"शोषणाविरोधात लढणारी विद्रोही कविता : 'सालं अतीच झालं ' " -अरुण विघ्ने

शालेयवृत्त सेवा
0




"मी मागणार नाही

मांडणार नाही गा-हाणे

भांडणार नाही हक्क मागायला

आश्वासणावर जगणार नाही

फासावर चढणार नाही

रडणार नाही,लढणार आहे

तुमचे सनातनी बुरखे फाडणार आहे."

(सालं अतीच झालं)


ज्यांना हळद,भुईमुगाची शेंग खाली लागते की वर? हे माहीत नाही. तो एसीत बसून शेतीचे वार्षीक नियोजन ठरवितो. आणि पोशिंदा राबराब राबतो तरी त्याच्या दोन संजीची सोयही लागत नाही . सालं हे तर अतीच झालं . बंद केलं आता तुमच्यासाठी पिकवणं . तुम्ही दगड,सिमेंट, गिट्टी, रेती खा,पेट्रोल,डिझेल,तेल प्या,कोळसा-माती खा,जनतेचं सपन खा,सैनिकाचं कफन खा, शेतक-यांचा चेक खा. आता देणं-घेणं बंद ! पुढची लढाई मताची

आम्ही आता सज्ज आहोत, निवडणुकीच्या मैदानात. " 


      असं काहीसं उद्वेगानं, सतर्क होत , आता आपली लढाई निवडणुकीच्या मैदानातच, असा निर्वानीचा इशारा देत राज्यकर्त्यांना ठणकाऊन सांगणारा विद्रोही कवी खेमराज भोयर यांचा पहिलाच कवितासंग्रह  'सालं अतीच झालं' नुकताच प्रकाशीत झालेला आहे. त्यामधीलच हे त्यांचे शब्द. नागपूर येथील विद्रोही कवी म्हणून सर्वांना परिचीत असलेले खेमराज भोयर हे आंबेडकरी साहित्त्यातील एक महत्वाचं नाव आहे. मनातील भाव भावनांचं प्रकटीकरण करण्याचं साधन म्हणजे साहित्य. मग त्यात कविताही आलीच . कवी हा कामानिमित्त सतत सर्वत्र भ्रमंती करीत असतो. त्याला अवती भोवती जे जे दिसलं, आकलन झालं ,अनुभवलं,बघितलं त्यावरून देशातील विशिष्ट घटकांतील लोकांचं जीणं किती भयंकर आहे. याची जाणीव झाल्याने, त्याच्या मनातील उद्रेख त्याने आपल्या शब्दात मांडला आहे . कवी सामाजीक जाणीवेतून  व्यक्त होत जातो. तो लढाऊ बाण्याचा कार्यकर्ता आहे. तो फुले,शाहू, आंबेडकरी विचारांचा वाहक आहे. त्यामुळे तो संघर्षशील स्वभावाचा आहे. बालपणापासूनच त्याची नाळ गावाच्या मातीशी जुडली असल्याने जे बघतो त्यावर तो नेहमी बेधडकपणे व्यक्त होत असतो . त्याला जणू अन्यायाची चीड असावी. तो प्रसंगी पेटून उठतो. सजगता,पेटूण उठणे,प्रश्न पडणे हे तसं कवी,लेखकांचं जिवंतपणाचं लक्षण आहे.

      तो समाजातील काही दोगल्या विचारसरणीच्या लोकांपासून इतरांना सावध राहण्याचा इशारा देताना दिसतो. 


" सावध व्हा! आता तरी

हुरळून जाऊ नका

अशा ढोंगी भक्तांना

भाव देऊ नका !"

(गाफील)


 समाजात वावरताना आपल्याला अनेक संधीसाधू लोक भेटतात. बोर देऊन आवळा काढण्याच्या उद्देशाने वागणा-या लोकांपासून  सामान्य माणसाने गाफील न राहता ,सावध व्हायला पाहिजे असे सुचवितो. भोयर यांची कविता त्यांच्यासारखीच वैचारीकदृष्ट्या डोळस दिसते.

तसेच कवी कष्टकरी, शोषित, पिडीत ,शेतकरी, लोकांबरोबरच आदिवाशी समाजातील लोकांच्या बाबतीतही आपले सुक्ष्म निरीक्षण मांडतो.

" तुझा रेला, तुझे गोटुल,तुझी शिकार, तुझे उघडे-नागडे जगणे,तुझी अगणित वर्षांची संस्कृती पायदळी तुडविण्यास निघाले संस्कृतीचे ठेकेदार !" समाजातील अशा ठेकेदार प्रवृत्तीच्या लोकांवर प्रहार करीत , भोळ्या भाबळ्या लोकानांही सजगतेचा इशारा देतांना दिसतो . तो अन्याय,अत्याचार करणा-या लोकांविषयी व  मुग गिळून बसणा-या लोकांविषयीही पोटतिडकीने व्यक्त होतांना म्हणतो...


" थरथरणा-या ओठांना उघडता येत नाही

व्यवस्थेशी जरासे का झगडता येत नाही ?"


आपण आता अन्याविरोधात  बोलायला शिकलं पाहिजे. गप्प राहून आमचे प्रश्न कुणी सोडविणार नाहीत. संविधानाने हक्क दिलेले आहेत. त्या अधिकाराचा वापर करून आपण न्याय खेचून आणला पाहिजे. तरच या लोकशाहीचा, स्वातंत्र्याचा, संविधानाचा सन्मान होईल. 


