मोठ मोठी बिदागी घेवून प्रबोधनाच्या नावाखाली वा लोकांना देवाच्या वा धर्माच्या कोपाची भितीच्या नावाखाली बुवाबाजी, अंधश्रद्धा, लुटमार करून तरीही स्वतःला बुवा, बापु, महाराज, किर्तनकार म्हणवून घेणाऱ्यांची कमी महाराष्ट्रात तेंव्हाही नव्हती व आजही नाही*
परंतू केवळ लोकजागृती, लोकप्रबोधन व लोककल्याणासाठी उभे आयुष्य महाराष्ट्रभर वणवण फिरणारा संत म्हणजे डेबूजी झिंगराजी जानोरकर अर्थात राष्ट्रसंत गाडगेबाबा. राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी कर्मवाद, विज्ञानवादाचा पुरस्कार केला व समाजातील अनिष्ठ चालीरितीवर आपल्या किर्तनातून व कृतीतून प्रहार केले.
गाडगेबाबा नेहमी सांगत देव, देव करत लोकांचे प्रश्न सुटणार नाहीत, कर्मकांड लोकांना अधोगतीकडे नेते हे जाणलेल्या गाडगेबाबांनी विज्ञानवादी दृष्टिकोनाचा प्रसार आणि प्रचार करायला सुरुवात केली. समाजाची प्रगती ही स्वच्छतेतून होईल, शिक्षणातून होईल. हरी हरी करून कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी लोकांना प्रयत्नवादी व्हावे लागेल, हे त्यांनी जाणले. ते फक्त विचार मांडणारे कीर्तनकार नव्हते तर प्रत्यक्ष विचार आचरणात आणून नंतरच त्यावर भाष्य करणारे होते. खेड्यापाड्यातील गल्लोगल्ली स्वत: खराटा फिरवणारे होते.
स्वच्छतेच्या मोहिमेचा उपयोग जातीजातीतील भेदभाव नष्ट करण्यासाठीही त्यांनी केला. स्वच्छतेचे महत्त्व त्यांनी विदर्भापासून खानदेशापर्यंत, पश्चिम महाराष्ट्रापासून मुंबई, कोकणापर्यंत कीर्तनाच्या माध्यमातून पोहोचवले. शिक्षण, सावकारी, देवस-नवस, पशुहत्या यांसारखे विषय घेऊन मायबोलीत कीर्तनाद्वारे समाज प्रबोधन केले.*
अंधश्रद्धेवर, मूर्तिपूजेवर गाडगेबाबा बोच-या शब्दांत मार्मिकपणे हल्ला चढवायचे ‘अरे तुमी पंढरीले जाता, शेगावले जाता; पण त्यो तुमचा तितला देव बोलतो काय? तुमी जेवलं, पाणी पिलं, आसं तरी इचारतो काय?’ याही पुढे जाऊन ते कीर्तनातून म्हणतात, ‘असा कसा तुमचा देव? कुत्रं निवद खाते तर त्याला हाडबी नाही मनत.’ हे ऐकून काही लोकांना हसू यायचे, तर देव मानणा-यांना राग यायचा. पण कीर्तनाला बाया, मुले, माणसे गर्दी करायचे. प्राध्यापक मा. म. देशमुख गाडगेबाबांबद्दल लिहितात, ‘गाडगेबाबांनी फक्त कपडे धुऊन स्वच्छ केले नाहीत, तर भारतीय समाजाचे मनही स्वच्छ केले.
ज्या गावात संत गाडगेबाबांचे कीर्तन असायचे त्या गावात दवंडी देऊन ग्रामस्थांना माहिती दिली जायची. त्या गावात जाऊन दिवसभर गल्ल्या स्वच्छ करून संध्याकाळी त्याच गावात कीर्तन करत असत. कीर्तनात टाळ, मृदंग, खंजिरी असायची. एक उदाहरण संपले की, ‘गोपाला, गोपाला देवकीनंदन गोपाला..’या धृवपदाचा कीर्तनात गाभा असायचा. बाबा हे धृवपद हात उंच करून टाळ्या वाजवत तालात म्हणत, तसेच कीर्तन ऐकणा-यांना त्याच तालावर म्हणायला सांगायचे. मग दुसरा विषय घेऊन पुन्हा कीर्तनाला सुरुवात होई. ते ग्रामस्थांच्या, समाजातील अंधश्रद्धेवर टीका करून मवाळ भाषेत कथाकथन करून श्रोते आपलेसे करायचे. त्यांची भाषा गावाकडची. व-हाडी भाषा. त्यामुळे मले, तुले, बावा, लेकरू, पोरगं असे शब्द ते कीर्तनात वापरत असत. त्यातला मर्म समजला की, लोक पोट धरून धरून हसून दाद द्यायचे.
असा हा स्वच्छतेचा पुजारी आधुनिक समाज सुधारक. आज इथे उद्या तिथे. अंगावर फाटक्या चिंध्यांचे कपडे व पाणी पिण्यासाठी गाडगे घेऊन, आज एका गावाला तर उद्या दुस-या गावाला, ना अन्नाची, ना जेवणाची, ना झोपण्याची फिकीर. जे मिळेल ते खायचे. जेथे जागा मिळाली तेथे झोपायचे. त्यांना फक्त एकच ध्यास होता तो कीर्तनातून लोकजागृती करायची. त्यापायी त्यांनी उभ्या संसाराकडे पाठ फिरवली. त्यांनी कीर्तनातून समाज प्रबोधनाचे महान कार्य केले. हे कार्य ते आजीवन करीत राहिले. संत गाडगेबाबा यांनी लोकशिक्षणाचे कार्य विदर्भातील ऋणमोचन या गावापासून सुरू केले.
