आई-वडिलांना वेळ देण्यासाठी आसामात पगारी सुटी
गुवाहाटी ( शालेय वृत्तसेवा ) :
कर्मचाऱ्यांना पालक आणि कुटुंबासोबत वेळ घालवता यावा, यासाठी सरकारने दोन विशेष सुट्या दिल्या आहेत. या विशेष रजेचा कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक कामासाठी वापर करू नये. ज्या कर्मचाऱ्यांचे आई-वडील किंवा सासू-सासरे नाहीत ते या रजेसाठी पात्र असणार नाहीत, अशा आशयाचे आदेश आसाम राज्य सरकारने काढले असून, यामुळे भारतीय कुटुंबव्यवस्था सुदृढ होण्यास मदत होईल, असे म्हटले आहे.
आसाम सरकारने नोव्हेंबरमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना दोन विशेष सुट्या जाहीर केल्याने त्याचे सर्वच स्तरांतून स्वागत होत आहे.
आसामच्या सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा -
मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली आसाम सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पालकांसोबत वेळ खर्च करण्यासाठी दोन विशेष सुट्या (६ ते ८ नोव्हेंबर) देण्याचा निर्णय घेतला आहे. या सुट्यांचा उपयोग फक्त पालकांची काळजी घेण्यासाठी, त्यांच्यासोबत वेळ घालवण्यासाठी केला पाहिजे. कर्मचारी त्यांच्या वैयक्तिक कामासाठी यांचा वापर करू शकत नाहीत.
या सुट्यांसह कर्मचाऱ्यांना ७ नोव्हेंबर रोजी छटपूजेचा आनंदही घेता येणार आहे. याशिवाय ९ तारखेला शनिवार आणि १० तारखेला रविवार आहे. २०२१ मध्येही पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री सरमा यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकांसोबत वेळ घालवण्यासाठी दोन विशेष सुट्यांची घोषणा केली होती.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .