आनंद पुपलवाड हे नाव आता साहित्य प्रांतात बरेच स्थिर झाले आहे.'कोरडे रान' कवितासंग्रह आणि 'पांडाळ' या पहिल्याच कथासंग्रहाने या लेखकानं वाचकांच्या अपेक्षा उंचावल्या.या कथासंग्रहाला नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा बाबुराव बागुल कथा पुरस्कार,खानदेश कन्या स्मिता पाटील स्मृती पुरस्कार तसेच इतरही अनेक पुरस्कार मिळाले.पुरस्कारामुळे आपण प्रतिथयश वगैरे होतो हे माणणा-यांपैकी हा लेखक नसल्यामुळे या लेखकाची गुणवत्ता गडबडली नाही.उलट अधिक जबाबदारीनं तो लिहित राहिला.
आनंद पुपलवाड या लेखकाचा'सुंदर जग 'हा बाल कविता संग्रह नांदेडच्या इसाप प्रकाशनाने नुकताच प्रकाशित केलेला आहे.बालकांसाठी लेखन करणे हे एक प्रकारचे आव्हान असते.ज्या काळात बालकवींसारखे कवी बालकविता लिहित होते त्या काळाचे जगणे-वागणे,रीती-भाती वेगळ्या होत्या.मूठभर धान्य हातात घेऊन चिमण्यांची वाट पाहणारी आई होती,गायी गुरांसाठी गवताचा भारा डोक्यावर घेऊन येणारे वडील होते, दिवाळीच्या सणाला मामाच्या अंगणात न मावणारा आनंद होता, हिवाळ्यात ओसंडून वाहणारे नदी-नाले होते,आजीमायने तयार केलेली कपड्यांची बाहुली होती,आणखी ब-याचशा गोष्टी होत्या .एका अर्थाने बालकांचे भावविश्व मोठे समृद्ध होते.या भावविश्वाचे पुसटसे अवशेष आजच्या बालसाहित्यात जरूर दिसतात.परंतु त्यावर तंत्रज्ञान युगातील बालकांची भूक भागेलच असे नाही.काळ कोणताही असो बालकांच्या भावभावना आणि विचार विकसनाचे टप्पे यात फारसा फरक पडत नसतो हे ही तेवढेच खरे.स्वप्नरंजन आणि जिज्ञासा या गोष्टींचे बालकांना पराकोटीचे आकर्षक असते.हे लक्षात घेऊन अर्थात बालमानसशास्राची जोड देऊन बालसाहित्याची निर्मिती झाली तर ती जरूर लक्षणीय स्वरुपाची ठरू शकते.
आनंद पुपलवाड यांना या गोष्टीचे भान आहे.जगात कुरूपता नक्कीच आहे.निरंतर नकार द्याव्यात अशा असंख्य जागा आहेत.परंतु या जागा म्हणजे जगण्याचा थांबा नाहीत.परिसीमा नसलेल्या सुंदर जागांच्या शोधात हा कवी सतत दिसतो.या जागांचे जग जेव्हा त्याला गवसते तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरत नाही.
'किती सुंदर हे जग
सुंदर ही शेती
जगण्यासाठी शेतकरी
पिकं पिकवती '
शेतीमातीत राबणारा कास्तकार हा कवीचा आस्था विषय आहे.शेती धनधान्य देते हा संस्कार बालकांवर झाला तर माती आणि नाती यांचे मोल लेकरांना कळू शकेल,असे कवीला वाटते.जंगलातील झाडे जशी शिस्तीत उभी असतात तशीच शिस्त आपल्या जगण्या-वागण्यात यावी हे सांगण्यासाठी
'जंगलात उभी
झाडे जशी
आमची पंगत
बसली तशी'
अशा ओळी या कवितेत सहज येतात.
बालकांची निरीक्षण शक्ती विलक्षण असते.त्यांच्या निरीक्षणात गमतीजमतीचा भागही बराचसा असतो.
