होय ! मी सावित्री बोलतेय !| savitribai phule

शालेयवृत्त सेवा
0

 

savitribai fule


होय ! मी सावित्री बोलतेय .. !


अग ऐ मुलींनो कुठे खिदळताय? इकडे या! मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. या! मी कोण? अगं, मी तुमची सावित्रीमाता. तुम्ही नायका मला क्रांतीज्योती सावित्रीमाई म्हणत? हो तीच. तुम्ही सगळ्यांनी मला ‘माय’ म्हणून हाक मारलीत तेंव्हा मी सर्वांची आई झाले. माई झाले. इथल्या सर्वच लेकरांनी मला माता मानले आणि मी धन्य झाले. मला विद्येची खरी माता म्हणतात. पण मी तुम्हा सर्वांच्या रंजलेल्या-गांजलेल्या दुःखाची सुखपौर्णिमा म्हणजेच सावित्री ज्योतीराव फुले! तुमची क्रांतीज्योती सावित्रीमाई!’

            माझा जन्म ३ जानेवारी १८३१ साली सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यातील नायगांव या छोट्याशा खेड्यात झाला. आईचं नाव लक्ष्मीबाई आणि वडिल खंडोजी नेवसे पाटील. मी सर्वात मोठी आणि एकुलती एक. मला तीन भाऊ- सदा, सखाराम आणि श्रीपती. मी एकुलती एक असल्यामुळे खूप लाडाकौतुकात वाढले. मला लहानपणी साऊ म्हणायचे. माझे बाबा फार कनवाळू होते. ते फार कष्ट करीत. त्यांचा फार दबदबा होता. ते लोकांना मदत करायचे. एकदा मी बाबांबरोबर शिरवळच्या बाजारात गेली होती तेंव्हा एका ख्रिश्‍चन मिशनर्‍यानं एक पुस्तक मला दिलं. पण मला काही वाचता येईना. मी नुसते चित्र पाहत राहिली. मला फार वाईट वाटलं होतं तेंव्हा. मला वाचता येत नव्हतं ही गोष्ट मला खात राहिली. माझं काहीतरी हरवत चालल्याचं मला जाणवत होतं.

         दिवसामागून दिवस गेले. बालविवाहाच्या प्रथेप्रमाणे माझ्या वयाच्या नवव्या वर्षी १८४० साली माझं लग्न पुण्याच्या ज्योतिरावांशी झालं. त्यांचं आईचं छत्र लहानपणीच हरवलं होतं. सासरे गोविंदराव फुले प्रेमळ व्यक्तीमत्त्व होतं. पण लग्न, संसार काय असतो हे कळायच्या आतच माझं लग्न झालं होतं. पण ती एक माझ्यासाठी क्रांतीकारी घटना होती. मी ह्यांना शेटजी म्हणायचे. ते शिकलेले होते. म्हणूनच मला सावित्री ज्योतिराव फुले असं नवं नाव धारण करण्यात मला फार अभिमान वाटला. मला माझा नवा जन्म झाल्यासारखंच वाटलं. मी सासरी आले तरी माहेरीच आल्याची ती एक नवी अनुभूती होती. शेटजी शिकत असताना गोविंदराव फुले सनातन्यांच्या धर्मद्रोहाच्या आरोपाखाली जखडले गेले. शेटजींचं शिक्षण तुटलं. क्षुद्रानं अतिशुद्रानं शिक्षण घेण्याचा कोणताच अधिकार नव्हता. अस्पृश्यांची आणि स्त्रियांची अवस्था काही वेगळी नव्हती. धर्मव्यवस्थेच्या काळचक्राखाली सगळेच भरडले जात होते. पण शेटजींना शिक्षणाचं मोल फार होतं. ते लग्नानंतर १८४१ साली स्कॉटिश मिशनच्या शाळेत शिकू लागले. मी ही शिकावे असे त्यांना मनापासून वाटे. पण ते शक्य नव्हतं.

