नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
थोर भारतीय गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतभर गणित दिवस साजरा केला जातो. या राष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने वैविध्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या अक्षर परिवारात सर्वच शाळांमध्ये गणित दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. सर्व शाळांमध्ये रामानुजन यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
राष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने वाजेगाव येथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी गणित जत्रेचे आयोजन केले. यात त्यांनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय गणित तज्ज्ञांची माहिती असणारे तक्त्यांचे प्रदर्शन मांडले. गणितातील विविध आकार, रचना, सूत्रे यांचा वापर करून रांगोळ्या काढल्या. तसेच विविध आकार वापरून कोलाज व चित्रकला यांचे सादरीकरण केले. तसेच वांगी येथील शाळेत देखील या निमित्ताने बालसभा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी रामानुजन यांची माहिती सांगितली. तसेच दैनंदिन व्यवहारातील गणिताचे महत्त्व आणि त्याचा सुलभ वापर याबद्दल भूमिका मांडली. वाडीपुयड येथेदेखील गणित दिनाच्या निमित्ताने आयोजित बालसभेत मुख्याध्यापक दत्तप्रसाद पांडागळे यांनी विद्यार्थ्यांना विविध गणितीय प्रात्यक्षिक करून दाखविले.
यावेळी विविध गणिती कोडे, प्रश्नमंजुषा यांचे आयोजन करण्यात आले. वाजेगाव येथील गणित जत्रेच्या आयोजनासाठी शाळेतील सहशिक्षिका सीमा देवरे, धम्मदिना सोनकांबळे, मुक्ता गोरगिळे, शोभा बकवाड यांनी परिश्रम घेतले. या जत्रेसाठी इयत्ता सातवीतील दिवेश, पवन, रुमान, खादर, फैजान, पायल, सारिका, कैकशा आदी, तर इयत्ता सहावीतील अनुष्का, आकांक्षा, सम्राट, जुबेर इत्यादी मुलांनी सहभाग घेतला. तसेच सारंग स्वामी, मेघा पोलावार या उपक्रमशील शिक्षकांनी आपल्या आपल्या शाळेत गणित दिनाचे सुव्यवस्थित नियोजन केले. वाजेगाव बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी, केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड तसेच केंद्रीय मुख्याध्यापक बाबुराव जाधव यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .