचिता खल्लाळ यांची डिळी-कृषक व्यवस्था अन श्रमण संस्कृतीतील स्त्रीचा आर्त टाहो




        एकविसावे शतक संगणकाचे आणि सोशल मीडियाचे आहे, ग्रामीण समाज जीवनावर या गोष्टींचा परिणाम होणे साहजिक आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण भाग सुधारण्यासाठी वेगवेळ्या प्रेरणा मिळत गेल्या त्यापैकी साखर कारखाने आणि शेतीचे आधुनिकीकरण या गोष्टींच्या माध्यमातून ग्रामीण भागात थोडी आर्थिक सुबत्ता आली हे नाकारता येणार नाही. परंतु समृद्धीतून, आर्थिक सुबत्तेतून येणारा ऐदीपणा आला तसेच सहकाराच्या माध्यमातून पंचायत स्तरावर असणारं गावाचं राजकारण विस्तारलं, त्यातून गुण्यागोविंदानं राहणाऱ्या खेड्यात राजकीय मतभेद सुरू झाले. या आणि अशा अनेक नव्या समस्यांना तोंड फुटले. अनेक नवे प्रश्न, नवी आव्हाने, नवीन संघर्ष निर्माण झाले. समृद्धीची कलवरी असावी अशी व्यसनाधीनता या काळात जास्त फोफावली, सोशल मीडियाच्या माध्यमातून याकाळात युती आघाडीचं अस्थिर राजकारण गावागावात पोहचलं आणि गावोगावचे छोटे पुढारी कामाला लागले. गावातला तरुण वर्ग भ्रमिष्टासारखा त्यांच्या मागे जाऊ लागला त्यामुळे घराची, शेतीची सगळी जबाबदारी घरातल्या बाईवर आली. डिळी अशाच एका घरावर तुळशीपत्र ठेवलेल्या राजकीय कार्यकर्त्याच्या बाईची कहाणी आहे.

कोणतीही कलाकृती ही त्या काळाचे, त्या परिसराचे अपत्य असते, डिळीही त्याला अपवाद नाही. डिळी या कादंबरीचा विषय मुख्यतः दोन गोष्टीवरून आला आहे दि 9 एप्रिल 2019 रोजी 'द हिंदू' या आघाडीच्या वर्तमानपत्रात आलेली बातमी आणि या बातमीच्या आसपास ग्रामीण जीवनात घडत असलेल्या घडामोडी, तत्कालीन ग्रामीण राजकीय पार्श्वभूमी ही डिळीची जमीन आहे. या जमिनीवर लेखिका सुचिता खल्लाळ यांनी हे कसदार पीक घेतले आहे. प्रत्येक निर्मितीच्या मागे एक प्रक्रिया असते. चिंतन, मनन, आकलन, स्वानुभव अन निरीक्षण या दिव्यातून आलेली कलाकृती चांगली कलाकृती समजली जाते. ग्रामीण जीवनाचे वास्तवपूर्ण दर्शन घडवनणे, ग्रामीण आणि नागरी समस्या व्यापक प्रमाणात मांडणे, लेखिकेची कृषक व्यवस्थेतील स्त्रीविषयी असणारी आस्था ही डिळीच्या मागची लेखनप्रेरणा आहे.

          डिळी गोदूच्या वेदनेचे काहूर आहे. परक्याचं धन गुवासमान मानणाऱ्या स्वाभिमानी गोदूची अन तिच्या भवतालाची कहाणी कांदा सोलावा तसं एक एक अस्तर सोलत सुचिता खल्लाळ यांनी मांडली आहे.

