शिक्षणवसा, सण , मूल्यसंस्कार आणि पर्यावरण शिक्षणाचा आविष्कार - आई मी पुस्तक होईन... डॉ श्रीकांत श्रीपती पाटील

शालेयवृत्त सेवा
0

 


                       

मुले म्हणजे देवाघरची फुले असे म्हटले जाते. आनंद उल्हास, उत्साह, दंगामस्ती बरोबरच शाळा आणि खेळांमध्ये मध्ये नागण्या-बागडण्यामध्ये, झाड-झाडोऱ्यात हिंडण्या फिरण्यामध्ये मुले आपला वेळ घालवतात. राग, लोभ, मोह,  मत्सरापासून दूर राहून मुले आपली निरागसता आणि निष्पापता जपतात. आई वडिलांइतकेच आपल्या शाळामाऊलीवर व गुरुजींवर प्रेम करतात. शाळेमध्ये पुस्तकातील अक्षरे गिरवितात तर निसर्गाच्या उघड्या शाळेमध्ये हिंडुन फिरून डोंगर दऱ्याचे, झाडाझुडपांचे, फळाफुलांचे, पक्षी-प्राण्यांचे निरीक्षण करून आपली जिज्ञासा तृप्ती करून घेतात.

       तुम्ही कोण होणार ? असा प्रश्न मुलांना नेहमीच कुटुंबात, शाळेत, समाजात विचारला जातो. बऱ्याचदा लोक कौतुक करतील अशी उतरे मुले या प्रश्नाला देतात. मी फौजदार होईन, मी कलेक्टर होईन अशी उतरे देवून आपल्या निरागस मनाची आनंदलालसा पूर्ण करतात. पण खरेच लहानपणी दिलेली उत्तरे ही पाठ केलेली किंवा कुणाचे तरी अनुकरण म्हणून सांगितलेली असतात हे त्या चिमण्या जीवांना भान नसते. पण मुलांना खोट्या आणि अभासी जीवनापासून दूर करून त्यांच्या कला गुणांना, क्रिडागुणांना अभिव्यक्तीला वाव देण्याचे महत्वपूर्ण कार्य गुरुजी करत असतात. मुलांच्या कल्पनाशक्तीला खतपाणी देवून त्या सशक्त आणि समृद्ध करण्याचे कार्य करत असतात. डॉ. कैलास दौंड या उच्चविद्याविभुषित गुरुजींनी ज्ञानदानाबरोबरच  मुलांच्या भावजीवनांचे , त्यांच्या सामाजिक पर्यावरणाचे, त्यांच्या अंगभूत गुणांचे, कलाकौशल्याचे, अभिव्यक्तितील आत्मविश्वासाचे सूक्ष्म निरीक्षण करून 'आई मी पुस्मक होईन' हा बालकविता संग्रह साकारलेला आहे. शिक्षणवसा, सण आणि संस्कार, पर्यावरण शिक्षण यांचा उत्स्फूर्त आविष्कार या कवितासंग्रहातून झालेला असून पाहिलेले ,अनुभवलेले बालजगत त्यांच्या भाव भावना यात काव्यात्म छोटया छोट्या काव्यलेण्यातून डॉ. कैलास दौड यांनी नखशिखान्त अशा देखण्या आणि लोभस रूपात कोरलेल्या आहेत.

'आई, मी पुस्तक बेईन' ही शीर्षक कविता एका मुलाचे मनोगतच आहे. तो  त्याचा आत्मविश्वास आहे.

लहान मुलांना गोष्टीची गाण्यांची पुस्तके तर आवडतातच पण त्याचबरोबर इतिहास, भूगोल यासारख्या विषयांची क्रमिक पुस्तके ही आवडतात. त्यामुळे मुलांना वाचनातून आनंद आणि मौज मिळावी अशी या कवितेतील पुस्तक होऊ इच्छिणाऱ्या मुलाची अपेक्षा आहे.

