|| एक दीप 🪔
एक दीप ज्ञानाचा
एक दीप एकतेचा
अंधार दूर करणाऱ्या
एक दीप उजेडाचा..
भुकेने व्याकुळ झोपलेल्या
भुकेल्या वाटसरूंना
चार गोड घास भरवणाऱ्या
एक दीप त्या हाताचा..
शाळेपासून कोसो दूर
शाळाबाह्य मुलांना
शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या
एक दीप त्या बोटाचा..
भरकटणाऱ्या मुलींना
जबाबदारीचे भान ठेवून
पालकांच्या स्वाधीन करणाऱ्या
एक दीप त्या टोपीचा..
आजारावर फुंकर घालून
देवात माणूस की
माणसात देव शोधणाऱ्या
एक दीप त्या स्टेथस्कोपचा..
करून सारे दुःख बाजूला
दिनरात मशागत केलेल्या
तुमचे आमचे पोट भरणाऱ्या
एक दीप त्या नागराचा..
प्रदूषणाने सारे हैराण होताना
पर्यावरणाच्या जबाबदारीने
स्वच्छता -वृक्षारोपण करणाऱ्या
एक दीप त्या मजबूत हाताचा..
परिस्थिती कशीही असो
हातावर पोट घेऊन
लेकरांचे भले चिंतनाऱ्या
एक दीप त्या माय बापाचा..
एक दीप ज्ञानाचा
एक दीप एकतेचा
अंधार दूर करणाऱ्या
एक दीप उजेडाचा..
-रमेश मुनेश्वर / किनवट
१ नोव्हेंबर २०२४ ( दोपोत्सव )
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .