■ शालेय विद्यार्थ्यांसाठी विभागीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन
◆साने गुरूजी जयंतीनिमित्त हेलस कथामाला व मानस फाऊंडेशनचा उपक्रम
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा हेलस आणि मानस फाऊंडेशन जालना यांच्या संयुक्त सहकार्याने पूज्य साने गुरुजींच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी मराठवाडास्तरीय विभागीय कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारची फी नाही. अशी माहिती कथामालेच्या बैठकीत अध्यक्ष तथा संयोजक कल्पना दत्तात्रय हेलसकर यांनी दिली आहे.
यावेळी डॉ.सुहास सदाव्रते, बाबासाहेब हेलसकर, विजय वायाळ, सतीश कुलकर्णी, प्रमोद देशमुख, मंताजी ढाकरे, ईश्वरदास मोताळे आदींची उपस्थिती होती. स्व.दत्तात्रय हेलसकर यांनी १९९४ साली स्थापन केलेल्या साने गुरुजी कथामालेच्या हेलस शाखेतर्फे विद्यार्थ्यांसाठी अनेकविध संस्कारक्षम शैक्षणिक, सामाजिक, विधायक उपक्रम राबविले जातात.
विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी मराठवाडा स्तरावर इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन गटात कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कथाकथन स्पर्धेचे हे पाचवे वर्षे होय. मराठवाड्यातून आजवर उत्तम प्रतिसाद लाभलेली ही स्पर्धा प्रतिष्ठेची समजली जाते.
स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी नाही. स्पर्धा मराठवाड्यातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आहे. बालगट : इयत्ता पाचवी ते सातवी व किशोर गट : इयत्ता आठवी ते दहावी अशा दोन गटात स्पर्धा आहे.️
कथाकथनासाठी विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतील संस्कारक्षम, बोधप्रद कथेची निवड करणे आवश्यक आहे. कथा आठ ते दहा मिनिटांची असावी. जिल्हास्तरीय विजेत्यांना प्रथम, व्दितीय व तृतीय पारितोषिक म्हणून प्रमाणपत्र व ग्रंथ भेट देण्यात येईल तसेच जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाच्य़ा स्पर्धकाची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येईल.
बालगट व किशोर या दोन्ही गटातील विभागस्तरीय विजेत्यांना रोख पारितोषिके, प्रमाणपत्र देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात येईल. विजेत्यांना प्रथम पारितोषिक रोख दीड हजार रुपये, द्वितीय : एक हजार रुपये, तृतीय : पाचशे रुपये तसेच उत्तेजनार्थ पारितोषिकेही आहेत. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेत सहभाग नोंदणीची अंतिम तारीख दि.३ जानेवारी,२०२४ आहे. सहभागासाठी खालील लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे. https://forms.gle/8mgwTH9PCGrriuPb8
जिल्हास्तरीय स्पर्धा सोमवार दि. ८ जानेवारी, २०२४, तर विभागस्तरीय स्पर्धा सोमवार दि. २२ जानेवारी,२०२४ रोजी आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. स्पर्धा नियोजनात ऐनवेळी काही बदल कराण्याचा अधिकार संयोजन समितीकडे असेल. स्पर्धेचे ठिकाण नावनोंदणी नंतर यथावकाश कळविण्यात येईल.
विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये सहभागासाठी प्रेरित करावे. स्पर्धा यशस्वितेसाठी सहकार्य, सहभाग नोंदवावा असे आग्रहाचे आर्जव
कथामालेचे जिल्हा संयोजक तथा प्रसिद्ध साहित्यिक व्यंकटेश चौधरी, सहसंयोजक पद्माकर कुलकर्णी, विलास कोळनूरकर यांनी केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .