मनोरंजन आणि ज्ञानाचा खजिना : 'एलियन आला स्वप्नात'

शालेयवृत्त सेवा
0

 



ज्येष्ठ बालसाहित्यकार,  शिक्षणतज्ज्ञ आणि प्रयोगशील लेखक डॉ. सुरेश सावंत यांचे आजवर बालकांसाठी बारा बालकाव्यसंग्रह प्रकाशित झाले असून त्यांचा "एलियन आला स्वप्नात" हा नवीन बालकवितासंग्रह पुण्याच्या चेतक बुक्स प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. डॉ. सुरेश सावंत यांना बालकांविषयी नितांत जिव्हाळा आहे. त्यांची कविता मनोरंजन करत ज्ञानामृत पाजते हे त्यांच्या कवितेचे मोठेच बलस्थान आहे. बालसाहित्यात विविधांगी आणि कसदार लेखन करून  बालसाहित्य समृद्ध करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.


नित्यनूतनता हा त्यांच्या लेखनाचा महत्त्वाचा विशेष आहे. "एलियन आला स्वप्नात" हा डॉ. सुरेश सावंत यांचा  बालकाव्यसंग्रह नुकताच म्हणजे 2023 मध्ये प्रकाशित झाला आहे. त्यात 29 कविता असून प्रत्येक कवितेत वेगळेपणा आहे. विषयांची विविधता आहे. हा संग्रह वाचताना बालकांच्या भाववृत्ती फुलवणारे डॉ. सावंतसर हे सानेगुरुजीच वाटतात! 

हा संग्रह किशोर, वयम, छात्रप्रबोधन, मनशक्ती, ऋग्वेद, कथामाला, निर्मळ रानवारा, मुलांचे मासिक आणि चैत्रेय  वार्षिक या नियतकालिकांना त्यांनी कृतज्ञतापूर्वक अर्पण केल्यामुळे त्यांची बालकांशी किती घट्ट नाळ जुळली आहे, हे आपल्या लक्षात येते.


सावंतसरांची कविता लिहिण्याची पद्धत कशी अफलातून आहे, हे पहिल्याच कवितेतून सिध्द होते. ते मगरीला 'डायनाॅसोरची बहीण' म्हणतात आणि 'कासवा कासवा' ह्या कवितेत कासवाला डायनाॅसोरचा नातेवाईक म्हणतात .

वाघाची मावशी मांजरी आहे हे मुलांना माहिती आहे, पण  डायनाॅसोरची बहीण कोण हे नव्याने सावंतसरांनी मुलांना सांगितलं आहे. या कवितेतून "नक्राश्रू "या शब्दाचा अर्थही मुलांना समजला. भल्याभल्यांना या शब्दाचा अर्थ नीट लावता येत नाही. बालकवितेतून ह्या अर्थाची सहज उकल झाली आहे. शिकार गिळताना नक्राश्रू ढाळणा-या, राखाडी, करडा व काळपट रंग असणाऱ्या, बुलेटप्रुफ अंग लाभलेल्या आणि शेपटीचा हत्यारासारखा वापर करणाऱ्या मगरीला कवी प्रश्न विचारतो - 

'वाळूच्या ढिगाऱ्यात लपवता अंडी

अंड्यांना पाण्यात वाजते का थंडी' 


ह्या कवितेतून बालकांची  मनोरंजनाबरोबर ज्ञानाची भूक भागवली जाते. सावंतसरांनी त्यांच्या कवितेत पक्षी आणि प्राण्यांची चतुराई दाखवली आहे.

सुगरण, कोळी, वानर, ससा, खार, माकड, कोकीळ, टिटवी, वटवाघूळ, बगळा, जिराफ, लांडगा, वाघ ही जंगलाची देण आहे. त्यांच्या स्वभावाची खास वैशिष्ट्ये काव्यसंग्रहात खूप अभ्यासपूर्ण पद्धतीने टिपली आहेत. त्याचा एक नमुना - 


हिरव्यागार कुरणात,

ससा मारतोय उड्या

खार पळतेय सरसर, 

माकड काढतं खोड्या 


रांगेत चालती मुंग्या

शिस्त त्यांची भारी

म्हशीच्या पाठीवर

बगळ्यांची स्वारी. 


