आयास : जगण्याच्या संघर्षाला दीपस्तंभ ठरलेली कादंबरी..

शालेयवृत्त सेवा
0






           डॉ. शंकर विभुते हे बहुआयामी लेखक आहेत. कथा, कादंबरी आणि समीक्षा या प्रांतात त्यांची लीलया लेखन असले तरी कादंबरी हा त्यांचा जिव्हाळ्याचा आणि चिंतनाचा वाङ्मय प्रकार राहिलेला आहे. जवळपास दहा पुस्तकांच्या निर्मितीचा सकस वाङ्मयाचा विचार करता त्यांच्या प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर वर्धिष्णू राहिलेला आहे. 'आयास' या कादंबरीमध्ये तर मानवी जगण्याचा एक वस्तुनिष्ठ असा विशाल पट उभा केला आहे. पौगंडावस्थेतील एक अनघड, भोळा भाबडा पण अन्यायाविरुद्ध मजबूतपणे उभा राहणारा कादंबरीचा संग्राम नावाचा नायक वाचकांच्या मनावर शेवटपर्यंत अधिराज्य गाजवतो.

            महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटकाच्या सीमेवर असलेले महादेववाडी हे गाव डॉ. शंकर विभुते यांच्या 'आयास' या कादंबरीचे केंद्र आहे. सुमारे ६० ते ७० वर्षाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, नैतिक परिवर्तनाची स्पंदने या कादंबरीमध्ये आढळतात. सरंजामशाहीने घातलेले थैमान, लोकशाहीची बदलत चाललेली कुस, मानवी नात्यांची गुंतागुंत अस्मानी, सुलतानी संकटात भरडत चाललेला भूमिपूत्र आणि एकूणच समकालीन परिस्थितीमधले भेदक नाट्य हे डॉ. शंकर विभुते यांची लेखणी अतिशय सावधपणे आणि कुशलतेने 'आयास' या कादंबरीमध्ये मांडत आहे. सीमा भागात बोलली जाणारी विशिष्ट हेल काढून आविस्कृत होणारी मीश्र भाषा हे 'आयास' कादंबरीचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये होय. लेखकाचे भाषाभान अधोरेखित करावे असे आहे. विविध भाषांनी प्रभावित झालेली मायबोलीत वाक्याच्या शेवटी 'लोक' हो' लावायचे. जसं की, "पावणं कधी आलास हो? जेवलास की हो? वैगरे वैगरे.

          पराकोटीच्या परिश्रमाचे दुसरे नाव म्हणजे संग्राम होय. म्हणूनच आयास हे शीर्षक अतिशय बोलके असून लेखकाने ही कादंबरी कष्टकऱ्यांना समर्पित केली आहे. या कादंबरीच्या आपल्या छोटेखानी मनोगतात लेखकाने एका महत्त्वाच्या विषयाला स्पर्श केला आहे. मराठी कादंबरी भारतीय कादंबरी म्हणून उभी राहिली नाही या बहुचर्चित विधानावर आपले परखड मत व्यक्त केले आहे. जगात काही राष्ट्रे अशी आहेत की, तिथे एक भाषा, एक संस्कृती, एक धर्म आहे. तेथील लेखकांनी लिहिलेली साहित्यिकृती ही त्या देशाची म्हणून ओळखता येईल पण ज्या देशात अनेक भाषा, धर्म,पंथ, जाती, संस्कृती अन रितीरिवाज आहे. अशावेळी या विविधतेतून आलेला प्रत्येक अनुभव हा भारतीयच असतो. अशी विविधता असली तरी मानवीवृत्ती प्रवृत्तीचा स्थायीभाव मात्र एक जिनसी असतो. अशी कादंबरी पूर्ण भारतीय संस्कृतीचेच प्रतिनिधित्व करते असा विश्वास लेखक डॉ. शंकर विभुते यांनी व्यक्त केला आहे.

            या कादंबरीचा नायक संग्राम हा अन्याय विरुद्ध उभा राहतो. आपल्या पंखात बळ कमी आहे, आपल्या मर्यादा काय आहेत याची त्याला जाणीव आहे. तरीही अन्याय करणे जसा गुन्हा आहे तसा अन्याय सहन करणे हा पण गुन्हा आहे याची त्याला जाणीव आहे. प्रताप देसाई हा या कादंबरीचा खलनायक आहे. गावाला बटीक समजण्याची प्रवृती त्याच्या रक्तातच आहे. गावातील गरिबांच्या तरण्या-ताठ्या मुली हे त्याचे लक्ष्य आहे.  प्रतापरावांच्या प्रतापामुळे असुरक्षित असलेले गाव म्हणजे स्वातंत्र्य कालखंडातली गुलामीत राहिलेले एक बेट होय. या सर्व गुलामीचा अन्यायाचा साक्षीदार असलेला संग्राम कोवळ्या वयातच अधिक  सुजाण होतो.अन्यायाविरोधात त्याचे रक्त उसळून येते. घेतो.

