जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्यांनी केली नैसर्गिक रंगांची उधळण..

शालेयवृत्त सेवा
0

 




नांदेड  ( शालेय वृत्तसेवा ) :
दरवर्षी धुलीवंदनाच्या दिवशी रंगधुळवड मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. मागील दोन वर्षांत देशभरात कोरोना विषाणूची दहशत असल्यामुळे रंगधुळवडीचा रंगोत्सव साध्या पद्धतीने  साजरा करण्यात आला होता. आता तशी परिस्थिती नसली तरी धुलीवंदनाचा सण नैसर्गिक रंगाचा वापर करून साजरा केला  पाहिजे असे साकडे सर्व ज्येष्ठ मंडळींना लिटल् मास्टर्स अवेरनेस पॅनेलने घातले आहे. रंगांना मानवी जीवनात खूप महत्त्व असले तरी धुलीवंदनाच्या दिवशी रसायनयुक्त रंगांचा वापर आरोग्यासाठी घातक असून रंगधुळ खेळण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर करावा, असे आवाहनही जवळा देशमुख येथील प्रा. शाळेच्या चिमुकल्यांनी केले आहे. त्याचबरोबर पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन कमीत कमी वापर करण्यात यावा असे आवाहनही करण्यात येत आहे.

               सोशल मीडियावरुनही हे आवाहन करताना होळी करायचीच असेल तर वाईट गुण, प्रवृत्ती, चालीरीती यांची करावी तसेच उन्हाळ्याची पार्श्वभूमी लक्षात घेता पाण्याचा अतिवापर टाळून  कोरड्या व नैसर्गिक रंगांचा वापर करावा आणि धुळवड साजरी करावी असे म्हटले आहे. उच्च प्राथमिक व माध्यमिक विभागातील माजी विद्यार्थ्यांनी एक पॅनल तयार केले आहे. त्यातून ते पर्यावरणपुरक होळी साजरी करण्याबाबत आणि रंगधुळीच्या माध्यमातून सामाजिक एकतेचा संदेश देत आहेत. या पॅनलमध्ये मुख्याध्यापक ढवळे जी, एस., विषय शिक्षक संतोष अंबुलगेकर,  सहशिक्षक संतोष घटकार, मंचक शिखरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध जातीधर्माची मुले सहभागी झालेली आहेत.

             नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी आठवडाभरापासून ही मुले कार्यरत असून पळसफुले, काश्मिरी, रक्तचंदन, टोमॅटो, गाजर यांच्यापासून लाल रंग, झेंडूची व बाभळीची फुले, हळद, मैदा यांच्या पासून पिवळा, कोथिंबीर, पालक-कडुनिंब यांच्या पानांपासून हिरवा, बीटापासून गुलाबी, डाळिंबाच्या सालीपासून नारंगी,  मेेंंदी, आवळ्यापासून काळा, चहा कॉफी निलगिरीची साल यापासून चाॅॅकलेेटी असे विविध प्रकारच्या वनस्पतींची पाने, फुले, फळे यांचा वापर करून नैसर्गिक रंग तयार करता येतात. रासायनिक रंगांमुळे  त्वचेवर पांढरे डाग पडणे, डोळे जळजळ करणे किंवा डोळा निकामी होणे, केस गळणे,कानात रंग गेला तर कानाच्या पडद्याला इजा होण्याची शक्यता असते. चुकून पोटात रंग गेल्यास अपचनाचे वा विविध प्रकारचे पोटाचे आजार संभवतात. असे घातक दुष्परिणाम टाळण्यासाठी धुळवड खेळतांना नैसर्गिक रंगांचाच वापर करावा असे आवाहन पॅनलच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)