१९०८मध्ये पूर्णा नदीवरील घाट सर्वधर्मीयांसाठी, जातीसाठी खुला केला. १९२५ला मूर्तिजापूर येथे गोरक्षण धर्मशाळा व विद्यालय स्थापन केले. १९२७ला पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा सुरू केली. गुरू-शिष्याची परंपरा त्यांना मान्य नव्हती. शिष्य गुरूंना मंदिरामध्ये बसवून त्यांची पूजा करतो, याची त्यांना चीड होती. म्हणून ते म्हणायचे, ‘मी कुणाचा गुरू नाही अन् माझा कुणी शिष्य नाही.’ ते संप्रदायाच्या विरोधात होते. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले म्हणून आठ फेब्रुवारी १९५२ रोजी श्रीगाडगेबाबा मिशन स्थापन केले. त्याद्वारे त्यांनी महाराष्ट्रभर शिक्षणसंस्था व अनाथ, अपंग यांच्या पुनर्वसनासाठी त्र्यंबकेश्वर, आळंदी, पंढरपूर इत्यादी ठिकाणी धर्मशाळा स्थापन केल्या. आचार्य अत्रे गाडगेबाबांबद्दल आदराने एका ठिकाणी म्हणतात, ‘सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात.’ १९३१ला वरवंडे येथे संत गाडगेबाबांच्या प्रबोधनाने पशुहत्या बंद झाली. १९५४ मध्ये जे. जे. रुग्णालय परिसरात त्यांनी धर्मशाळा बांधली. बाबांनी डॉ.पंजाबराव देशमुख यांना शिक्षणसंस्थांद्वारे शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांच्या कार्यात मदत केली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची संत गाडगेबाबांशी मुंबईला तसेच पंढरपूरला भेट झाली. पंढरपूरची चोखामेळा धर्मशाळा संत गाडगेबाबांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली होती. या आधुनिक विज्ञानवादी संताचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर करीत. संत गाडगेबाबांनी आताच्या तथाकथित बाबा लोकांसारखी अफाट संपत्ती जमवली नाही. स्वत:च्या मुलीच्या नावावरसुद्धा कोणतीही संस्था केली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीसुद्धा त्यांच्या वारसांसाठी कोणतीही शिक्षणसंस्था त्यांच्या नावावर केली नाही व संस्थांच्या मालमत्तेचा अधिकार दिला नाही. या प्रकारचा त्याग असामान्य आणि महान कर्मयोगीच करू शकतात. संत गाडगेबाबांनी त्यांच्या कार्यासाठी कुणासमोर मदतीसाठी हात पसरला नाही. त्यांनी कीर्तनातून विज्ञानवादी लोकजागृती, लोकप्रबोधनाचे कार्य अखेरच्या श्वासापर्यंत केले.
संत गाडगेबाबांनी खरा रोकडा धर्म सांगितला. त्या धर्माचा दहा कलमी कार्यक्रम समाजापुढे ठेवला. भुकेल्यांना अन्न, लहान लेकरांना अन्न, वस्ती नसणा-यांना वस्ती, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण, घर नसणा-यांना घराचा निवारा, आसरा, काम नसणा-यांना कामधंदा, रोजगार, अंध, अपंग, रुग्णांना औषधे, मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण-तरुणींचे लग्न जमवून देणे, दु:खी, निराश असणा-यांना हिंमत देऊन जगण्याचे बळ देणे इत्यादी त्यांचे विचार आजही सामाजिक न्यायाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.
एकदा मुंबईच्या भायखळा मार्केटमध्ये गाडगेबाबांचे कीर्तन होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या सहका-यांसोबत कीर्तनाला गेले. कीर्तन सुरू होताच श्रोत्यांपैकी एकाने त्यांना विचारले, ‘महाराज एक इचारू का?’ त्यावर गाडगेबाबा म्हणाले, ‘इचारा मायबाप. पण मले महाराज मनू नका. मी आपले लेकरू हाय. बोलविते धनीच बसलेत तुमच्या पलीकडे.’ असे म्हणून त्यांनी बाबासाहेबांकडे बोट दाखवले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चक्क जमिनीवर बसून कीर्तन ऐकत होते.
. लोकसंत, कर्मयोगी, गाडगेबाबांनी ग्रामस्वच्छता अभियान सुरू केले. कीर्तनाद्वारे अंधश्रद्धा, समाजातील वाईट चालीरीती, शिक्षणाचे महत्त्व, शेतक-यांची सावकाराद्वारे होणारी फसवणूक, पिळवणूक, जातिभेद जाणून समाजाला त्यासाठी जागृत केले, विज्ञानवादी दृष्टिकोन दिला. त्यांनी दिलेल्या व राबवलेल्या कार्यक्रमाचा आदर्श ठेवून महाराष्ट्र सरकारतर्फे ग्रामस्वच्छता मोहीम, सामाजिक न्यायाच्या योजना चालवल्या जात आहेत. या महान विज्ञानवादी, पुरोगामी कर्मयोगी संताला विनम्र अभिवादन.
- बालासाहेब लोणे, नांदेड
9421756489 (Wts) / 8975401662
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .