21 फेब्रुवारी पासून बारावीची परीक्षा ; संवेदनशील 28 केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त

शालेयवृत्त सेवा
0

 



गैरप्रकार केल्यास गय केली जाणार नाही : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत


नांदेड (जिमाका) दि. 20 :- उद्या 21 फेब्रुवारी पासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता 12 वीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे जिल्ह्यामध्ये प्रशासनाने 28 संवेदनशील केंद्राची निवड केली आहे. या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्यात आला असून कुठेही गैरप्रकार झाल्यास केंद्रप्रमुखांपासून जबाबदारी देण्यात आलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज जाहीर केले आहेत.


सन 2024 परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त होण्याच्या दृष्टीने सर्व केंद्रावर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. याबाबत तक्रार निवारण्यासाठी हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. 


जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, परीक्षक, प्राचार्य, मुख्याध्यापक,‍ संस्था प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक नुकतीच कुसूम सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आज संवेदनशील केंद्रांची यादी जाहीर करत या केंद्रावर काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना केंद्रप्रमुखांसोबतच जबाबदार ठरविण्यात आले आहे जागेवरच कारवाई केली जाईल हे लक्षात ठेवून जबाबदारीने परीक्षा पार पाडण्याचे त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना बजावले आहे. 


जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या समवेत या संदर्भात बैठक घेण्यात आली आहे. संवेदनशील केंद्रांवर देखील भरारी पथकांनी अधिक लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. 


कोणत्याही केंद्रावर गैरप्रकार होणार नाही व अनावश्यक जमाव दिसणार नाही, याची दक्षता घ्यावी. यासाठी परीक्षा केंद्रावर मोबाईल वापरावर 100 टक्के बंदी घालावी. त्यामुळे यावर्षीची परीक्षा ही भयमुक्त व कॉपी मुक्त वातावरणात होईल या दृष्टीने सर्वांनी नियोजन करावे. मुख्याध्यापक, केंद्रसंचालक, संस्था प्रतिनिधी यांनी गैरप्रकाराला कोणत्याही प्रकारे समर्थन देवू नये, तसे आढळल्यास त्यांचे विरुध्द कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)