उत्तम सदाकाळ यांनी पाडलेला : पाऊस

शालेयवृत्त सेवा
0

 



[ सुप्रसिद्ध बालसाहित्यिक उत्तम सदाकाळ यांच्या पाऊस या पुस्तकाचा परिचय साहित्यिक वीरभद्र मिरेवाड यांनी करून दिला आहे - संपादक ]


सशक्त बालसाहित्यिक ,उत्कृष्ट शिक्षक, विविध साहित्य संस्थानांनी  सन्मानित केलेले कवी , दुसरीच्या अभ्यासक्रमात ज्यांची कविता समाविष्ट आहे .सकाळ, लोकसत्ता ,दिवाळीअंकासह विविध वृत्तपत्रांमधून ज्यांनी कविता लेखन केले आहे .बालसाहित्याबरोबरच ज्यांनी 

प्रोढसाहित्य लिहिलेलं आहे असे बहुआयामी लेखक म्हणून उत्तम सदाकाळ यांची मराठी साहित्यात ओळख आहे.

त्यांचा अलीकडेच पुण्याच्या दिलीपराज प्रकाशन संस्थेने 'पाऊस' हा बालकवितासंग्रह प्रकाशित केला आहे. सदर कवितासंग्रहात 37 कविता आहेत. त्यात पाऊस, श्रावण, थंडी, वसंत ऋतू, सण, शाळा,  वृक्षारोपण, आई यासह  विविधांगी विषयावर कविता आहेत.

पाऊस ,रिमझिम पाऊस, शाळेतील पाऊस ,पावसाचा रुसवा, हिरवा वसा या कविता पावसाचे वर्णन करतात .

खरं म्हणजे पाऊस उदासलेल्या मनाला आनंद प्रदान करतो .पाऊस धरतीला सौभाग्य देतो .पाऊस कुणाचाही नसतो तो फक्त 

रान-शिवारांचा असतो .झाडा फुलांशी एकरूप होतो. उत्तम सदाकाळ यांनी पाऊस वाचला आहे .ज्याला पाऊस वाचता येते त्यांचा विषय हा पाऊसच होऊन जातो .पाऊस या पहिल्याच कवितेत ते म्हणतात-

टपटप पाणी झाडावरती 

पक्षी किलबिल गाणी गाती 

डराव डराव बेडूक आला 

धो धो धो धो पाऊस आला


धरतीच्या अंगात पावसाचे गाणे नाचत आहे. नभातून मोती आणि पोवळं बरसात.डोंगराच्या अंगावर दुधाचे झरे फुटतात .पावसाला कवी सदाकाळ आर्जव करतात - 

 हे पावसा, तू हिरवा वसा घे!  शाळेच्या मैदानात चिऊताईला गाणे गाऊ दे ! मुलांना हातात आनंदाने होड्या घेऊ दे!  पावसा रुसवा सोडून आभाळात कधीच दडून बसू नको अशा शब्दात कवीने पावसाचे दर्शन घडविले आहे.

श्रावणमास कुठल्याही कवीला भुरळ घालतो . त्याला उत्तम सदाकाळ अपवाद कसे ठरतील?   कवीने श्रावण रेखाटलाय !  त्याला इंद्रधनुचा हार घातलाय ! ते  श्रावणात गावाकडं झालेला बदल प्रगट करतात. वारा सुगंध घेऊन नृत्य करतो अशी सुंदर कल्पना त्यांनी मांडली आहे.

श्रावणमासाच्या श्रावण, श्रावणात ,आला श्रावण आला या तीन कविता आहेत. त्यात श्रावणाच्या सौंदर्याचा चित्रफलक कवीने हलता ठेवला आहे तो असा- 

सण उत्सव घरोघरी साजरे होई

 सूर पोथीचा मारुती मंदिरी येई

माथा भक्तीने देवापुढे झुकतो

 असा श्रावण गावाकडे असतो


आभाळातील सप्तरंगी इंद्रधनुष्य ,श्रावणाने परिधान केलेले धुक्याचे धोतर, ऊन पावसाची लपाछपी ,हसरे झरे, हिरवकंच पातळ घालून नटलेली धरती या मिथकासह कवी व्यक्त होतो-


सळसळणाऱ्या शेतामध्ये

 चैतन्याच्या लाटा 

पक्ष्यांच्या सुरात चिंबल्या

 रानोरानच्या वाटा


कवी उत्तम सदाकाळ यांच्या कवितेतील बाळाला खूप थंडी वाजते .आईची कुश मिळाली की थंडी पळून जाते .ही थंडीची कल्पना अफलातून आहे .ह्या कवितेत सृष्टीची रूप पालटवणारा वसंत ऋतू भेटतो. थोरल्या भावाची जबाबदारीची जाणीव प्रकट होते .घोडा बनणारा आजोबा भेटतो. पुराच्या विळख्यातून बाहेर पडणारी 

हिंमतबाज हिरकणी भेटते .अंघोळीनंतर अंग स्वच्छ करता करता मन स्वच्छ करणारी आई भेटते .आई -बाबाची महती सांगताना 

कवी म्हणतो- 

तुमच्या आमच्या सुखासाठी

 उन्हातानात झिजतात पाय 

तक्रारीचा शब्द मुखातून

 कधी त्यांच्या निघतो काय


आजोबांना वृद्धाश्रमात धाडणारे आई-बाबा वाईटच असतात म्हणून रडणार मुलंही या कवितेत प्रकर्षाने भेटते. विविध गुणवैशिष्ट्यासह ही कविता नटली आहे .या कवितेतील शाळा भारीच भरवलेली दिसते. स्वागताला मुलांना रोज चॉकलेट मिळते आणि उत्तम सदाकाळ मधला शिक्षक बोलतो- 