'आई मी पुस्तक होईन

छान छान मी गोष्टी देईल

वाचतील जे पाने माझी

खूप तयांना मौज येईल'

कोरोना महामारीने साऱ्या जगाला वेठीला धरले. समाजातील सारे व्यवहार बंद झाले. शाळा ही बंद झाल्या. त्यामुळे मुलांच्या अध्ययनाचे अपरिमित नुकसान झाले. 'चला मुलांनो शाळेला' या कवितेतून कवी मुलांना कोरोनाचे नियम पाळून शाळेला येण्याचे आवाहन करतो आहे. शाळेतील ज्ञानाचा वापर करून जीवन सुंदर बनविण्याचा सल्ला 'जगण्यामध्ये आणूया' या कवितेतून देतो आहे. झाडावर पाने फुले हवीत तशी शाळेत मुले हवीत अशी अपेक्षा 'समजा' मधून व्यक्त करतो आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळेचे प्रस्त वाढत असताना माझ्या गावातील 'माझी झेडपीची शाळा' किती छान आहे हे आपलेपणाने समजावून देतो आहे. भूगोल विषयाच्या अध्यापनात नकाशाचा आधार घेतला जातो. 'पुस्तकातील नकाशा' ही कविता याच विषयावर बेतलेली आहे. ती पाहून कविच्या मनात एकतेची आशा पल्लवीत होताना दिसते आहे.

     'निळ्या नभासम निळे पाणी

      सागर पसरूनी नकाशातूनी

      गोड फुलासम फुलून असती

      खंड सात हे सुंदर दिसती '

तर ग्रंथ हेच गुरु असून या ग्रंथगुरुच्या सहवासाचा लाभ घेण्यासाठी 'मुलांनो पुस्तकाकडे वळा' या कवितेतून आवाहन करतो. शाळा ,शिक्षण, संस्कार अशा शाळा माऊलीशी संबंधीत कवितांची उत्तमोत्तम रेखाटने 'आई, मी पुस्तक होईन' या काव्यसंग्रहात सरसपणे झालेली आहेत.

निसर्ग हा माणसाला घडवितो. अन्न वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता करतो .वास्तविक निसर्गही खुली शाळाच आहे. खाली जमिन वर आकाश आहे. या निसर्गातील शेती माती,  झाड झाडोरा, ऋतुचक्र, नदी- ओढा, उघडा माळ अशा अनेक घटकांना कविने आपल्या कवितेत स्थान दिलेले आहे.

         पावसात जेंव्हा

         भिजतयं रान

         पिवुनिया पाणी

         खुलतय रान'

असं रानाचं 'आहे माझं रान' मध्ये कवी गुणगान करतो. जेंव्हा ,गावकुशी सांजवेळ, तळ्याचं पाणी, तीर्थरूप ढगास, सकाळचे हायकू, जंगलातले तळे या कवितातून निसर्गाचा फेरफटका कवी मुलांना सोबत घेऊन मारतो आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे तीन ऋतू सर्वश्रुत आहेत. पण ऋतूतल्या ऋतूंची ओळखही कवीने 'आवडता ऋतू' मध्ये करून दिलेली आहे. त्यांची नियमितता, पर्यावरणातील बदलांची नोंद घेत त्यांची उपयुक्तताही सांगितली आहे.

         'सर्वच ऋतू असती

          निसर्गाच्या कामाचे

          दर साल फिरून येती

          पक्के असती नियमाचे'

'शांतसे दृश्य' मध्ये झाडी- डोंगर, तळे व त्यामध्ये आपले घर असावे ही इच्छा व्यक्त केली आहे. मुलांना वृक्षमित्र बनविण्यासाठी 'वृक्षारोपण' कवितेची निर्मिती छान अशी साधली आहे. तर 'पडला पाऊस' ,'रम्य संध्याकाळ' याही कविता छानच साकारल्या आहेत. माणसाला तारणारा निसर्ग कधी कधी रौद्र रूप धारण करतो. शांतपणे वाहणारी जीवनदायीनी  माणसाला उध्दवस्थ करते.  त्याचे चित्रण 'पूर' या कवितेत आलेले आहे.