            पुढे सरंजामशाहीचे गुंडगिरीचे संकट प्रत्यक्ष संग्रामाच्या घरावरच येते. तेव्हा मात्र परिणामाची परवा न करता संग्राम अंतर्बाह्य पेटून उठतो. संग्रामचा मोठा भाऊ लालू याच्या तरुण पत्नीवर प्रतापरावाचा डोळा असतो. प्रतापराव तिला जाळ्यात ओढतो अन या अनैतिक संबंधांना अडचण ठरणाऱ्या लालूचा काटा काढतो. त्याचा खून करतो. मग अशावेळी संग्राम चे सळसळणारे नव्या दमाचे रक्त कसे शांत राहील? परिणामी जीवाची, परिवाराची परवा न करता संग्राम प्रतापरावाचा खून करतो. स्वतः त्याची कबूल येतो. त्याला अटक होते. त्याच्यावर खटला चालतो. त्याच्याकडे  वकिलाला द्यायला फीस पण नाही. पण सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नागापूरकर नावाचा वकील त्याच्या मदतीला धावून येतो. नाबालक मुलगा आहे. त्याचे वय कमी आहे. एका बलाढ्य माणसाचा खून तो करीलच कसा? अशी थेअरी मांडत नागापूरकर वकील यशस्वी होतो. अन्  संग्राम निर्दोष सुटतो. अन्  इथूनच मग या कादंबरीचा खऱ्या अर्थाने प्रारंभ होतो. 

            संग्रामला या कादंबरीत उभं करताना शंकर विभुते यांची लेखणी अंनालकृत होते.अतिशय स्वच्छ अन्  मनाला भिडणारी लेखकाची भाषा वातावरण निर्मितीसाठी कोणताही मुखवटा धारण करीत नाही. कोर्टातून निर्दोष सुटल्यावर नागपूरकर वकील संग्रामकडून कसलीच अपेक्षा करीत नाही. उलट त्याच्या हातावर दहा रुपये ठेवतो. आणि इथूनच सुरू होतो संग्रामच्या जीवनाचा 'आयास'. हे परिश्रम,हे कष्ट अन् ही बांधिलकी उभी करताना शंकर विभुते यांची संवेदनशील लेखणी मुक्तपणे कागदावर उतरते.ही संवेदनशीलताच कादंबरीचे बलस्थान होय. 

              सीमाभागातील महाराष्ट्रीयन लोकांना तेलंगणातील लोकांचा खूप हेवा वाटत असे. त्याचे कारण म्हणजे तेथील सरकार त्यांना कोपनवर महिन्याला दोन पायल्या तांदूळ फुकट देते. महाराष्ट्र सरकार मात्र काही देत नाही. सीमा भागातील महाराष्ट्रीयन लोकांना सणासुदीला सुद्धा खायला भात मिळत नाही. अन तेलंगणात सकाळ संध्याकाळ लोक वरण भात खातात. संग्राम जेलमधून सुटल्यावर तेलंगणात राहणाऱ्या आपल्या बहिणीच्या घरी जातो. बहिणीच्या घरी पोटभर वरण भात खातो. त्याला क्षणभर वाटतं, बहिणीचं नशीब चांगलं तिथं रोज वरण-भात खायला मिळतो. सीमा भागात राहणाऱ्या प्रत्येक प्रदेशातील जगण्याच्या तऱ्हा कादंबरीत फार नेमकेपणाने टिपल्या आहेत. त्या त्या राज्यातील रीतीरीवाज वेगळ्या, चालीरीती वेगळ्या, आहार विहार वेगळे, याचे प्रत्येकाचे चित्रण उभे करण्यात लेखक डॉ. शंकर विभुते यांना कमालीची यश मिळाले आहे. 

              सासुरवास नावाची समाजाला लागलेली कीड ग्रामीण भागात आहे. अजूनही आहे. फारसा फरक पडलेला नाही. संग्रामला एक जुना प्रसंग आठवतो. तो बहिणीच्या लग्नानंतर बहिणीला न्यायला आला अन्  बहिणीला म्हणाला अक्का तुला बोलवायला आलो. सकाळी लवकर निघू. तेव्हा बहीण म्हणाली, माझ्या हाती काही नाही भावजीला विचार. भावजी म्हणाला मायला विचार. बहिणीच्या सासूला विचारल्यावर ती म्हणाली तुझ्या मामाला विचार. अशी ही रीत. संग्रामच्या बहिणीला त्याच्या समोर जनावरासारखं मारलं. लेखकाने सासुरवासाचे केलेले वर्णन आजही तेवढेच खरे वाटते. संग्राम या बहिणीची गरिबी पाहून दुसरी बहीण काही आधार देईल म्हणून तिच्याकडे जातो. ही बहीण तर त्याच्यावर चोरीचा आरोप लावते.मग संग्राम खऱ्या अर्थाने विचारप्रवण होतो.

