सुचिता खल्लाळ यांच्या 'डिळी' कादंबरीस महाराष्ट्र शासनाचा ह.ना. आपटे पुरस्कार जाहीर

शालेयवृत्त सेवा
0

  



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिले जाणारे स्व. यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार नुकतेच जाहीर झाले असून, नांदेड येथील कवयित्री, शिक्षण विस्तार अधिकारी सुचिता खल्लाळ यांच्या पहिल्याच 'डिळी' या कादंबरीस महाराष्ट्र शासनाचा ह.ना. आपटे पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

          ही कादंबरी शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केली असून, प्रख्यात चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी देखणे अब्स्ट्रॅक्ट मुखपृष्ठ चितारले आहे. या कादंबरीची महाराष्ट्रातील ज्येष्ठ नामवंत साहित्यिकांनी नोंद घेतली आहे.

          यापूर्वी सुचिता खल्लाळ यांच्या 'प्रलयानंतरची तळटीप' या काव्यसंग्रहाला कणकवली येथील आवानओल प्रतिष्ठानचा 'उगवाई' पुरस्कार,  दक्षिण मराठी साहित्य सभा कोल्हापूरचा 'रत्नाकर काव्य पुरस्कार', मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद आणि मराठवाडा साहित्य परिषद पुणे यांचे उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

           सुचिता खल्लाळ यांचे प्रलयानंतरची तळटीप, पायपोळ, तहहयात हे तीन न कवितासंग्रह आणि स्त्री कवितेचं भान:काल आणि आज (समीक्षा) ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत, या ग्रंथांना महाराष्ट्रातील नामवंत पुरस्कार मिळाले आहेत. स्त्री कवितेचं भान: काल आणि आज या समीक्षाग्रंथाचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात संदर्भग्रंथ म्हणून समावेश करण्यात आला आहे.

          या पुरस्काराबद्दल सुमती लांडे, अनुराधा पाटील, कौतिकराव ठाले, चंद्रमोहन कुलकर्णी, नीलकंठ कदम, आसाराम लोमटे, राजन गवस, नामदेव कोळी, दत्तात्रय घोलप, प्रवीण बांदेकर, सुनिता डागा, योगिनी सातारकर, समिता जाधव, रामचंद्र काळुंखे, ज्येष्ठ साहित्यिक मधुकर धर्मापुरीकर, देवीदास फुलारी, निर्मलकुमार सूर्यवंशी, जगदीश कदम, डॉ सुरेश सावंत, डॉ पी विठ्ठल, व्यंकटेश चौधरी, प्रतीक पुरी, श्रीनिवास भोसले, मनोहर बसवंते, यांसह अनेक मान्यवरांनी सुचिता खल्लाळ यांचे अभिनंदन केले आहे.


'गावखेड्यातील जगण्याचे प्रश्न, तिथला जातिधर्मापल्याड जाणारा एकोपा, मतपेटीच्या राजकारणाने तिथे झालेली सामान्य माणसांच्या जगण्याची परवड हे एकीकडे आणि तिथेच मुळे असलेल्या पण उच्च शिक्षणाच्या आधारे शहरात स्थिर झालेल्या माणसांच्या जगण्यातील प्राथमिक संघर्षाच्या पार असलेल्या समस्यांची मांडणी लेखिकेने फार प्रगल्भतेने केलेली आहे.

-ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे


 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)