       गणेश नावाच्या लेखकापासून सुरू होणारी कादंबरी वेगवेगळी वळणे घेत गोदूच्या संघर्षमय जीवनाकडे घेऊन जाते. गणेश प्राध्यापक आणि लेखक आहे. स्वतः वातानुकूलित घरात राहून, आपल्या मागे आपल्या घराची अवस्था काय झाली आहे, गावाकडे असलेली आपली आई मेली की जिती आहे हे ढुंकूनही न पाहणारा पण फार्म हाऊसमध्ये मात्र आईचे प्रेम जिथे असेल ती झोपडी राजराजेश्वरीच्या ऐश्वर्यालाही लाजवेल, हे प्रेम जिथे नाही तो महाल व दिवानखाने म्हणजे स्मशाने होत अशी साने गुरुजींची कोट भिंतीवर लटकवणारा एक भामटा लेखक आहे. ग्रामीण भागातून आलेला पण शहरातील भौतिक गोष्टींत पुरता अडकून पडलेला पण ग्रामीण टच, पुरोगामी टच यावा म्हणून घर अन शेतात जागोजाग ग्रामीण वस्तू अन महापुरुषांचे इंस्टॉलेशन करणारा हा लेखकराव सोन्याच्या पिंजऱ्यातला पोपट होऊन बसला आहे. सुखवस्तू कुटुंबातील त्याची बायको त्याच्यावर पूर्ण नियंत्रण ठेवून आहे. गणेशची बायको शोभा त्याच्यासह आपल्या मुलांवर सुद्धा तिचे विचार लादताना दिसते तर दुसऱ्या बाजूला त्याच शहरात राहणारा प्रमोद जो मोठ्या पदावर आहे अन त्याची बायको सोनाली जी काही तरी करण्यासाठी धडपडत आहे. जीवन म्हणजे नुसते भौतिक गोष्टींची जुळवाजुळव नाही तर आपले मन, आपले विचार, आपल्या इच्छा आकांक्षा, आपले स्वप्न यासाठी काम करणारी एक स्वतंत्र विचारांची महिला आहे. सोनाली अगदी शोभाच्या विरुद्ध बाजूने विचार करणारी स्त्री आहे. प्रमोदकडे स्वतःचे तत्व आहेत, विचार आहेत, एक स्पष्ट भूमिका आहे. या दोन्ही जोडप्यांचा प्रवास सांगत सांगत कादंबरी गणेशच्या मूळ गावी पोहचते. तिथे अंथरुणावर पडून असलेली त्याची म्हातारी आई आहे. गावातल्या राजकारणाच्या स्वार्थी हेतूला बळी पडत जाणारा त्याचा भाऊ शंभू आहे. त्याची लेकरं आहेत मुरली अन गोपी. कादंबरीची मुख्य नायिका गोदू आहे जी गणेशचा भाऊ शंभूची बायको आहे. शहर अन ग्रामीण जीवन मांडताना कादंबरी कोठेही भरकटत जात नाही. गावातल्या भीषण समस्या अन शहरातल्या नवश्रीमंतांची सुखलोलुपता अन भौतिकविषयीचं भयानक आकर्षण मांडताना लेखिका जागोजागी व्यवस्थेची खरडपट्टी काढायला विसरत नाही.

     मुख्य कथानकाला जोडून चंदा आणि बेशकराव देशमुख तसेच मकरंद अन गौरी कुलकर्णी यांचे उपकथानकही जोडून येते. ते कादंबरीच्या मुख्य प्रवाहाशी, आशयाशी मेळ साधणारे असल्यामुळे कादंबरीत या पात्रांचे उपयोजन कृत्रिम न वाटता ते हवेहवेसे वाटते. चिरेबंदी वाड्याची धनीण असणाऱ्या चंदाची शारीरिक, मानसिक अन भावनिक पातळीवर होणारी घुसमट वाडे अन गढीतील ढिगाऱ्याखाली अशा अनेक स्त्रियांचे परंपरेच्या अन इज्जतीच्या नावाखाली साचलेले खच उजागर करण्याचे काम ही कादंबरी करते. ग्रामजीवनाचे सम्यक ज्ञान असल्यामुळे लेखिकेने मकरंद जोशी नावाच्या पात्राच्या माध्यमातून वास्तव परिस्थितीवर प्रश्न मांडले आहेत आणि याच मकरंदच्या तोंडून त्या समस्येची उत्तरेही सांगितली आहेत. समस्यांची जाणीव करून देणं इतकंच साहित्याचं काम नाही तर समस्येवर उत्तर शोधणं, समस्येतून मार्ग काढून जीवन सुकर कसे करायचे हे सांगण्याचे कामही चांगला साहित्यिक आपल्या कलाकृतीत करत असतो. लेखिका सुचिता खल्लाळ यांनी हे काम लीलया पार पाडलं आहे

          शहरी आणि ग्रामीण असे दोन्ही परिसर या कादंबरीत रंगवले असले तरी यात शहर विरुद्ध खेडे असा संघर्ष नाही कारण शहरातील पात्रांची मुळं खेड्यात आहेत. त्या पात्रांच्या जाणिवेत जरी शहर असेल तरी नेणिवेत खेडेच आहे. यातून शहरी आणि ग्रामीण व्यवस्थेचे चित्रण करण्यात लेखिका यशस्वी झाल्या आहेत. चंदा आणि गोदू या भिन्न भौतिक आणि आर्थिक परिस्थिती लाभलेल्या स्त्रिया असल्या तरी दोघींनाही संघर्ष चुकलेला नाही. गोदू आर्थिक तर चंदा भावनिक दारिद्र्यात जगत आहेत. या दोन पात्रांच्या माध्यमातून लेखिकेने समाजव्यवस्थेचे नागडेपण, भौतिक आणि आर्थिक विषमता मांडली आहे.

