परीक्षार्थी नाही तर अध्ययनार्थी व्हा -सुप्रसिद्ध लेखक एल.के. कुलकर्णी

शालेयवृत्त सेवा
0

 


नांदेड तालुकास्तरीय ५१व्या विज्ञान प्रदर्शन 


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

एखाद्या परीक्षेत कमी गुण पडले म्हणून हताश होऊ नका, एखाद्या परीक्षेतील गुणांवर तुमची प्रतिभा अवलंबून नाही तर ती तुमच्या अभ्यासातील सातत्यावर अवलंबून आहे. त्यामुळे परीक्षार्थी होण्यापेक्षा अध्ययनार्थी व्हा असे मोलाचे मार्गदर्शन सुप्रसिद्ध लेखक एलके कुलकर्णी यांनी नांदेड तालुकास्तरीय ५१व्या विज्ञान प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांना केले.

शालेय विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासत त्यांच्यातील कुतूहलाला अभिव्यक्तीची जोड द्यावी आणि त्या माध्यमातून नवनवीन शोधांचा जन्म व्हावा या हेतूने नांदेड तालुक्याच्या शिक्षण विभागातर्फे दरवर्षी विज्ञान प्रदर्शन आयोजित केले जाते. यावर्षी नांदेड तालुक्याचे ५१वे विज्ञान प्रदर्शन सांदीपनी पब्लिक स्कूल तरोडा येथे आयोजित करण्यात आले. त्यावेळी उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्यांत एक महान संशोधक दडलेला आहे. आपण स्वतःला कधीच कमी लेखायचे नाही. आपली आर्थिक, सामाजिक परिस्थिती कधीच आपल्या प्रगतीचा अडसर ठरू शकत नाही. फक्त आपण स्वतःवर विश्वास ठेवत आपल्यासोबत जगाचे कल्याण करण्यासाठी उत्तमाचा व्यासंग करावा. आपण जे ही करू ते अद्वितीय ठरेल अशी आपली कार्यपद्धती आपण विकसित करावी. विज्ञानाचा फायदा समस्त मानव कल्याणासाठी करता यावा यासाठी निरंतर प्रयोग करत रहा. अशाच छोट्या छोट्या प्रयोगातून उद्याचे महान शोध लागू शकतात. उद्याचा आधुनिक भारत अशा विज्ञान प्रदर्शनातून घडत असतो.



विज्ञान प्रदर्शनाचे अतिशय छान आणि सुव्यवस्थित नियोजन आणि आयोजन केल्याबद्दल शिक्षण विभागाचे त्यांनी यावेळी अभिनंदन केले.

यावेळी विचारपीठावर नांदेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी नागराज बनसोडे, साहित्यिक तथा ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी, सांदीपनी पब्लिक स्कूलचे संचालक विपुल राठोड,  केंद्रप्रमुख माधव धुतमल, निरंजन भारती, व्यंकट गंदपवाड उपस्थित होते.

या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या उच्च प्राथमिक स्तरातील ५०, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरातील १९ तसेच शिक्षक आणि प्रयोगशाळा सहाय्यक गटातून ३ स्पर्धक सहभागी झाले होते.

प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून आनंद सुरसे, अनिल सुगावकर, राजेश कुलकर्णी, शिवराज देशमुख, रश्मी यंदे, सीमा अवस्थी यांनी परीक्षण केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना गटशिक्षणाधिकारी नागराज बनसोडे यांनी मानवाचे कल्याण हाच प्रत्येक शोधाचा आणि तंत्रज्ञानाचा अंतिम हेतू असावा, प्रत्येकाने प्रयोग करत राहावे यातूनच नवीन शोधांचा जन्म होतो असे सांगत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

या विज्ञान प्रदर्शनाचे थेट प्रक्षेपण तंत्रस्नेही शिक्षक अक्षय ढोके आणि युसूफ खान यांनी केले. तालुक्यातील शाळांनी हे प्रदर्शन आपल्या विद्यार्थ्यांना लाईव्ह दाखवले.

उद्घाटनाचे सुरेख सूत्रसंचालन शिवकुमार काशेट्टे यांनी केले तर आभार व्यंकटेश चौधरी यांनी मानले. तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विषय सहाय्यक सुधाकर राठोड, बालाजी लोकरे, शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक मारुती मेकाले तसेच शाळेतील पूर्ण शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)