अक्षर परिवारातील तारा निखळला.. मुख्याध्यापक बशीर पठाण यांचे निधन

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

वाजेगाव बीट मधील फत्तेपूर (लालवाडी) या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बशीर पठाण यांचे काल दि २४ रोजी निधन झाले. २४ रोजीच सायंकाळी सहा वाजता नांदेड येथे आसरा नगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

गावाच्या शिक्षणाची ख्याती सर्वदूर पसरविणारे अवलिया बशीर पठाण हे 2019 मध्ये येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रुजू झाले.त्यावेळी शाळेची विद्यार्थी संख्या ४० च्या आतच होती. पण बशीर इथे रुजू झाले नि त्यांनी संपूर्ण सूत्रे मुख्याध्यापक म्हणून आपल्या हाती घेत, शाळेची दशा आणि दिशा बदलण्याचा चंगच बांधला. त्यांनी गावातील शिक्षणप्रेमी नागरिक, पालक, लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन त्यांच्या मध्ये शाळेविषयी आस्था, प्रेम, आपुलकी निर्माण केली .

 स्वतः कॅन्सर पेशंट असताना ५३ पेक्षा अधिक वयाचे असल्याने शासनाने घरी बसण्याची पूर्ण परवानगी दिलेली असताना देखील आपल्या जीवाची पर्वा न करता विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले नाही पाहिजेत या भावनेतून ज्ञानदानाचे कार्य अविरत सुरूच ठेवले होते.

विद्यार्थी गुणवत्तेची ही ज्योत प्रज्वलित करण्यात यश मिळवितानाच शाळेला प्रोजेक्टरने डिजिटल करणे, शाळेची रंगरंगोटी, मैदानाचे समतलीकरण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, हिरव्या जर्द हिरवळीने नटलेला निसर्गरम्य परिसर,रंगबिरंगी फुलांच्या झाडांची लागवड, शाळेच्या प्रवेशद्वारात कमान या नि अशा कित्येक पायाभूत सुविधांनी परिपूर्ण केले.

फत्तेपूरची शाळा केवळ वाजेगाव बीटच नव्हे तर नांदेड शिक्षण विभागाचा मानबिंदू बनविण्यात बशीर पठाण यांची प्रचंड मेहनत होती. त्यांच्या या शाळेला खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार मोहन अण्णा हंबर्डे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, वर्षा ठाकूर घुगे, अनेक अधिकारी, पदाधिकारी यांनी भेटी देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक केले. पूर्व शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी, सुप्रसिद्ध बालसाहित्यिक सुरेश सावंत, साहित्यिक तुकाराम खिल्लारे, डॉ.पृथ्वीराज तौर यांनी सुद्धा शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन बशीर पठाण यांना शाबासकी दिली.

 दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करूनदेखील बशीर पठाण त्यातून मुक्त होऊ शकले नाहीत. २४ जानेवारी २०२४ रोजी अक्षर तारांगणात लख्ख चमचमणारा हा तेजस्वी तारा निखळला. त्यांच्या जाण्याने केवळ फत्तेपूर गावातीलच नव्हे तर त्यांना ओळखणारा प्रत्येक जण हळहळला. त्यांच्या पश्चात बहीण, पत्नी आणि मुले मुली असा परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)