ह्या  कवितेत एक अतिशय  महत्त्वाचा खुलासा कवीने केला आहे. "कोकीळ गातो गाणी" ही ओळ वापरली, ती अतिशय योग्य आहे. मुळात कोकीळ गातो, कोकीळा गात नाही. बहुतांशी लोकांचा समज आहे, की कोकीळा गाते. तो गैरसमज ह्या  कवितेने दूर केला आहे.

मुले पक्षिजगतात रमतात. त्यांना पक्ष्यांविषयी भारी आकर्षण असते. पण ग्रामीण भागातील मुलांना पेंग्विनविषयी फारशी माहिती नाही. ती 'पेंग्विनदादा' ह्या  कवितेत मिळते. काळ्या कोटावर पांढरा टाय असं भारी व लोभस वर्णन  'पेंग्विन' कवितेत आलेलं आहे. मुलांची सौंदर्यदृष्टी विकसित करण्यात सावंतसर यशस्वी झाले आहेत. पुढे याच कवितेत एक निरुत्तर करणारा प्रश्न उपस्थित केला आहे, तो असा:


पेंग्विनदादा पेंग्विनदादा

चोचीवर रंगीबेरंगी नक्षी

खरंच सांगा पेंग्विनदादा, 

तुम्ही प्राणी आहात की पक्षी? 


'जिराफदादा' ह्या कवितेत त्याची रूप, गुण आणि वैशिष्ट्ये छान सांगितली आहेत. जिराफ हा आफ्रिका खंडात वसती करून राहणारा प्राणी. काटेरी झाडांचे शेंडे खातो. हा टांझानियाचा राष्ट्रीय प्राणी आहे. कवितेच्या शेवटात संस्काराचा धागा सापडतो, तो असा-


सर्वात उंच प्राण्याकडून ह्या

तुम्ही आम्ही शिकायचे काय? 

डोळे आभाळाला भिडले तरी   

जमिनीवरच असावेत पाय! 


ह्या कवितेतून अगदी सहजपणे उद्बोधन  करण्यात आले आहे .

काझीरंगा अभयारण्यात भेटणाऱ्या एकशिंगी गेंड्याचे चित्रमय वर्णन आले आहे. तो हत्तीचा धाकटा भाऊ आहे. गेंड्याने वाघाला जोरदार धडक मारली, तर वाघसुद्धा चीत होतो.

ही त्याची खासियत समजल्यावर बाळगोपाळ आचंबित होतात.

तसेच देवमासा हा सस्तन प्राणी असून तो मनमौजी आहे. खोल पाण्यात समाधी लावून बसतो आणि तो तेवढाच खोडकर आहे, हे सांगताना कवी म्हणतात :


'खोडकर देवमासा 

उगीच काढतो खोड्या 

जहाजांना धक्के देत 

उलटून टाकतो होड्या'


पोपटांच्या शाळेविषयी मुलांना नेहमीच आकर्षण असते. कवीने मुलांच्या मनातले कुतूहलाचे भाव खुबीने  टिपले आहेत.

"या बसा रामराम " असं बोलणाऱ्या पोपटाला कवितेतून त्यांनी न्याय मिळवून दिला आहे. खाण्यापिण्याची तक्रार कधीच न करणाऱ्या , लख्ख स्मरणशक्ती लाभलेल्या , कौतुकास्पद सहनशक्ती असणाऱ्या आणि शिस्तप्रिय, मेहनती अशा गर्दभाला  लोक मूर्ख का म्हणत असतील? हा सवाल मुलांना पडतो. त्याचं सुंदर चित्रण  "शहाणे गाढव"  ह्या  कवितेत कवीने केले आहे.

 'एलियन आला स्वप्नात' ही ह्या संग्रहाच्या शीर्षकाची कविता. एलियन म्हणजे नेमके काय याचा सुंदर परिचय या कवितेत कवीने करून दिला आहे आणि शेवटी कवी म्हणतात -


'एलियन माझ्या स्वप्नात आला

मला म्हणाला ,'चल रे भाऊ 

एका जागी कंटाळला आहेस

छानपैकी चंद्रावर फिरून येऊ'. 


