प्रशांत वंजारे यांची कविता आंबेडकरी प्रमाणशास्त्रातून उगवलेली. - यशवंत मनोहर

शालेयवृत्त सेवा
0

 



'आम्ही युद्धखोर आहोत' काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

आंबेडकरी कविता आंबेडकरवादाचे बोट कधीही सोडत नाही. आंबेडकर प्रमाण म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण. पाच इंद्रियांना होणारे आणि मन या सद्विवेकी इंद्रियाने मंजूर केलेले ज्ञान हे या प्रत्यक्ष प्रमाणशास्त्रानुसारच मिळालेले ज्ञान असते.रिझन आणि मोरॅलिटीचाच हा अविष्कार असतो. हा  अविष्कार विज्ञानसत्याला संमातरच असतो. म्हणजे अंतर्विरोधग्रस्तता कुठल्याही पातळीवर आंबेडकरी प्रमाणशास्त्राला मान्य होऊ शकत नाही. प्रशांत वंजारे यांच्या कवितांना याच प्रमाणशास्त्राचा आधार आहे. म्हणून त्यांच्या 'आम्ही युद्धखोर आहोत' या कविता संग्रहातील कविता आंबेडकरी प्रमाणशास्त्रातून उगवल्या असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांनी केले. ते 'आम्ही युद्धखोर आहोत' च्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. 

         येथील अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संसदेचे अध्यक्ष तथा कवी प्रशांत वंजारे यांच्या आम्ही युद्धखोर आहोत या कवितासंग्रहाचे  प्रकाशन समारंभ बोधीपर्ण प्रकाशन संस्थेच्या वतीने नागपूरच्या लोकसेवा नगरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलतांना डॉ. यशवंत मनोहर म्हणाले, बहुजन समाज हा बहुदु:ख समाज आहे तर आंबेडकरी समाज हा फाळण्यांचा समाज झाला आहे. समाज अमूर्त असल्याने त्या समाजाच्या फाळण्या कधीच नसतात. या फाळण्यांचा प्रारंभ माणसांच्या मनामध्ये होतो. माणसांची मने परस्परांपासून दूर केली की फाळण्यांच्या युगाला प्रारंभ होतो. हा एका वाताहतीचा सुद्धा प्रारंभ असतो. या देशातील फॅसिस्टांना, सत्तास्वामींना असा फाळणीरूप समाज हवा असतो. परंतु नव्वद टक्के समाज हा 'आम्हीरूप' व्हावा हे आम्ही युद्धखोर आहोत या कवितेचे प्रयोजन आहे. 'आम्ही युद्धखोर आहोत' हा कविता संग्रह केवळ आंबेडकरी साहित्यात नव्हे तर एकूण मराठी साहित्यात लक्षणीय ठरेल अशी खात्री सुद्धा त्यांनी व्यक्त केली. 

          यावेळी आम्ही युद्धखोर आहोत या कविता संग्रहावर  समिक्षक डॉ. मनोहर नाईक यांनी सुद्धा समयोचित भाष्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सर्जनादित्य मनोहर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. प्रकाश राठोड यांनी केले. यावेळी बोधीपर्ण प्रकाशनचे प्रा. देवानंद पवार, कवी प्रशांत वंजारे, करन सातपुते, दिपक वानखेडे आदी उपस्थित होते.

         

आंबेडकरी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीत सक्रिय असणाऱ्या प्रशांत वंजारे यांचे 'शरसंधान' हा काव्यसंग्रह आणि ' आंबेडकरी साहित्य: आकलन आणि निरिक्षणे' हा समिक्षा ग्रंथ ही दोन पुस्तके प्रकाशित झाली असून ' पुन्हा शरसंधान' हा काव्यसंग्रह तसेच ' आंबेडकरी विचार : भूमिका आणि संवाद' हा वैचारिक ग्रंथ सुद्धा प्रकाशनाच्या वाटेवर आहे, अशी माहिती साहित्य संसदेचे सरचिटणीस प्रज्ञाधर ढवळे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)