        संवादातून व्यक्त होणारी प्रबोधनात्मकता आणि मातीचा वास असणारी बोलीभाषा यामुळे डिळी संपूर्ण ग्रामीण जीवनाशी समरस झाली आहे. बोलीमुळे डिळीच्या भाषेने मराठी वाङ्ममयाच्या भाषिक वैभवात बहुमोल भर घातलेली आहे. डिळीमध्ये बोली, प्रमाण अन आंग्ल भाषेतून शहरी भाषेत आलेल्या शब्दांचा पुरेपूर वापर केलेला आहे. सुविचार सदृश्य वाक्यांची पेरणी करणारी शैलीदार भाषा अशी कितीतरी भाषिक अंगाने येणारी वैशिष्ट्ये या कादंबरीची आहेत.

खपुरा, नड, बगा, खटलं, पाडून टाकणे, जांगडगुत्ता, कोंटा, चंदी , सालगडी, वाढीदिडी, बईलगाडी, आनेशा, बाका, भुशान , झ्याट, काठवट, उनवनी, आधान, हाटने, पापुडा, सकोन, दाशिना, घाळण, कुड, सांद, लाहचर, भुक्कड, बख्खळ, ऐदी, पारोशी, वानोळा, महिनकाम, कोरड्यास, मनवा, आबघालेपणा, टकळी, कोळ, लुसलुस हे बोलीतील शब्द आणि हुलहुल्या वाणाचा, लाहाचर, ऐदी ही मानवी वैशिष्ट्ये सांगणारी बोलीतील वाक्प्रचार तसेच नागर संस्कृतीत सर्रास मराठी बोलताना वापरले जाणारे शब्द जसे पेजिंग, मार्जिन , ऑडिशन, टायपिंग, डीटेक्ट, न्युमरिक की, स्लीप, अर्जंट, फॅशन शो, ऑप्शन, ओव्हर अँड आऊट, प्रूफ, ऑनड्युटी, डिझायनिंग, मॉडेलिंग, क्रिएशन, रॅम्प, प्रेझेंटेशन, ट्रेण्ड, मान्युमेंट्स, स्वीमिंग टँक, वॉचमन, गार्डन, क्वार्टर, रुरल लूक, इंस्टोलेशन, थीम, फार्म हाऊस, मिनीबार, डायनिंग, सीलिंग, कोट्र्याडीक्शन, कल्टीवेटेड लॉन, पॅनिक, अंडरइस्टिमेट कलिबर, टॅलेंट, नॉन स्टॉप, जस्टिफाय, करपशन, मॅनकिन, फेमिनिस्ट इ. आंग्लभाषेतून आलेले शब्द आशयाची गरज म्हणून आलेले आहेत. या शब्दांमुळे मराठी वाङ्मयात शाब्दिक भर पडली म्हणायला हरकत नाही.

डिळीत अनेक सुविचार सदृश्य वाक्य आले आहेत. जसे गढी वाड्याच्या ढिगाऱ्याखाली कितीतरी खच साचलेले असतात, सोपं नसतं चिरेबंदी वाड्याची धनीण होणं, रानातली सुगी म्हणजे कुनब्याच्या कपाळावर सटवाईनं लिव्हलेला टाक अस्तूया, खाऊन माजाव परिक टाकून माजू नये, काळी आई एकाच वेळी कुनब्याची मायबी अस्तिया आन लेकरुबी लेकरावणी वळखून घ्यावं लागतं तिचं दुखणं खुपणं तवा तीबी माईच्या मायेनं अफाट माया करते, सोन्याची सुगी देऊन, भुईच अस्तर म्हणजे काळरान तसं बाईचं अस्तर म्हणजे वटीपोट, पैसा बारला गाभारा आन पैसेवाल्याला देव बनवतो, व्यवस्था ही अलिखित असमानतेचे प्रतीक आहे, नोकरी म्हणजे कृष्णानं द्रौपदीला दिलेलं अक्षयपात्र नसतं तसेच किती आषाढी ढग झरझर सरकत जातात तिच्या भिरभिर नजरेत एका क्षणात संपूर्ण आषाढ अनुभवता येतो. सैरभैर हरिणीचे तिचे डोळे शकू सारखेच, आभासी का असेना, टिकवून ठेव अस्तित्वाचा भास. बेमालुल मुखावट्यात वावरता येणं ही गुणवत्ता आहे आज घडीला, अशा काही वाक्यातून सुचिता खल्लाळ यांच्यातील कवयित्री अधून मधून डोकावत राहते पण ही कवयित्री गद्याच्या आशयाला मारक नाही तर पोषक आहे, हे कवीपण डिळीला खतपाणी घालणारे आहे.

