संविधानिक मूल्यांची रूजवणूक शालेय शिक्षणातून करावी

शालेयवृत्त सेवा
0

 



मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे ) :

शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबईच्या वतीने शालेय शिक्षण आणि भारतीय संविधान या विषयावर शनिवार दिनांक आठ जुलै २०२३ रोजी शिक्षण कट्टा आयोजित करण्यात आला होता.या कट्ट्याला मार्गदर्शक म्हणून संविधान अभ्यासक ॲड. निलेश खानविलकर उपस्थित होते. त्यांनी मार्गदर्शन करीत असताना संविधानातील मूल्ये कशा रीतीने शालेय अभ्यासक्रमातून मुलांवर प्रतिबिंबित करता येतील, याचे विवेचन केले. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, प्रेमभाव, वैज्ञानिक दृष्टिकोन, पर्यावरणीय संवेदनशीलता आदी मूल्यांची रुजवणूक मुलांच्या मनात कशी करता येते हे सोदाहरण स्पष्ट केले.

स्वागत आणि परिचय यशवंतराव चव्हाण सेंटरचे शिक्षण विभाग प्रमुख योगेश कुदळे यांनी केले. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने शिक्षण विकास मंचामार्फत कोणते कार्य सुरू आहे, याचा परिचय करून देताना शरद पवार इन्स्पायर फेलोशीप इन एज्युकेशन, राज्यस्तरीय वार्षिक शिक्षण परिषद, गुणवंत शिक्षक पुरस्कार, कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार, जिल्हा स्तरावरील शिक्षण कट्टे, शिक्षक साहित्य संमेलन, व्हाट्सअप समूह, फेसबुक समूह आदींचा परिचय उपस्थितांना करून दिला.

शिक्षण विकास मंचचे मुख्य समन्वयक डाॅ.माधव सूर्यवंशी यांनी शिक्षण कट्ट्याची सुरुवात, तेथे होणाऱ्या चर्चेचे स्वरूप, त्याचे महत्त्व आदी प्रतिपादन करून शिक्षण कट्टा कधी सुरू झाला हे सांगितले. शिक्षण कट्ट्यांतील चर्चेचे काही औपचारिक तर काही अनौपचारिक स्वरूप  उपस्थितांना अवगत करून देऊन, *शालेय शिक्षण आणि भारतीय संविधान* या विषयावर कशा प्रकारची चर्चा अपेक्षित आहे, याची जाणीव करून दिली. यापुढे वर्षभर हाच विषय घेऊन राज्यभर कार्यक्रम राबविणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शिवाय 26 नोव्हेंबर 2023 रोजी होणारी राज्यस्तरीय शिक्षण परिषद याच विषयावर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

शिक्षण कट्ट्याला उपस्थित असणाऱ्या शिक्षकांनी त्यांच्या शाळेत कोणकोणते उपक्रम राबविले जातात. याची माहिती उपस्थितांना दिली. विविध सण-उत्सवांतून सर्वधर्मसमभाव, सामूहिक जबाबदारी, शालेय निवडणूकातून लोकशाही तत्त्व, नेतृत्वविकास, वर्गांचे/शाळेचे मंत्रीमंडळ, समन्यायी तत्त्व, समता,  उद्देशिका वाचन आदी उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. 

शिक्षण कट्टयावरील चर्चेचा समारोप करीत असताना शिक्षण विकास मंचच्या मुख्य सल्लागार बसंती राॅय यांनी संविधान विषयक मूल्यांच्या रुजवणूकीचे शाळेतील वास्तव काय आहे ? या चर्चेचा आग्रह धरला. शिक्षकांना संविधान विषयक मूल्यांचे प्रशिक्षण देण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली. अधिक डोळसपणे संविधानिक मूल्यांकडे पाहून जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांमध्ये ती मूल्ये कशी रूजतील असे कृतियुक्त उपक्रम राबविण्याची गरज प्रतिपादन केली. शिक्षण विकास मंच कोअर टीमचे सदस्य अजित तिजोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)