अशी शाळा आनंदाची

 नित्य मनात टिकावी

 झेप घेण्या यशाकडे

 शाळा सर्वांनी शिकावी


टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवण्यात मुले तरबेज असतात त्याचे प्रत्यंतर 'फोन' या कवितेत आले आहे .तर आपल्याच मुलांना आळसाला थारा नाही म्हणून सांगणारी खारुताई घाई करताना दिसते .तव्यावरची गरमागरम भाकर दुधात भिजवून खाण्यासाठी ,चुलीपुढे बसून शेकण्यासाठी कवी गावाकडे बोलावतो आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे चिमणीसाठी अंगणात वाटी भरून पाणी ठेवणारे मुलं या कवितामधून भेटते तर वृक्षारोपणाचे काम चोचीमध्ये बिया घेऊन आपणालाच करावं लागेल असा उपदेश करणारी चिमणाई  भेटते. चिमणीची ही जिद्द  पाहून या कवितेतील मुलंही मागे राहत नाहीत

 तर ते म्हणतात - 

वाढली झाडे तर ढग अडतील 

धो धो धो धो पाऊस पाडती

चला दोस्तांनो जगाला पटवू

 झाडे लावू झाडे जगवू


कवी उत्तम सदाकाळ संस्कृतीचे रक्षण व्हावे म्हणून सणाचे सोहळे भरवतात. नागपंचमी, गणपती बाप्पा, रक्षाबंधन ,दिवाळी, नाताळ ,होळी या कवितामधून ते प्रकट होते .सणाच्या कविता मधून बालमनाला संस्कार पेरण्याचं हळुवार काम सदाकाळ सरांनी केलं आहे .उंच गेलेल्या झोक्याच्या दोरीला मातीला विसरू नको म्हणून ते सांगतात .सणांची गोडी वाढवण्यासाठी प्रदूषण टाळण्याचा सल्लाही देतात. स्वतःच्या बहिणीसारखं सगळ्यांच संरक्षण करा असा संदेश देतात. नववर्षाच्या आरंभी प्रयत्नांची कास धरण्यासाठी सांगावा घेऊन येणारा सांताक्लाॅज यांच्या कवितेत भेटतो आहे .मानवी वस्त्या बरोबरच त्याने जंगलातल्या होळीचे वर्णन केलंय ते असं- 

रंग वाघाला फासून 

पळे माकडाची टोळी 

काळेकुट्ट झाले अंग

 वाघ फोडी डरकाळी


या संग्रहातील 'काळजी' ही कविता सुरक्षा नियम पाळण्याचा अट्टहास करतेआणि भूकंपापासून संरक्षण कसे करावे याचे नियम सांगते .

या कवितेची अभिव्यक्ती  काळजीचे मळभ दूर करणारी आहे .'प्रयत्न' या कवितेत कवीने स्वबळाच्या  जोरावर स्वतःचा झुला उंच झेपावत ठेवा म्हणजे स्वतःचे अस्तित्व निश्चित होईल असा चिरंतन संदेश दिला आहे .

तो असा - 


फुलव ताटवे हास्य फुलांचे

 चैतन्याचे  शिंपून पाणी 

गाडून दुःखे खोल तळाला 

ओठी खेळव आनंदगाणी


या संग्रहातील शेवटची कविता 'आई मला जगायचंय'  ही कविता भावनेचा कडेलोट करणारी आहे. ही कविता वाचताना मन उचंबळून येतं. डोळ्यात आसवे दाटतात .माणूस कोसळून पडतो. गर्भपात करणाऱ्या नराधम लोकाविषयीचा निषेध व्यक्त करतो .ही कविता वाचताना हृदयात कालवाकालव  होते.

 या कवितेतील नकोशी बोलते. आई मला जगायचं, दादाला राखी बांधायचं ,आजीच्या गोष्टी ऐकायचं, बाबाकडे बांगड्या मागायचं,शाळेत जाऊन खूप शिकायचं ,मला जग बघायचं..


कवी उत्तम सदाकाळ यांच्या कविता माणूसपण टिकून ठेवणाऱ्या ,सुसंस्कृतपणा जपणाऱ्या, सर्वोत्तम गुणांनी नटलेल्या ,निसर्गाविषयी आस्था बाळगणाऱ्या, अंतर्मनाला साद घालणाऱ्या आणि वृक्षसंवर्धन करण्याचा वसा घेणाऱ्या आहेत.

 पाठराखणमध्ये विजयाताई वाड यांनी म्हटल्याप्रमाणे कवी उत्तम सदाकाळ हे बालसाहित्याच्या अवघड परीक्षेत पास झाले आहेत.

 दिलीपराज प्रकाशनाने केलेली आकर्षक मांडणी, सुप्रसिद्ध चित्रकार संतोष घोंगडे यांची उत्तम  सजावट यामुळे कवितासंग्रहाला अधिक  जिवंतपणा आला आहे.


   पाऊस "

(बालकवितासंग्रह)

कवी : उत्तम सदाकाळ

प्रकाशक: दिलीपराज प्रकाशन पुणे

मुखपृष्ठ व आतील सजावट: संतोष घोंगडे

आर्ट पेपरवरील रंगित पृष्ठे:४८

किंमत: १४०

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)