         डिळीमध्ये कोणत्याही पात्राचा जास्त लाड न करता प्रत्येक पात्राला वास्तवाच्या पातळीवर ठेवलं आहे. पाटील, देशमुख यासारख्या परंपरागत शोषण व्यवस्थेला फाटा देऊन भ्रष्ट अधिकारी, स्वार्थी राजकीय नेते, निष्ठावान पण अल्पभूधारक कार्यकर्ते, देशमुखांच्या गढीखाली साचलेला खच उपसणारी चंदा, काळ्या मातीचे लढाऊ गुण असणारी गोदू, ग्रामीण हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतीक असणारी अमिनासारख्या धीरोदात्त, लढवय्या स्त्रिया, सोनालीसारखी नागर संस्कृती वाढलेली महत्वाकांक्षी स्त्री, भौतिक सुखालाच श्रीमंती समजणारी शोभासारखी अल्पबुद्धिमत्ता असणारी नागरी जीवनाची दुसरी बाजू मांडणारी स्त्री, शेतीला पूरक व्यवसायाची जोड लावून आधुनिकीकरणाची कास धरणे आवश्यक आहे, हे आग्रहीपणे मांडणारा मकरंद, स्वाभिमान गमावून बसलेला गणेश, अधिकारी-कर्मचारी वर्गाची आर्थिक बाजू किती कमकुवत असते, वरून दिसणारे फुगीर वारूळ आता किती पोकळ असते अन फी अन हप्ते नावाचे किती नाग या वारुळात फुत्कारत असतात हे सांगणारा प्रमोद. शारीरिक, मानसिक अन भावनिक अशा तिन्ही पातळीवर असमाधानी असूनही घराण्याची इज्जत राहावी म्हणून कुधड संसार वढत नेणारी चंदा, बाळासाहेब अन बेशकरावसारखे मुरब्बी अन तितकेच बेरकी राजकारणी, वर्ग कोणताही असो पुरुषी अहंकार प्रत्येक जातीत ठासून भरलेला आहे, हे मी बाईसारखं तपकीर वढत नाही हे सांगणारा झेल्या कांबळे, राजकारणाच्या व्यसनाने ग्रस्त असणारी शंभू अन त्याची गॅंग, मूठभर उच्चवर्णीयांच्या समस्यांना साहित्यात भरभरून स्थान मिळते पण इथे शेतीत खपणारा आणि स्वतःची शेती नसणारा भूमिहीन मजूर मात्र उपेक्षित राहतो. त्यालाही साहित्याच्या कक्षेत आणण्याचं काम लोटू, पारू, तात्याबा, अमिना आजीचा नातू, झेल्याची बायको, झेल्याच्या माध्यमातून लेखिकेने उजागर केले आहे.

       डिळीमध्ये येणाऱ्या प्रतिमा या ग्रामीण आहेत, अस्सल आहेत. डिळी ही प्रतिमा संबंध कादंबरीभर येत राहते. घराला असणारी डिळी ही गोदूच्या माहेरावरून आणलेली आहे असं लेखिका जेव्हा गोदूच्या तोंडून सांगते तेव्हा ती केवळ डिळी राहत नाही तर ते माहेरावरून आलेले संस्कार, धीरोदात्तपणा, संघर्षाची तयारी होते. आपण पुरोगामी दिसावं म्हणून गणेश आपल्या लेकरांची नावे गार्गी अन कबीर ठेवतो हा खोटेपणा ही अतिशय प्रतीकात्मक रित्या मांडला आहे. बाळासाहेब हे पात्र कादंबरीत एकदाही प्रत्यक्षपणे येत नाही पण त्या पात्राचा बेरकीपणा, स्वार्थी राजकारण सतत डोकावत राहतं. तिसरीही मुलगी होणाऱ्या बापाच्या मोबाईलची रिंगटोन बाल ब्राम्हचारी बजरंग बळीची आरती असणं ही एक सुंदर व्यंगात्मक प्रतिमा आहे.

