११ हजार शिक्षकांची नियुक्ती होणार !

शालेयवृत्त सेवा
0

 



शिक्षक होण्याचे स्वप्न होणार साकार : शिक्षण विभागाची माहिती

पुणे ( शालेय वृत्तसेवा ) : 

राज्यात पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे. शिक्षकांच्या २१ हजार ६७८ पैकी १६ हजार ७९९ पदे मुलाखतीशिवाय होती. त्यातील ११ हजार ८५ उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली असून, शाळांवर नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे. कागदपत्रे पडताळणी करीत शाळांवर नियुक्ती दिली जाईल, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली. यामुळे अनेक वर्षांपासून वाट पाहणाऱ्या उमेदवारांचे शिक्षक होण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ मधील ५ हजार ७१७ पदांसाठी शिफारस केलेली नाही. आरक्षणाचा विचार करता माजी सैनिक (१५ टक्के) उमेदवार नसल्यामुळे २ हजार ३५७ जागा व अंशकालीन (१० टक्के) उमेदवार नसल्यामुळे १५३६ जागा तसेच खेळाडू (५ टक्के) उमेदवार नसल्यामुळे ५६८ जागा रिक्त राहिल्या आहेत.


राज्यात २० वर्षातील सर्वात मोठ्या शिक्षक भरतीचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. याद्वारे अकरा हजार नवीन शिक्षकांची भर पडली आहे. भरतीदरम्यान न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून उमेदवारांच्या अडचणी, शंकांचे समाधान केले आहे. भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण केली.

- सूरज मांढरे आयुक्त (शिक्षण) 


पहिल्या टप्प्यात पवित्र पोर्टलवर दि. १६ ऑक्टोबर २०२३ ते २२ जानेवारी २०२४ दरम्यान नोंद केलेल्या जिल्हा परिषद - १२ हजार ५२२, मनपा- २ हजार ९५१ नगरपालिका- ४७७, खासगी शैक्षणिक संस्था- ५ हजार ७२८ अशा २१ हजार ६७८ रिक्त पदांसाठी जाहिराती आल्या. मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ व मुलाखतीसह ४ हजार ८७९ अशी एकूण २१ हजार ६७८ रिक्त पदांच्या पदभरतीची कार्यवाही होणार आहे.

१ हजार १२३ खासगी शैक्षणिक संस्थांनी ५ हजार ७२८ रिक्त पदांसाठी पवित्र पोर्टलवर मागणी नोंदविली आहे. दि. ५ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आले. मुलाखतीशिवाय या प्रकारासाठी १ लाख ३७ हजार ७७३ उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहे.


कागदपत्रे पडताळणीनंतर मिळणार नियुक्ती :

उमेदवाराच्या मूळ कागदपत्राची पडताळणी केली जाईल, आणि पात्र उमेदवारांना शासन निर्णय दिनांक २१ जून २०२३ मधील तरतुदीनुसार समुपदेशन पद्धतीने नियुक्ती आदेश दिले जातील, त्यामध्ये दिव्यांग व महिलांना प्राधान्य दिले जाईल.

■ काही उमेदवारांच्या बाबतीत सक्षम प्राधिकारी यांचेकडून कागदपत्राची आवश्यक ती पडताळणी करणे गरजेचे आहे, अशा उमेदवारांना योग्य त्या पड- ताळणीनंतर नियुक्ती देण्याची कार्यवाही होणार आहे.


उमेदवार उपलब्ध न झाल्यास दुसरी फेरी :

पहिली ते पाचवी इंग्रजी माध्यम १ हजार ५८५, मराठी माध्यम ८७०, उर्दू माध्यम ६४० जागा व सहावी ते आठवी गटातील गणित- विज्ञान - २ हजार २३८ जागा रिक्त आहेत. पहिल्या फेरीत समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास भरतीच्या शेवटी दुसरी फेरी घेण्याची तरतूद आहे. मुलाखतीशिवाय मधील जाहिरातीतील रिक्त जागा भरल्या जातील.

मुलाखतीसह भरती; ४,८७९ उमेदवार मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या १ हजार १८९ संस्थांना ४ हजार ८७९ रिक्त पदासाठी योग्य ती प्रक्रिया करून १:१० या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करून दिले जातील. मुलाखत व अध्यापन कौशल्य याच्या आधारे निवड केली जाईल. यासाठी ३० गुणांची तरतूद केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)