            सगळी नाती त्याला खोटे वाटू लागतात. पुढे तेलंगणातला नागारेड्डी नावाचा माणूस त्याला देवाच्या रूपात भेटतो. संग्रामला वाटतं रक्ताच्या नात्यापेक्षा हे मानलेले नातेच किती चांगले आहे. या प्रसंगात लेखक शंकर विभुते यांनी संग्रामच्या तोंडी एक परखड वास्तव टाकले आहे. संग्राम म्हणतो, 

           "नागारेड्डी यांच्या घरची माणसं माणूसकी ठेवणारी आहेत. आपण उगीच आंध्रातल्या माणसाला दोष देत होतो. आपल्या सख्ख्या बहिणीने तर माझ्यावर चोरीचा आळ घेतला. खरंतर कुठल्या जातीची, धर्माची, राज्याची माणसं वाईट नसतात. म्हणजे जात, धर्म,राज्य वाईट नसतं तर माणसाची वृत्तीच चांगली किंवा वाईट असते. तो कुठलाही असला तरी" खरं म्हणजे लेखक डॉ. शंकर विभुते येथे डोकावतो. जात्यधंता, धर्मांधता, प्रदेशवाद यांच्या पलीकडे जाऊन फक्त मानवताच अधोरेखित करायची असते असा विचार लेखक या प्रसंगात मांडतो.

              अशाच बऱ्या वाईट प्रसंगातून संग्रामचे व्यक्तिमत्व तावून सुलाखून निघते. अन्  संग्रामच्या लक्षात येते की, आता खऱ्या अर्थाने "आयास". आता कष्टाशिवाय पर्याय नाही. आणि कष्टाची कास धरतो. भ्रमंती करतो. मुंबईला जातो, कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी पडत नाही. कष्ट कष्ट आणि कष्ट करीत संग्राम नावाचे एक जाणते व्यक्तिमत उभे राहते. पुढे तू गावी येतो. आपल्या माघारी आपल्या पत्नीचे झालेले हाल पाहून त्याला गहिवरून येते. अन्  आपल्याच गावात तो पुन्हा एक जबाबदार नागरिक म्हणून उभा राहतो. संग्रामची पत्नी सुशीला हेही पात्र लेखकाने फार समर्थपणे उभे केले आहे. नवरा घरी आला. नव्याने संसार सुरू झाला. संकटाचे दिवस संपले. एक दिवस पहाटे पहाटे जात्यावर दळण दळत एक ओवी म्हणते,

 "माय-बापाच्या माघारी,

 भाऊ भावजय कुणाचे?

 चिमण्या चालले वनाचे

 धार लागले पाण्याचे"

           ही ओवी म्हणजे नात्यागोत्याची काढलेली नवनीत होय. सुशीला गात असलेल्या ओव्यात अख्खी पंचक्रोशी येत असे. या ओव्यात रझाकाराला धडा शिकविणारे गोविंद पानसरे, गोरगरिबाचे भले करणारे बाबा पाटील बन्नाळीकर, मुक्ती संग्रामाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ आणि त्यांचे कर्तृत्व ओव्यात आढळून येत होते.

            पुढील आयुष्यात संकटे येवो की वाईट परिस्थिती संग्रामला आपला तोल ढळू देत नाही. बहिणीने मदत केली नसली तरी संग्राम त्यांना भाऊ म्हणून खणचोळी करायला विसरला नाही. त्याचे सामाजिक कार्य म्हणजे समाजासाठी वस्तूपाठ ठरले. आरळी बंधाराच्या लढ्यात प्रा. तिरुपती मारावार व माधवराव पाटील यांच्यासोबत कार्य करून सामाजिक बांधिलकी जपणारा संग्राम शेतकरी संघटनेतील तेवढ्याच ताकतीने सक्रिय होतो. कापूस एकाधिकार योजनेत भरडला जाणारा शेतकरी व त्याचा संघर्ष हा सुद्धा संग्रामच्या संघर्ष होतो. शेवटी 'आयास'चे पराकोटीच्या कष्टाचे महत्त्व सांगताना संग्राम म्हणतो, "माणसानं पाखराकडं बघून जगणं शिकावं. कोणतंही पाखरू आयतं बसून खातं का? पंखात बळ आलं की त्याचं ते पोट भरून घेतं. आपण तर माणूस आहोत."  संग्रामच्या या विधानाने आयास कादंबरीचा शेवट होतो. खरं म्हणजे डॉ. शंकर विभुते यांनी ही कादंबरी लिहिताना किती कष्ट घेतलेत याची प्रचिती चोखंदळ वाचकाला नक्कीच कळते. या अर्थानेही डॉ. शंकर विभुते यांच्या "आयास"ला  अभिवादन करावे लागेल.


- देविदास फुलारी

         नांदेड

भ्र.९४२२१८९८९०

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)