राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास शिक्षक व कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागू करणार -माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण

शालेयवृत्त सेवा
0

 


सहकारी पतपेढी शिक्षण विभाग मर्यादीत जिल्हा परिषद नांदेडची ९४ वी वार्षिक सभा संपन्न !

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

शिक्षकांच्या जिल्हा व राज्य पातळीवरील पदोन्नत्यांसह सर्व व्यावसायिक प्रश्न सोडवूच सोबतच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास शिक्षक व कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागु करु असे स्पष्ट आश्वासन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी  सहकारी पतपेढी शिक्षण विभाग मर्यादीत जिल्हा परिषद नांदेडच्या ९४ व्या वार्षिक सभेचे उद्घाटन करताना दिले.

            कार्यक्रमाच्या प्रथम सत्राच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार व नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण हे होते. पुढे बोलताना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की, शिक्षक हा समाजाला दिशा देणारा वर्ग आहे. समाज व देशोन्नतीसाठी आपले योगदान मोठे आहे. नांदेड जिल्ह्यात मागच्या ९४ वर्षापासुन ही सहकारी पतसंस्था स्वतःची प्रगती व सभासदांना आर्थिक संकटाच्या काळात सहकार्य करीत आहे. ही अभिमानास्पद बाब आहे. विद्यमान संचालक मंडळ चांगले काम करीत असल्याचे दिसून येते. विद्यमान संचालक मंडळालाच्या संस्थेचे नाईकनगर, नांदेड येथील कार्यालय  पोलिस विभागाकडून परत मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले. प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड दक्षिणचे आमदार  मोहनअण्णा हंबर्डे, नांदेड (उत्तर) चे आमदार  बालाजीराव कल्याणकर, हदगावचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर, माजी मंत्री डी पी सावंत, माजी आमदार अमरनाथ राजूरकर, सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शामसुंदर शिंदे, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर, नांदेड जिपचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील बेटमोगरेकर, माजी शिक्षण सभापती संजय बेळगे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष  गोविंदराव शिंदे नागेलीकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर शिंदे, सिडको विभागाचे युवा नेतृत्व सतिष बसवदे, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष देविदासराव बस्वदे, शिक्षक संघाचे नेते जीवनराव पाटील वडजे, शिक्षक नेते अशोक पवळे, इब्टाचे राज्य कार्याध्यक्ष मधुकर गच्चे, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सय्यद हबिब, राज्य नेते अशोक मोरे, पुरोगामी शिक्षक संघटनेचे जी एस मंगनाळे, शिक्षक नेते चंद्रकांत दामेकर, शिक्षक समितीचे शेख तस्लीम, काँग्रेस शिक्षक संघटनेचे प्रकाश मुंगल, केंद्रप्रमुख संघटनेचे बालाजीराव डफडे यांची प्रमुख उपस्थिती होती.



        ९४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रथम सत्रात मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावी, बारावी एमबीबीएस, बीडीएस, आयआयटी, एनआयटी, नवोदय व शिष्यवृत्ती तसेच सभासदांमधून किंवा त्यांच्या पाल्यांनी शासनाच्या वर्ग एक व वर्ग दोन पदी निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा तसेच सभासदांनी उच्च शिक्षणामध्ये धारण केलेली पीएचडी , सेट नेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सभासदांचा आणि संस्थेच्या या वर्षांमध्ये सेवानिवृत्त झालेल्या सभासदांचा सत्कार शाल, पुष्पहार व स्मृतिचिन्ह देवून माजी मुख्यमंत्री  अशोकराव चव्हाण  व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 

      अध्यक्षीय समारोपामध्ये माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी  शिक्षण पतसंस्थेने मध्यवर्ती बँकेत गुंतवणूक केलेली रक्कम शिक्षण पतसंस्थेला कशा पद्धतीने परत करता येईल यावर बँकेच्या बैठकीमध्ये आपण चर्चा करून ठोस निर्णय घेवू अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात पतसंस्थेचे अध्यक्ष सुधाकर थडके यांनी पतसंस्थेचा लेखाजोगा व पतसंस्थेतील चढ-उतार याची परिपूर्ण माहिती सभागृहास दिली. प्रथम सत्र कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास मुळे व रमेश पवार यांनी  केले.

          द्वितीय सत्र कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पतसंस्थेचे अध्यक्ष सुधाकर विश्वनाथराव थडके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे कामकाज सुरू करण्यात आले. सर्वप्रथम सर्व संचालकांचे स्वागत सभासदांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पतसंस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे स्वागत संचालकांच्या हस्ते करण्यात आले. द्वितीय सत्रात विषय पत्रिकेनुसार विषय सभागृहात मांडण्यात आले. प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा होऊन सभासदांनी सर्व ठरावांना टाळ्यांच्या गजरात बहुमताने मान्यता दिली. उपस्थित सर्व सभासदांनी सभेतील सर्व विषयांना मान्यता दिल्याबद्दल पतसंस्थेचे अध्यक्ष यांनी त्यांचे जाहीर आभार मानले. द्वितीय सत्राचे सूत्रसंचालन संचालक बालासाहेब लोणे, संचालक अशोक पाटील मारतळेकर, संचालक प्रल्हाद राठोड यांनी केले व राष्ट्रगीतानंतर सभेची सांगता झाली.

         ९४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वी पार पाडण्यासाठी अध्यक्ष सुधाकर थडके, उपाध्यक्ष दिलीप देवकांबळे, सचिव सौ.संगिता माळगे-फसमले, संचालक प्रल्हाद राठोड, अशोक पाटील, संजय अंभोरे, माणिक कदम, बालासाहेब लोणे, बाबुराव कैलासे, दत्तराम भोसले, संचालिका सौ. राजश्री देशमुख-मुळे, हनमंत जोगपेटे, तज्ज्ञ संचालक फारुख बेग, पाराजी पोले, पतसंस्थेचे अधिक्षक प्रविण देवापुरे, कर्मचारी राजकुमार दयाडे, विनोद मुपडे, बालाजी चिंतावार, गुंडोजी येडे, साहेबराव भंगे व मारोती ढगे यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)