शेतकरी ज्याच्या गाण्याने  सावध होतात, मशागतीची कामे करतात, तो म्हणजे पावशा पक्षी. त्याला कवीने 'पावसाचा दूत' असे म्हटले आहे. पावशाचे सुंदर वर्णन ह्या कवितेत असून 'पाऊसपाण्याचे तंत्र जाणणारी वेधशाळा' असे या पक्ष्याचे समर्पक वर्णन  करून कवी म्हणतात- 


'पावसाच्या सरी, थंडगार वारा

शेतात बरसल्या जीवनधारा !

पावशा पक्षी गाऊ लागला

पाऊस आला! पाऊस आला!' 


घुबडाला अशुभ म्हणून बदनाम का केलं असावं, हा प्रश्न बालमनाला नेहमीच सतावतो. तसेच  काटेरी साळींदरला वाघ सिंहसुद्धा का भितात? त्यांच्या अंगावरचे काटे म्हणजे धनुष्याचे बाण आहेत का? यासह इराणचा राष्ट्रीय पक्षी कोणता?  जंगलाचा शेतकरी असणारा पक्षी कोण?  बहुरूपी अननस म्हणजे काय? व्याधी विकारांना पिटाळून लावणारा फणस एवढा गुणकारी कसा?  या प्रश्नांची उत्तरे वाचकांना ह्या कवितासंग्रहात सापडतात.

शाळेच्या वेळापत्रकातील  शेवटचा तास आपल्याशी बोलतो आहे. या तासाने तर धमाल उडवून दिली आहे. वेळापत्रकातील शेवटचा तास आपली तक्रार घेऊन हेडसरांकडे जातो आणि न्याय मागतो, याची मोठी रंजक कहाणीच एका कवितेत आली आहे .


'काही शिक्षक परिपाठाचा

दररोजच करतात सराव 

खेळांचा तास खेळासाठीच

असा झालाच पाहिजे ठराव'


या काव्यसंग्रहात बालविश्वाला आनंदित करणाऱ्या अनेक गमतीजमती सांगितल्या आहेत.

हिमालय मुलांना हाक देतो, कधी कधी जांभयाची  साथ येते, जंगलातील मुंगसाची आणि सापाची लढाई कायम स्मरणात राहते, माणसासारखा  हसणारा तरस हा प्राणी आश्चर्यकारक वाटतो.

बालवाडी हीच आनंदवाडी होऊन जाते.

त्याचबरोबर सीताफळाला डोळे, कपाला कान, घड्याळाला काटे, टेबलाला पाय, हत्तीला सुळे दात असून ते आपले काम का विसरून जातात? असे का बरे व्हावे?  असे प्रश्न बालमनाला या  कवितेत पडतात. आजीची देवपूजा आणि लाडका लाडोबा ह्या  कविता खेळकरपणाचा आनंद देतात. अप्पू अस्वल वाळवीच्या वारुळावर हल्ला करतो. अस्वल हा जंगलातला सर्वात खतरनाक प्राणी! तो नखाने दुसऱ्याला विद्रूप  करतो. अशा ज्ञानरंजनाच्या भरपूर गोष्टी ह्या  कवितांमधून  वाचायला मिळतात.

एका पुस्तकाच्या पाठराखणीत  प्रा. मिलिंद जोशी यांनी म्हटल्याप्रमाणे, सावंतसरांना मुलांविषयी विलक्षण आस्था आणि प्रेम आहे. त्याचबरोबर त्यांच्या कविता मुलांच्या ओठावर सतत रेंगाळणाऱ्या आहेत. कवीचा बालकवितेच्या गावाला जाण्याचा  हा सुंदर प्रवास आनंददायी तर आहेच, शिवाय ज्ञानदान करणाराही आहे .

या कवितासंग्रहाची आकर्षक निर्मिती चेतक बुक्स प्रकाशन पुणे यांनी केली असून मुखपृष्ठ व आतील रेखाटने चित्रकार  पुंडलिक वझे यांची आहेत. 

सरांच्या लिहित्या हातातील सातत्य वृध्दिंगत होवो!


समिक्षक :

वीरभद्र मिरेवाड नायगाव

   संपर्क - 9158681302


' एलियन आला स्वप्नात' (बालकाव्यसंग्रह) 

कवी डॉ. सुरेश सावंत

प्रकाशक : चेतक बुक्स, पुणे

मुखपृष्ठ आणि सजावट : पुंडलिक वझे 

आर्ट पेपरवरील रंगीत पृष्ठे ५७

किंमत रु. ३६०

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)