         ग्रामव्यवस्था, खेडे यांचे वास्तवदर्शी व जिवंत चित्रण हे दिळीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. आशयाशी प्रामाणिकता बाळगणारी निवेदनशैली हे डिळीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. तत्त्वज्ञान आणि सामाजिक शास्त्र यांचा लेखिकेचा असणारा अभ्यास कादंबरीच्या पानोपानी दिसून येतो. भौगोलिक परिसर आणि सामाजिक स्वरूप मांडताना आजच्या ग्राम्य जीवनाचा लेखिकेला पुरेपूर अभ्यास आहे, डिळीमधून साकार झालेला परिसर मराठवाड्यातील ग्रामीण परिसर आहे, डिळीने साहित्यक्षेत्रात असणारा मराठवाड्याचा अनुशेष भरून काढला आहे असं म्हणायला हरकत नाही. ग्रामीण साहित्यात आढळणारी नकारात्मकता डिळीमध्ये आढळत नाही.

प्रवाही कथानक, प्रसंगाची नाट्यपूर्ण मांडणी, वेगळा विषय, मन सुन्न करणारा शेवट अशा वैशिष्ट्यांबरोबरच डिळीच्या काही मर्यादाही आहेत जसे टमाटे विकण्याचा प्रसंग टाळता येण्याजोगा होता तो प्रसंग वाचताना उगाच एका प्रसिद्ध कथेची आठवण होते. तसेच ग्रामीण जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग असणाऱ्या निसर्गाचे चित्रण या कादंबरीत म्हणावे तितके आले नाही या कादंबरीच्या मर्यादा जरूर आहेत पण लेखिकेला ग्रामीण स्त्रीचा संघर्ष आणि नवनागरी जीवनाचा फोलपणा मांडायचा असल्यामुळे या बाबी तितक्याशा खटकत नाहीत.

           कुणबी स्त्रीच्या व्यथा, वेदना समस्या यांना उजागर करण्याचे काम डिळी करते. जीवनवादी दृष्टिकोनातून लिहलेली ही कादंबरी गोदूच्या माध्यमातून समग्र कुणबी स्त्रीच्या अंतरंगाचा शोध घेण्यात यशस्वी झाली आहे. जिव्हाळ्याने उभे केलेले गोदूचे पात्र प्रत्ययकारी आहे. संवेदनशील मनाचा, सर्जनशील माणूस काळाचा घटनेचा साक्षीदार असतो, समाजाची प्रगती अधोगती यातील बारकाव्यावर त्याची नजर असते त्यातून मग डिळी सारखी अजरामर कलाकृती जन्माला येते.

वाचकांच्या मनात अस्वस्थता निर्माण करणारी अन वाचल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित करणारी कलाकृती ही सर्वोत्तम कलाकृती असते या निकषावर डिळी तंतोतंत बसते. लिहिणारी स्त्री शक्यतो उंबरठ्या बाहेरचे लिहीत नाही हा सर्वसामान्यपणे केला जाणारा आरोप लेखिका सुचिता खल्लाळ यांनी मोडीत काढलेला या कादंबरीत दिसून येतो. एखादी चांगली कलाकृती वाचून संपल्यावर वाचकाला आपला मृत्यू झाल्याचा भास होतो. कारण तो त्या कलाकृतीत, त्यातील पात्रात, वातावरणात स्वतःला पाहत असतो. वाचकाचं वाचताना रममाण होणं अन कलाकृती संपणं हे मृत्यू इतकंच भीषण असतं असं म्हणतात आणि डिळी वाचल्यानंतर हा मरणानुभव नक्की येतो.


कादंबरी- डिळी

लेखिका- सुचिता खल्लाळ

प्रकाशन-शब्दालय,श्रीरामपूर

किंमत-290(हार्ड कव्हर कॉपी)

(सध्या बुकगंगावर 25 टक्के सवलतीत उपलब्ध आहे)

(ॲमेझॉनवरपण आहे)


मनोहर बसवंते / नांदेड

8830322659

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)