क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर

शालेयवृत्त सेवा
0

 



५ सप्टेंबर शिक्षक दिनी मुंबई येथे होणार वितरण

मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :

       क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत. सदर पुरस्कार वितरण कार्यक्रम दि. ५ सप्टेंबर, २०२४ या शिक्षक दिनी मुंबई येथे होणार आहे.

        समाजाची नि:स्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात.

         राज्य शिक्षक पुरस्कार योजना १९६२-६३ पासून महाराष्ट्र राज्यात कार्यान्वित असून, ती शालेय शिक्षण विभागांमार्फत राबविली जाते. सन २०२१-२२ पासून राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारीत करून सदर पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने राबविण्यात येत आहेत. दिनांक १३ जून, २०११ च्या शासन निर्णयान्वये पुरस्काराची रक्कम रु.१०,०००/-(रुपये दहा हजार फक्त) अदा करण्यात येते. तसेच राष्ट्रीय / राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दिनांक ४ सप्टेंबर, २०१४ च्या शासन निर्णयान्वये ठोक रक्कम रुपये १,००,०००/- (रुपये एक लाख फक्त) अदा करण्यात येते.

         सन २०२३-२४ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शिक्षकांची अंतिम निवड करण्यासाठी दिनांक २८ ऑगस्ट, २०२४ रोजी राज्य निवड समितीची ऑनलाईन बैठक झाली. राज्य निवड समितीने संदर्भ क्र.६ येथील दिनांक ३० ऑगस्ट, २०२४ च्या पत्रान्वये शिक्षकांची गुणानुक्रमे प्रवर्गनिहाय निवड यादी शासनास सादर केली. त्यानुसार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार घोषित करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.


शासन निर्णय :

सन २०२३-२४ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी राज्य निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्तरावर प्रवर्गनिहाय १०९+१ शिक्षकांची खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निवड केली आहे.

प्राथमिक - ३८ + १

माध्यमिक - ३९

आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक (प्राथमिक) - १९

थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका - ८

विशेष शिक्षक कला/क्रीडा (१+१) - २

दिव्यांग शिक्षक/ दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक स्काऊट/गाईड (१+१) - २

एकूण पुरस्कार संख्या - १०९+१


वर्धा जिल्ह्यातील प्राथमिक प्रवर्गातील (१) न्यायालयाच्या आदेशानुसार विचारात घेण्यात आलेला पुरस्कार सन (२०२२-२३).

       क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांची नावे या सोबत जोडलेल्या परिशिष्ट १ ते ७ प्रमाणे जाहीर करण्यात येत आहेत. सदर पुरस्कार वितरण कार्यक्रम दि. ५ सप्टेंबर, २०२४ या शिक्षक दिनी मुंबई येथे होणार आहे.

       सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०९०२१७४८१८०३२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)