आता प्रत्येक शनिवारी भरणार दप्तराविना शाळा
सोलापूर ( शालेय वृत्तसेवा ) :
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील शाळेची पहिली घंटा १५ जूनला वाजणार आहे. पण, १२ जूनपासूनच सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना शाळेत पूर्वतयारीसाठी यावे लागणार आहे. शाळा परिसर, वर्गखोल्या, मैदान, किचन शेड, मुख्याध्यापक कक्ष, ग्रंथालय, प्रयोगशाळा, वाचनालयाची स्वच्छता करण्यासाठी १२ ते १४ जूनपर्यंत शिक्षक, मुख्याध्यापक शाळेत येतील, असे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिले आहेत.
शाळा सुरू झाल्यानंतर सर्व शिक्षकांनी गुणवत्ता वाढीचे वार्षिक नियोजन करताना मासिक नियोजन, घटक, मूल्यमापन नियोजन करणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांची अध्ययनस्तर निश्चिती करण्यासाठी सर्व पूर्वतयारी करून घ्यावी लागणार आहे. गुणवत्तेचा वार्षिक आराखडा तयार करणे, शिष्यवृत्ती परीक्षा, जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा, प्रज्ञाशोध व अन्य सर्व स्पर्धा परीक्षांची तयारीही शिक्षकांना करून घ्यावी लागेल.
१२ जूनला शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन त्यात संपूर्ण वर्षाचा शैक्षणिक आराखडा तयार करावा लागणार आहे. १३ जूनला माता-पालक सभा आयोजित करून त्यात विद्यार्थ्यांची नियमित हजेरी राहावी, यादृष्टीने पालकांना सूचना केल्या जाणार आहेत. १४ जूनला सर्व शिक्षकांना गृहभेटी देऊन शाळेच्या पहिल्या दिवशी सर्वच विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहावे यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
आठ समित्यांच्याही होणार निवडी :
१२ जूनला शाळा व्यवस्थापन समितीची बैठक तर १३ जूनला माता-पालक सभा होईल. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती, शालेय पोषण आहार समिती, परिवहन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, सखी सावित्री समिती, विशाखा समिती, तक्रार निवारण समिती, याच्या निवडी होणार आहेत. या समित्यांमध्ये ज्या पालकांचे विद्यार्थी शाळेत आहेत त्यांचाच समावेश असणार आहे.
शाळांना शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचना :
पहिलीतील विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्वक, आनंददायी पद्धतीने स्वागत करताना उंट, घोडागाडी, टांगा, बैलगाडी, दुचाकी, चारचाकीतून सवारी घडवून आणावी.
१५ जूनला गावातून प्रभातफेरी काढावी, स्वच्छता, पाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन, बेटी बचाव, बेटी पढाओबाबत जागृती करावी.
पहिल्या दिवशी शाळेत येणारे सर्व रस्त्यांची स्वच्छता, सडा, रांगोळी, पानाफुलांचे तोरण, ध्वनिर्वधकावर देशभक्तिपर गाणी व बालगीते ऐकवणे.
विद्यार्थ्यांना गोड खाऊ द्यावा, पाठ्यपुस्तके व गणवेश पहिल्याच दिवशी द्यावा, प्रत्येक विद्यार्थ्यास स्वत:चे नाव लिहिलेले आकर्षक कार्ड (ओळखपत्र द्यावे)
‘माझा आजचा दिवस’यावर विद्यार्थ्यांकडून स्व:नुभव उपक्रम घ्यावा, तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी लेखन स्वरूपात तर पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांना तोंडी स्वरूपात उपक्रम राबवावा.
आता प्रत्येक शनिवारी भरणार दप्तराविना शाळा :
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने आठवड्यातील प्रत्येक शनिवारी आनंददायी शनिवार हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यादिवशी विद्यार्थ्यांना दप्तराशिवाय शाळेत यावे लागेल. ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमाअंतर्गत त्या दिवशी प्राणायम, योगा, ध्यानधारणा यासह विविध कृती व खेळाचे उपक्रम शाळांमध्ये होतील, असेही शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .