अभ्यास ही एक तपश्चर्याच असते ...! विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात डॉ नांदेडे यांचे प्रतिपादन. .

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

      परीक्षेसाठी करावयाचा अभ्यास ही एक प्रकारची तपश्चर्याच असते.  ही तपश्चर्या  जितकी एकाग्र होऊन कराल  तितके  यशाचे प्रमाण वृध्दींगत होत जाते. विद्यार्थ्यांच्या या तपश्चर्येला  शिक्षक, शाळा आणि पालकांनी साथ दिली की विद्यार्थ्यांच्या ध्येयप्राप्तीचा मार्ग प्रशस्त होतो असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ गोविंद नांदेडे यांनी प्रतिपादन केले आहे. ते गोकुळ नगरातील अशोक विद्यालयातील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ  आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय समारोप करताना बोलत होते. 

       याप्रसंगी  सम्यक पवार या विद्यार्थ्याचा  सुवर्ण तर  नंदिनी साखरे  या विद्यार्थिनीस रौप्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या शाळेतील एकोणविस  विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान यश मिळाले आहे . सम्राट अशोक विद्यालयाच्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी या परीक्षेसाठी घेतलेल्या अहर्निश परिश्रमाचे कौतुक करून  यशवंत विद्यार्थ्यांच्या पालकांचे ही  घरातील वातावरण पोषक ठेवल्याबद्दल त्यांनाही सन्मानित करण्यात आले.  

             कार्यक्रमाचा प्रारंभ राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून कंधार पंचायत समितीचे पूर्व सभापती  बालाजीराव माधवराव पांडागले उपस्थित होते .. आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थी भवितव्यासाठी  विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या समन्वित प्रयत्नांची गरज प्रतिपादन केली. 

          या प्रसंगी  सुवर्ण पदक विजेता विद्यार्थी  सम्यक पवार , रौप्य पुरस्कार विजेती नंदिनी साखरे  आणि इतर विद्यार्थ्यांची भाषणे झाली.   शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच  आम्हाला यश मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी  व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका  श्रीमती सरोज पेठे यांनी केले. डॉ सुधाकरराव देव यांनी ही यशस्वी विद्यार्थ्यांशी हितगुज केले. त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीचा मूलमंत्र विद्यार्थ्यांना सांगितला. कार्यक्रमाचे आभार  प्रदर्शन मुख्याध्यापक  श्री  एल एल वणांजे यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिक्षिका लक्ष्मी  नांदेडे पांडागळे  यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)