शाळेतील पहिला दिवस हा आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस असतो.वर्गात शिकवायला आलेल्या लठ्ठ बाईंच्या छडीचा मार दीर्घकाळ लक्षात राहील असाच असतो,हे कवीने मोठ्या मार्मिकपणे एका कवितेतून सांगितले आहे..केवळ पुस्तक आणि पाटी यातूनच मुलांना शिक्षणाचे धडे देता येतात असेही नाही.मुलांना हळूवारपणे समजून घ्यावे लागते.नाचण्याबागडण्यातील आनंदाचा ठेवा मुलांना हवाहवासा असतो.त्यातून मुलांचे भावविश्व फुलत असते.अभ्यास एके अभ्यास या गोष्टीचा जेव्हा त्यांना कंटाळा येतो,तेव्हा
'आज नको मास्तर
आज नको तास
चला रे चला
खेळू दिलखुलास 'अशा ओळी आपोआपच ओठावर येतात .
बागेत बागडताना रंगीबेरंगी फुलपाखरांकडे लक्ष न गेले तरच नवल.या फुलपाखरांसारखेच आपणही स्वैर जगावे असे बालकांना वाटते.फुलपाखरांचे वृत्ती विशेष आपल्यात यावेत असे वाटते.नदी जशी सतत प्रवाहित राहाते , पाण्यासोबत घाण-कचरा वाहून नेत जलचरांना आपल्यात सामावून घेते.तसे गतिमान जीवन जगण्याची असोशी माणसाला असते.बालकांचे जीवन खूप निरागस असते.चांगले काय आणि वाईट काय याची पारख करण्यासाठी लागणारी बुध्दीची तरबेजता या वयात फारशी नसते.तरीही आपल्या परीने गणित लावण्याचा,तर्क करण्याचा विलक्षण आटापिटा ते करीत असतात.यातही भारी मौज असते.अशा जागा जेव्हा कवीच्या नजरेत येतात तेव्हा,
'एवढुशी मुंगी
आम्हा शिकविते
हिंमत कधीच
हारायची नसते'
बालमनावर नेमके संस्कार करणा-या अशा ओळी कवी सहज लिहून जातो.पाळीव प्राण्यांपासून कशाकशाचा बोध घ्यावा हे या कवितेतून कवी अत्यंत हळूवारपणे सांगत जातो.
'अंगणात एकदा
गाय आली
बाळाला दूध
देऊन गेली'
महानगरातील मुलांना दूध कोण देते या साध्या प्रश्नाचं नेमकं उत्तर देता येत नाही.त्यांच्यासाठी कवी आनंद पुपलवाड यांची कविता खूपच बोधप्रद ठरू शकते.ग्राम संस्कृतीपासून दूर गेलेल्या किंवा ही संस्कृतीच विसरलेल्या पिढीला संस्कारक्षम करण्याची आणि नव्या जगाशी जोडण्याची कवीची मनिषा या कवितेत जागोजाग दिसते.
'चला मुलांनो चला
कम्प्युटर शिकू या
कम्प्युटर शिकुनिया
जगाची माहिती
घेऊ या.'
जगाकडे स्वच्छपणे पाहून ते किती सुंदर आहे याची प्रतीती घेण्यातला आनंद अवर्णनीय स्वरुपाचा असतो हे कवीने पुनः पुन्हा सांगितले आहे.बालकांसाठी ही आनंदगाणी आहेत.निसर्गाशी जवळीकता साधणा-या आणि सुंदरतेचा ध्यास घेणा-या या बालकविता बालवाचकांना जरूर आवडतील असे बालकवी एकनाथ आव्हाड यांनी पाठराखण करताना म्हटले आहे.सरळ,साधी,सोपी भाषा आणि लयीचा लेहजा यामुळे या बालकविता गुगुणत राहाव्यात अशा झालेल्या आहेत.लक्षवेधी मुखपृष्ठ आणि प्रत्येक पानावरील बोलकी रेखाचित्रे यामुळे कवितासंग्रह उठावदार झाला आहे.याचे श्रेय युवा चित्रकार राजीव पुपलवाड यांच्या कडे जाते.बालसाहित्य विश्वात मोलाची भर घालणारा 'सुंदर जग' हा कवितासंग्रह निश्चितच वाचकांच्या पसंतीस उतरेल याविषयी शंका नाही.
- जगदीश कदम
सुंदर जग
आनंद पुपलवाड
इसाप प्रकाशन, नांदेड
पृष्ठे-३२ मूल्य-रूपये ६०
संपर्क -94236 15307
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .