राज्य शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल गावकऱ्यांनी केले सुरेंद्र कुडे यांचे जंगी स्वागत !

शालेयवृत्त सेवा
0

 


पुरस्काराची उंची वाढवणारं माहूर तालुक्यातील व्यक्तिमत्व श्री सुरेंद्र कुडे सर..

नांदेड ( नितिन सावरगावे ) :

       पाच सप्टेंबर रोजी श्री कुडे सर यांना राज्य सरकारचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुण गौरव पुरस्कार मिळाला. जेवढा आनंद त्यांना झाला नसेल त्यापेक्षा जास्त आनंद त्यांची विद्यार्थी, गावकरी, शाळेतील शिक्षकवृंद,आणि त्याचे मित्र मंडळींना झाला.कारण मागच्या 17 वर्षांपासून या माणसाने कसलीही जाहिरात न करता, कोठेही बडेजावपणा न करता , निस्वार्थी भावनेने विद्यार्थी घडवण्याचे कार्य अविरतपणे चालू ठेवले आहे.

          यांचा प्रशासनाने गौरव केलाच पण मूळचा नागपूरकर असलेल्या या माणसाचा शाळेच्या गावकऱ्यांनी भव्य दिव्य ,न भूतो न भविष्यती सत्कार सोहळा घेतला. हे अद्वितीय.....

    5 सप्टेंबर रोजी मुंबईहुन आल्यानंतर दुसऱ्या दिवशीच गावकऱ्यांनी सारखानी सारख्या बाजारपेठ असलेल्या गावापासून त्याच्या शाळेच्या पालाईगुडा गावापर्यंत वाजतगाजत भव्य मिरवणूक काढली. गावातील प्रत्येक नागरिक  मोटारसायकल, चारचाकी गाड्या घेऊन मिरवणूक सहभागी झाला होता. गावात प्रवेश करताच फटाके, आतिषबाजी करून  सरांचे स्वागत करण्यात आले. गावातील विद्यार्थी, महिला वर्ग रस्त्याच्या दुतर्फा थांबून    पुष्पवृष्टी करत होते. लेझीम पथक, ढोल पथक, वाजंत्री यांच्या समवेत गावातील लहान मुलापासून वृद्धांपर्यंत सर्वजण सरांचे स्वागत करण्यासाठी मिरवणुकीत सहभागी झाले होते.

        गावात सरांच्या अभिनंदनाचे मोठमोठे होल्डिंग्स लावण्यात आले होते. असा स्वागत सोहळा गावकऱ्यांनी एक शिक्षकाचा केलेला आम्ही कधी पाहिला नाही. अंगावर शहारे आणणारा असा सोहळा पाहून सरांसोबतच जेष्ठ नागरिकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू वाहत होते.

      सरांच्या या यशात त्यांच्या अर्धांगिनीचाही तितकाच वाटा आहे. कारण सर सकाळी 8 वाजताच शाळेसाठी घराबाहेर पडत असत. ते अंधार झाल्यासचं परत येतात. तेही शनिवार,रविवार आणि सुटीच्या दिवशीही.... इतकंच नाही तर सरांनी गावातील 8 वी ते 10 चे मुलं मुली घराशेजारी च रूम करून पुढील शिक्षणासाठी आणून ठेवले आहेत. कर्मवीर भाऊराव सारखे हे दाम्पत्य त्या मुलांची काळजी घेत असतात. पण ती माऊली कधीही याचा त्रागा न करता सरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहते.

      जि प प्रा शाळा पालाईगुडा येथील त्यांचे सहकारी शिक्षक बांधवही तेवढ्याच तळमळीचे सहकार्यवृत्तीचे आणि  आहेत.आपल्या सोबत्याच्या कामाचे चीज झाले पाहिजे म्हणून शाळेतील सर्वच शिक्षक धडपडताना आम्ही  येथे पाहिले.

     आज सरांनी घडवलेले भरपूर मुलं डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी बनत आहेत. सरांचे आतापर्यंत 28 विद्यार्थ्यांची नवोदय साठी निवड झाली आहे. त्यात मागच्या 12 वर्षापासून खंड नाही. शिष्यवृत्ती परीक्षेत 80 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक व  196 विद्यार्थी आता पर्यंत शिष्यवृत्ती पात्र झाले आहेत.सर्व भौतिक सुविधांनी सुसज्ज अशी त्यांची शाळा वैविध्यपूर्ण उपक्रम राबवून माहूर तालुक्यातील एक आदर्श शाळा बनली आहे. सारखणी, वाई, अंजनखेड येथील पालक स्वतः ऑटो लावून मुलांना येथे शाळेत पाठवतात. 

         किनवट माहूर सारख्या दुर्गम आदिवासी भागात अशा या धेयवेड्या शिक्षकाच्या कामाचे कौतुक करावे तेवढं कमीच. यांच्या प्रेरणेने नक्कीच दोन्ही तालुक्यातील शिक्षक अन इतर शाळा  गुणवत्तापूर्ण होण्यास मदत होईल, यात शंका नाही.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)