‘जातीअंताची लढाई’ एक धगधगता कविता संग्रह !

शालेयवृत्त सेवा
0


       प्रा. डॉ. हेमंत सोनकांबळे यांची ‘जातीअंताची लढाई’ हा काव्यसंग्रह म्हणजे लहानपणापासून ते प्राध्यापक पदावर कार्य करीत असताना आलेले दाहक अनुभव एक कवी म्हणून त्यांनी आपल्या काव्यसंग्रहात अलगदपणे प्रतिबिंबित केलेले आहे. सदर काव्यसंग्रहात एकूण 56 कविता असून त्यातील कवितांमध्ये मानवी जीवनातील अनुभव वलयांकित केलेले आहे ‘जे न देखे रवी ते देखे कवी’ यानुसार एकूणच त्यांच्या कवितेमध्ये प्रतिबिंब दिसून येते. या काव्यसंग्रहात सामाजिक जाणीवा, वेदना, भारतीय संविधान, धर्मांधता, गुलामी, विद्रोह, सत्यशोधक, स्वातंत्र्य, स्त्री जाणीव, राजकारण,शेतकरी, फॅशनची दुनिया आणि मायबाप अशा विविध अंगाने भरलेला हा काव्यसंग्रह आहे.

       ‘युगंधर पासून ते मरणोत्तर’ असे या काव्यसंग्रहाची एकूणच मांडणी झालेली आहे. कवी प्रा. डॉ. हेमंत सोनकांबळे यांनी लिहिलेली प्रत्येक कविता म्हणजे एक धगधगती मशाल आहे. स्वतःचे जीवन जगत असताना आलेले अनुभव, सोसलेले दाहक चटके यांची एकूणच  फलश्रुती म्हणजे ‘जातीअंताची लढाई’ होय असे येथे म्हणावे लागते.

     ‘सत्यशोधक’ या कवितेमध्ये कवी प्रा. डॉ. हेमंत सोनकांबळे म्हणतात,

“हे ज्योतिबा...

तू इथे जन्माला यायला नको होते

तू आलास पेशवाईनंतर

आमच्या मेंदूवरचा गंज घासून काढलास”

     महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून समतेचा धागा दिला तू होता म्हणून शिक्षणाचे सूत्र घराघरात पोहोचले आणि गुलामगिरी, अस्पृशता, केशवपण या क्रुरप्रथा पायदळी तुडविल्या. ज्योतिबा नसते तर अस्पृश्यांची उन्नती, शेतकऱ्यांची प्रगती कधीच झाली नसती असे लिहायला सुद्धा कवी  विसरत नाही.

        ‘जातीअंताची लढाई’ ही कविता वाचत असताना जातीयवाद समाजात कसा फोफावत चालला आहे असे नमूद करताना कवी म्हणतो,

“ का ?

फोफावला जातो ही समाजात जातीवाद 

प्रत्येक मनुष्य विसरतो जागोजागी मानवतावाद

जात – पात,

 देव - धर्म असतात प्रत्येकांचे विभिन्न

‘स्व’त्वाचा नकोच नुसता स्वाभिमान

असावा लागतो हृदयात सर्वाविषयी अभिमान”

         आज सर्वीकडे जातीवाद फोफावत चाललेला आहे. भारत हा तर लोकशाही प्रधान देश असून जातीयतेला खतपाणी घालण्याचे काम आज जास्त प्रमाणात होत आहे याला जबाबदार कोण ? मानवी जीवन हे सर्वांग सुंदर असून जातीवाद मानसिकतेतून नंतर हत्याकांड आज आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत हे सर्व बंद होणे काळाची गरज आहे असे कवीला येथे सांगायचे आहे.

‘संवेदना’ या कवितेत कवी म्हणतो,

“उघडे डोळे करून बघा

फिरवित नजर चोहीकडे

रोजच इथे काय घडते आहे

लाखो फिर्यादी ओरडत आहेत

सरकार आंधळे झोपत आहे...”

         सदर कवितेमध्ये माणूस हा संवेदनाहीन झालेला आहे. डोळे असून तो आंधळा तर कान असून तो बहिरा झालेला आहे. रोजच अशा अनेक घटना घडत आहे जसे की, छेडछाड, बलात्कार, वस्त्रहरण पण कधी एकही पुढे येऊन बोलत नाही. सरकार झोपेचे सोंग घेऊन आहे तर न्यायदेवता ही आंधळी बनलेली आहे. तुम्हाला सांगून ठेवतो जेव्हा सत्ता आमच्या हाती येईल तेव्हा तुम्हाला पडता भुई थोडी होईल.

