तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत जिल्हा परिषद कारला शाळेचे नेत्रदीपक यश

शालेयवृत्त सेवा
0

 


नांदेड ( शालेय प्रतिनिधी ) :

       जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत सुरू असलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा 2024-25 या शैक्षणिक वर्षातील उमरी तालुकास्तरीय कृष्णा विद्यालय सिंधी येथे बुधवार रोजी पार पडली. त्यातील सांघिक खेळ खो-खो मध्ये जि. प. प्रा. शा. कारला येथील मुलींच्या संघाने नेत्रदीपक कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकावला.

          विजेत्या संघाचा गावकऱ्यांनी गाडीमध्ये बसवून मिरवणूक काढली. या यशाबद्दल टीममधील सर्व मुलींचे गावातील सरपंच दिलीप पाटील पवळे, उपसरपंच व्यंकट पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारोती जयवंता पवळे, उपाध्यक्ष केशवरावजी पुलकंटे यांनी सर्व खेळाडूंचे पुष्पहार घालून कौतुक केले. त्याचबरोबर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी नंदकुमार कुलकर्णी यांनी वेळोवेळी स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन त्यांच्यात उत्साह वाढवला. अभ्यासासोबत खेळही विद्यार्थ्यांच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते खूप मोठी कामगिरी बजावत असतात. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे खूप मोठे काम या खेळाच्या माध्यमातून होते.

           ग्रामीण भागातील मुलींनी एवढी मोठी कामगिरी करणे हे सोपे काम नाही, या शाळेतील शिक्षकांनी प्रचंड मेहनत घेऊन हे यश संपादन केले आहे. मुलींचा ग्राउंडवरील खेळ पाहताना, या टीमची मेहनत नक्कीच लक्षात आल्याशिवाय राहणार नाही, ज्यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक गजानन जाधव, शिक्षक खंडु नागरगोजे, ज्ञानोबा मुंडे, प्रदिप शिंदे, संतोष कुलकर्णी, पंच किरन कंधारे या शिक्षकांचा समावेश आहे. 

          कारला शाळेची घोडदौड एकाच क्षेत्रात नाही तर त्यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता, भौतिक सुविधा, शालेय सजावट, विद्यार्थी सुरक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम यासह इतर क्षेत्रातही खूप मोठी कामगिरी केली आहे व खऱ्या अर्थाने शाळेचा व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास त्यांनी घडवून आणला आहे. गावातील सर्व पदाधिकारी, नागरिकानी शाळेच्या यशाबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)