          मी जेंव्हा शेतात ह्यांची दुपारची भाकर घेऊन शेतावर जात असे ते मला काळ्या मातीवर अक्षरं गिरवायला सांगत. तीच माझी पहिली शाळेची पाटी. मी फार जिद्दी होते. भराभरा शिकले. माझ्या शिकण्याच्या उमेदीनं शेटजी हरकून जात आणि मला खूप-खूप शिकवत. मला आता चांगलंच वाचायला आणि लिहायला येऊ लागलं. मला शिरवळच्या बाजारात भेट म्हणून मिळालेलं पुस्तक मी वाचून काढलं. ते मी आजपर्यंत प्राणपणानं जपून ठेवलं होतं. माझ्या आयुष्याला एक महान वळण देणारा तो एक क्रांतिकारी दिवस होता. माझी पावलं उजेडाच्या दिशेनं पडत होती. शिक्षणानं माझ्याभोवती तेजपुंजाचं वलय निर्माण झालेलं होतं. एक नवी शक्ती मला मिळालेली होती. एका नव्या स्वातंत्र्याच्या उंबरवठ्यावर मी उभी होते. मला एका महायुद्धाची नायिका व्हायचं होतं. मला थांबायचं नव्हतं, मला एकेक युद्ध जिंकत पुढेच जायचं होतं. हा सर्वस्वी माझाच निर्णय होता. हा एका नव्या महाक्रांतीचाच आरंभ होता. शेटजींनी तो आपल्या स्वतःच्याच घरापासून केलेला होता.

         शेटजी नावाच्या या क्रांतीपुरुषानं माझ्या क्षणांना नवं वळण दिलं. एका रात्री निर्णय झाला. शाळा काढायचं ठरलं. पण जितके प्रश्‍न होते तितकी संकटं उभी राहिली होती. पण त्यांचा विचार न करता नेटीव्ह फिमेल स्कूल, पुणे आणि महार, मांग इत्यादींना शिकविणारी मंडळी, पुणे अशा दोन संस्था काढल्या. आम्ही पहिली मुलीची शाळा काढली त्यात सहाच मुली होत्या. त्यांना शिकवायला शिक्षकच मिळेना. मग मीच शिकवायचं काम केलं. त्या कोणकोण होत्या सांगू का? बरं. एक होती अन्नपूर्णा, सुमती, दुर्गा देशमुख आणि माधवी, सोनू पवार आणि जानी. ह्या तुमच्यासारख्या माझ्या लेकीच! यातल्या चार ब्राह्मण तर एक धनगर आणि एक मराठा. मी यात कोणताच भेद केला नव्हता. त्या ज्या समाजातून आल्या होत्या तिथूनच मला प्रचंड विरोध झाला. पण त्या लेकीनं मला आई मानलं आणि मी अगदी अधिकारानं त्यांना शिकवू लागले.

       शुद्रातिशुद्राच्या मुलामुलींना शिकवू नये, धर्म बुडतो. भयंकर अनर्थ घडून येतो. आता सर्वांचा नाश अटळ आहे, असे म्हणून सनातनी वृत्तीच्या लोकांनी माझा छळवाद मांडला. मला खूप त्रास होत होता. शेटजींना तर त्याहीपेक्षा जास्त. आम्हाला ह्या लोकांनी घाणेरड्या, अर्वाच्च शिव्या दिल्या. मला दगड, धोंडे फेकून मारले. माझं एकदा डोकं फुटलं. मी रक्तबंबाळ झाले. तशीच मी शाळेत आले. मला शेण फेकून मारलं, मला त्याचंही काहीच वाटलं नाही. तेे लोक अंंगावर  चिखल फेकत त्याचंही काही वाटत नव्हतं. मी जातानाच एक लुगडं सोबत न्यायची. असेच शाळेत जात असताना एक मुजोर पोरगा माझ्या वाटेत आला. त्याने माझ्या अंगावर हात टाकायचा प्रयत्न केला. एव्हाना बरेच बघे मंडळी जमली होती. ती माझ्यावर फिदी फिदी हसत होती. मी प्रसंगावधानान त्याच्या थोबाडात कच्चून दिली. मी ही नेवासे पाटलांची लेक होते. माझं वाघिणीचं काळीज होतं. मुलींनो तुम्ही पण बिल्कूल घाबरायचं नाही. तुमचा हातच तुमचं शस्त्र आहे. अशा नराधमांचा त्वेषाने प्रतिकार करा. कुण्याही गोडबोल्याला भुलू नका. भूलथापाला बळी पडू नका. स्वतःच्या आयुष्याचं मातेरं करुन घेऊ नका.

