ब्राह्मणवाडा शाळेतील नवीन स्वच्छता गृह व पेव्हर ब्लॉकचा लोकार्पण सोहळा

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

 आशियाई विकास बँक(ADB) केंद्र शासन, सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ब्राह्मणवाडा (ता. नांदेड) येथे शाळेला अत्याधुनिक व सर्व सोयीनी युक्त मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह व सर्व मैदानामध्ये पेव्हरब्लॉक फरशी बसवून दिले असून त्याचा लोकार्पण सोहळा दिनांक २८ एप्रिल २०२४ रोजी संपन्न झाला. 

        या लोकार्पण सोहळ्यास कर्स्ट्री मार्कस (सिनियर ट्रान्सपोर्ट स्पेशलिस्ट), शिवा दोडला (प्रोजेक्ट ऑफिसर), श्रीमती लॉरेन लॉरीटो (सिनियर सोशल डेव्हलपमेंट), सुरलक्ष्मी सेन (एंवायर्नमेंटल स्पेशलिस्ट), स्टिफन बेसादी (सिनियर प्रोकरमेंट स्पेशालिस्ट), पी. एल. कोरे (अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड), रोहित तोंडले (कार्यकारी अभियंता सा. बां. विभाग नांदेड), तसेच ADB टीमचे अधिकारी उपस्थित होते. या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी भूषविले. 

          यावेळी चौधरी यांनी श्रीमती लॉरिटो यांना, 'आपण दिलेली ही केवळ देणगी नव्हे, तर भविष्यातील गुणवत्तेची पेरणी आहे,' अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली. यावर लॉरिटो यांनी प्रसन्नता व्यक्त केली.

          प्रारंभी लेझीम पथकाच्या तालावर वाजत गाजत पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्या विद्यार्थिनींनी औक्षण करून मान्यवरांना व्यासपीठाकडे नेण्यात आले. सर्व अतिथी मान्यवरांचा शाळेच्या वतीने ऱ्हद्य सत्कार करण्यात आला. 

      ADB मिशनने शाळेसाठी लाखो रुपये खर्च करून भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. यापूर्वी जुलै महिन्यात शाळेत आरोग्य शिबिर आयोजित करून समस्त गावकरी आणि विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. गावातील गरीब पालकांना धान्याच्या किटचे वाटप आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच आजच्या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार दप्तर वाटप करण्यात आले. अतिशय आकर्षक अशी रंगरगोटी व सर्व सुविधांनी परिपूर्ण अशी देखणी इमारत पाहून पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी कुतूहल वाटत आहे. या सामाजिक उपक्रमामुळे तळागाळातील बालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी निश्चितच पोषक वातावरण निर्माण झाले आहे. 

        लोकार्पण सोहळयाचा कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन रूपाली गोजवडकर यांनी केले. केंद्रप्रमुख पंडित पवळे, उपक्रमशील शिक्षक व्यंकट गंदपवाड यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उच्चश्रेणी मुख्याध्यापक तुका पाटील जाधव, आर. एन. देशमुख, सायलू मंकोड, कमल दासेवार, मीरा मुक्कावार, मीना केंद्रे, सविता पाटील, राजश्री देशमुख, अरुणा कलेपवार यांनी परिश्रम घेतले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)