    'आईच्या डोळ्यात आलं पाणी

     पाऊस वागला वैऱ्यावाणी

     असा पाऊस नको ग आई

     माणसाला तो लुटून नेई '

मुलांना नेहमीच प्राणीजगत आणि पक्षीजगताचे आकर्षण राहिलेले आहे. मुलांचे भावविश्व लक्षात घेऊनच अशा घटकांना डॉ. कैलास दौंड यांनी कवितांचे विषय बनविले असून त्यांचे गमतीशीर असे रेखाटन केलेले आहे. वडांची फळे पक्ष्यांचा लॉलीपॉप आहेत. चिंचेचे घोस राहूच्या थव्यांना आकर्षित करतात, कावळा आणि बगळा यांचा रंगां बाबतचा वाद, मोराचे थुई थुई नाचणे यांची लोभस रुपे पक्ष्यांचा लॉलीपॉप, पोपट, रंग ,मोर या कवितातून आस्वादवयास मिळतात. तर कडक उन्हात टरबूजाची फोड खाऊन तहान भागल्याचे समाधान 'टरबूज' कवितेत सांगितले आहे.

लहान मुले स्वप्नमय जगात वावरतात याची जाण कविला आहे. 'महान स्वप्न' मध्ये स्वप्नात बडबडणारा मुलगा आपणास भेटतो. तर 'खरचं सांगा, सांगा मजला' या कवितेत असंख्य प्रश्न विचारून जिज्ञासा तृप्ती करणारा गुणी बालक नजरेस पडतो. मुलांचे आई-वडील कोडकौतुक करतात .पण इतर नातलगही टोपणनावाने गंमत करून मजा घेतात. यात शिक्षकही प्रेमाने हाक मारून शिक्षणाचा लळा लावतात.

  'मावशी म्हणते फोनवर

  सुट्टीला ये रे बाळा

सर म्हणतात 'मधुकर'

चुकवू नये कधी शाळा'

असा अनेक नावे धारण करणारा 'मधुकर' मधुकर या कवितेत भेटतो.

सण उत्सवाची रेलचेल आपल्या भारतीय समाजात आहे. त्यामागे आध्यात्मिक व शास्त्रीय कारणपरंपरा आहे. त्याचे महत्त्व आणि महत्ता मुलांना कळणे आवश्यकच आहे. ही पण उणीव या कवितासंग्रहाने भरून काढली आहे. 'नवी भूपाळी' मधून दिवाळी सणाचे, तर होळी आली, गुढीपाडवा या सणांचे काव्यवर्णन करून सणांची विस्तृत व तपशीलवार काव्य बांधणी केलेली दिसून येते. याशिवाय आपले संविधान, रांगोळी, निमंत्रित कवी, मजूर, नाव, गावाकडची मुले या सगळ्या कविता राष्ट्रीय, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा विषयक, साहित्य विषयक मूल्याचे प्रतिबिंब दाखवणाऱ्या आहेत.

आज आदर्श कुठे आहेत असा प्रश्न सार्वत्रिकरित्या विचारला जातो. तर इतिहासाच्या पानापानावर थोरामोठ्यांच्या चरित्रातून आदर्शत्वाची खान आपल्या अवलोकनात येते. पंडित नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस , महात्मा गांधी, राजमाता जिजाऊ, शिवबा या साऱ्याच महापुरुषांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख कवी आदर्शत्वाच्या संस्कारपेरणीसाठी या कवितासंग्रहातून करतो आहे. 'आई, मी पुस्तक होईन' हा विषयवैविध्याने नटलेला, मुलावर सुसंस्काराची बरसात करणारा आकलनसुलभ अस कविता संग्रह आहे. मुलांना कळेल अशी भाषा आणि त्यांचेच विषय घेऊन तो लिहिलेला आहे. त्यामुळे तो अधिक भावतो. असा हा नितांतसुंदर कविता संग्रह मुलांसाठी उपलब्ध केल्याबद्दल डॉ. कैलास दौंड यांचे मनपूर्वक अभिनंदन. !


आई मी पुस्तक होईन: बालकवितासंग्रह

•कवी: डॉ. ‌कैलास दौंड

•प्रकाशक : मिलिंद जगताप,सौरव प्रकाशन, औरंगाबाद

•प्रथमावृत्ती : २४/०८/२०२३

•पृष्ठे: ७२ •मूल्य : १२०₹

•मुखपृष्ठ व आतील चित्रे : बुद्धभुषण लोंढे.

ISBN 987-93-93985-17-0

~~~~~~~~~~~~~~~~~~~

- डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील

(राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक व साहित्यिक)

मु. पो. -घुणकी ता -हातकणंगले जि-कोल्हापूर

पि नं-416112 मो.नं-9834342124

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)