        मी शिकवित होते, मुली शिकत होत्या. मला त्याचा फार आनंद होत होता. त्यासाठी मी माझं सर्वस्व पणाला लावलं होतं. मी दुःख पूर्णपणे विसरुन गेले होते. हे धर्मवादी लोक जितका आमचा छळ करीत तितके आम्ही त्वेषाने कामाला लागत असू. एवढ्यात कुणीतरी माझ्या सासर्‍याचे कान भरले. आम्हाला घराबाहेर काढण्यात आलं. तेंव्हा मुन्शी गफार बेग चाचानं आम्हाला आसरा दिला. मग आम्ही नव्यानं सुरुवात केली. न भिता न घाबरता मोठ्या जोमानं आम्ही कामाला लागलो. आम्ही एकूण १८ शाळा काढल्या. एक अध्यापिका विद्यालय काढलं. पडदानशीन मुस्लीम समाजातील फातीमा ही पहिली प्रशिक्षीत शिक्षिका झाली. लऊजी मांग आणि रानबा महार यांचंही सहकार्य आम्हाला फार मिळालं. गणू मांग आणि धुराजी चांभार हे शिक्षक म्हणून काम करु लागले. आमच्या शाळा जोरात सुरु होत्या. या शाळांच्या माध्यमातून तत्कालीन समाजव्यवस्थेचं कंबरडं मोडण्याचच काम आम्ही सगळे करीत होतो. आमच्या शाळेत युद्धसैनिक तयार होत होते.

           तुमच्या सारखीच एक मुक्ता साळवे नावाची मातंग समाजातील मुलगी माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, मला निबंध लिहायचा आहे. मला प्रचंड आनंद झाला. ती अकरा वर्षाची मुलगी प्रचंड प्रतिभावान होती. तिच्यात एक सावित्रीच जन्माला आली होती. तिनं ह्या व्यवस्थेला खडा सवाल केला होता. शेटजी खूप खुष झाले होते. आम्ही पेरलेली क्रांतीबीजं आता शिवारु लागली होती. एक विचारांचा क्रांतीवात घोंघाऊ लागला होता एवढी ताकद शिक्षणात आहे. याचा फायदा फार महान आहे. पशूचा मानव होतो. माणसात जे परिवर्तन घडून येतं ते कायमस्वरुपी असतं. शाश्‍वत असतं. आम्हाला मारायला दोन माणसं पाठविली होती. धोंडीराम कुंभार आणि रोडे रामोशी. आम्ही त्यांचं असं परिवर्तन केलं की, तेच आमचे अंगरक्षक झाले. मुक्ताचा निबंध ‘ज्ञानोदय’ मध्ये शासनाच्या वार्षिक अहवालात प्रकाशित झाला. तसेच ना.वि. जोशींनीही तो ‘पुणे शहराचं वर्णन’ या ग्रंथात छापला. ऐ! तुम्हाला लिहिता येतो का गं निबंध?



मुलींनो, तुम्ही खूप-खुप शिका! मोठ्या व्हा! नवनव्या संधी तुमच्या पुढे आहेत. चुकूनही वाकडं पाऊल पडू देऊ नका. समाज फार विचित्र आहे. काशी नावाच्या विधवेला दिवस गेले तेंव्हा तिचं सगळं पार पाडण्यात आमचे काय हाल झाले ते मलाच माहित! आम्ही तेंव्हापासून बाळांतघर आणि पाळणाघरे चालविली. आम्ही रोग्यांची सेवा केली. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. विधवा विवाहाचा पुरस्कार केला. नुसते बोललोच नाही तर जे बोललो ते करुन दाखविलं. केशवपन थांबवलं, टाकलेल्या स्त्रियांसाठी अनाथालयांची स्थापना केली. पोरींनो तुम्हालाही माझं काही देणं आहे. समाज ऋण फेडण्यासाठी या महायुद्धात उतरा! माझा वसा घ्या! सावित्रीच्या लेकी म्हणून जगात नाव कमवा!!


- प्रज्ञाधर ढवळे, नांदेड

मो. ९८९०२४७९५३

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)