‘व्यथा स्त्रियांची’ या कवितेत कवी म्हणतो,

“गर्भापासून - खडग्यांपर्यंत

अस्मानीपासून सुलतानीपर्यंत

मुक्त नाही नारी...”

        भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षीय झालीत त्यानिमित्त ‘आजादी का अमृत महोत्सव’ सुरू आहे पण स्त्री ही आजही असुरक्षित नाही. तिला म्हणण्याजोगेच स्वातंत्र्य मिळाले आहे. आजही स्त्रियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ती पुरुषी वर्चस्वाखाली आणखी दबून आहे म्हणून कवी येते म्हणतो की, स्त्रियांना आज हातात तलवार देऊन अशी अमानुष व्यवस्था उध्वस्त करण्यास सांगत आहे.

याबरोबरच ‘न्यायदेवता’ या कवितेत कवी म्हणतो,

“हे न्याय देवता,

तू विसरलीस की काय

धर्म, वर्ण, जातिभेद 

श्रीमंती आणि गरिबी

सर्व सोडून

मंदिर – मशिदीच्या

 या देशात

सर्वात जास्त टेकविला जातो

तुझ्या चौकटीवर माथा”

       सदर कवितेमध्ये कवीला सांगायचे आहे की, लोकशाहीमध्ये न्यायदेवतेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे पण आजही न्याय देवता आंधळी झाल्याचे दिसून येते. ती न्याय देवता आज का आंधळी झाली आहे असे कवीला ते विचारायचे आहे.

‘थोडासा गुन्हा करणार’ या कवितेमध्ये कवीला असे म्हणायचे आहे की,

“मी धारदार तळपती तलवार आहे

आर्याच्या सारस्वतांनो

सांगून ठेवतो तुम्हाला

मी थोडासा गुन्हा करणार आहे...

युगांनयुगे छळीले आम्हाला

आमची सहनशिलता

आली तुमच्या कामाला

पुन्हा असाच इतिहास घडवू पाहणाऱ्यांनो

सांगून ठेवतो तुम्हाला....

वर्णभेद, धर्मवेडे पिपासू

व्यास, वाल्मीकाचे वारसदार तुम्ही

स्त्रियांना छळणारे,

अज्ञान अंधश्रद्धा पसरू पाहणाऱ्यांनो

सांगून ठेवतो तुम्हाला...”

       कवीला येते असे नमूद करायचे आहे की, द्रविड, आर्यांनी आम्हाला खूप त्रास दिला म्हणून तुम्ही आम्हाला अनेक युगापासून छळत आहात. आमच्या शांत स्वभावाचा फायदा तुम्ही घेऊन आम्हाला तुम्ही खूप छेडलात पण आमचा जुना हा इतिहास विसरू  नका. आम्ही पेटून उठलो तर तुम्हाला पळताभूई थोडी होईल, तुम्ही जात, धर्मावर चालत आहात. स्त्रियांना छळले, समाजात अंधश्रद्धा पसरविले, जाती जातीमध्ये नशेच्या गोळ्या पेरलेत, जाती जातीत  विष पेरलेले आहेत.

       एकंदरीत कवी डॉ. हेमंत सोनकांबळे यांचा कवितासंग्रह हा जातीअंताच्या लढाईने मानवी जीवनाला स्पर्श करणारा असून त्या कवितासंग्रहात वैचारिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये साहित्यांनी प्रगती साधता येते, या विचाराची पेरणी तथा प्रबोधन करणारे प्रा. ज.वी. पवार यांची प्रस्तावना असून या काव्यसंग्रहाची पाठराखण करणारे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील प्रसिद्ध कवी डॉ. पी. विठ्ठल सरांची आहे. शब्दवेध बुक हाऊस औरंगाबाद यांनी ते प्रकाशित केलेले आहे. तरी डॉ. हेमंत सोनकांबळे यांच्या हातून असेच साहित्य निर्मितीस सतत प्रेरणा मिळो हीच सदिच्छा... !


समिक्षण :

प्राचार्य डॉ.राजू मोतेराव

मो.नं. 9552744358

प्रज्ञा प्रतिष्ठान अध्यापक महाविद्यालय, नांदेड

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)