"दिले संविधान भीमाने,तो कोरा चेक होता

किती घ्यायचे तुम्ही ठरवा,इरादा नेक होता !"


आम्हाला कितीतरी दिवस व्यवस्थेने गुलाम बणवून ठेवले होते. पण आज बाबासाहेबांच्या संविधानामुळे आपल्याला मुक्तपणे जगण्याची नामी संधी चालून आलेली आहे. आपल्याला स्वहितरक्षणासाठी, हक्कासाठी त्याचा उपयोग घेता आला  पाहिजे. आम्हाला समान मतदानाचा हक्क दिला आहे. त्याचा उपयोग विवेकबुद्धीने करून आपले प्रतिनिधी संसदेत,विधीमंडळात पाठविले पाहिजे . जेणेकरून ते आमच्या प्रश्नाविषयीचा लढा लढतील. अशी त्याला आशा वाटते . पण त्यासाठी आमचे आंदोलन ,चळवळ,मोर्चा,मागणी योग्य दिशेने व्हायला पाहिजे. मोर्च्याची दिशा वळविणारे अनेक महाभाग चौकाचौकात टपून बसलेले असतात. अनेक भोळ्या भाबळ्या लोकांना आपल्या हितासाठी वापरणारे लोक समाजात आपल्याच अवतीभोवती,आपल्यातच वावरत असतात. त्यांच्या कोल्हेकुईला बळी न पडता, डोळसपणे आपली दिशा आपण ठरवायची असते . असे त्याला वाटते. समाजात खेकडा प्रवृत्तीही मोठ्या प्रमाणात बळावलेली दिसून येते, पुढे जाणा-यांचे पाय ओढणारे भरपूर असतात.म्हणून कवी म्हणतो....


"पाय आपलेच ओढतो आम्ही

दुश्मन मोकाट सोडतो आम्ही !"


           आपण ख-या गुन्हेगाराला सोडण्याची गफलत करता कामा नये . योग्य निर्णयशक्ती आमच्यात असली पाहिजे. ती शिक्षणाने येईल . त्यासाठी शिक्षण घेणे गरजेचे आहे . बाबासाहेब म्हणतात..."शिक्षण हे वाघीनीचे दूध आहे, जो ते प्राषण करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही." शिक्षणाने माणूस विवेकवादी होतो? सूज्ञ होतो,निर्णयशक्ती येथे, कायद्याची,नियमांची जाण होते, तो समोरच्याला प्रश्न विचारतो. डोळे लाऊन अंगठा वा सही करणार नाही. आपल्याला कुणी अज्ञानी म्हणून फसविणार नाही, याची काळजी आपणच घेतली पाहिजे. कारण समाजात दलालांच्या अनेक फौजा तैनात आहेत. ते केव्हा कुणाची शिकार करतील सांगता येत नाही. असेही त्याला वाटते.

ही चेतना त्याचेकडे महापुरुषांच्या विचारातून आली असावी. त्याची दृष्टी शोधक आहे.

"दलालांची फौज सारी,भोगतेया मौज इथं

मेंढराचा भाव आम्हा,कापतिया रोज इथं !"


शेतक-यांच्या सद्यस्थितीला या दलालांच्या, व्यापा-यांच्या फौजाच कारणीभूत आहेत. जेव्हा शेतक-यांचा माल  बाजारात जातो तेव्हा मालक आपल्या मालाचा भाव न ठरविता ते व्यापारी,दलाल ठरवित असतात. शेतकरी मात्र जो दिला तो घेऊन मुकाट्याने घराकडे येतो. नंतर आमचाच माल ते आम्हालाच दाम दुप्पटीने विकतात. ही शुद्ध फसवणूक,लुबाडणुक चाललेली असताना आम्ही मात्र गप्प का बसावं ? असा प्रश्नही कविला पडतो.


"महागाईच्या सरणावर मांडतात आमची प्रेते

आग लावतात भांडवलदार अन् बघतात आमचे नेते !"


आम्हीच निवडूण दिलेले काही लोकप्रतिनिधीही खुर्चीला खिळे ठोकल्यागत एखाद्या विचारसरणीला चिकटून बसतात. ज्वलंत प्रश्नाविषयी कधी कधी ब्र सुद्धा काढीत नाहीत. मालाच्या हमी भावातून शेतीचा लागवड खर्चही निघत नाही. हे वास्तव आहे. आम्ही बुद्ध, शाहू ,फुले, आंबेडकरांचे अनुयायी आहोत. आम्ही सत्याच्या मार्गावर चालणारे लोक आहोत. याचा अर्थ आम्ही मध्यम मार्ग स्विकारला आहे. पण हातावर हात व तोंडावर हात धरून बसणार नाहीत. आम्ही लढत राहणार आहे, असे कवी सांगतो .

"संवाद टाळतो, वाद टाळतो मी

बुद्धाचा मध्यम मार्ग पाळतो मी


"लुटती सारेच तुला,काय दोष देऊ

सत्यासाठीच हा उभा देह जाळतो मी!"


बुद्धाचा धम्म हा सत्य,अहिंसा,करुणा,प्रेम , माणुसकी, आणि मैत्रीची शिकवण देणारा मानव कल्याणाचा, दु:खमुक्तीचा मार्ग आहे. कर्म सिद्धांतावर आधारीत वैज्ञानीक विचारसरणीचा धम्म आहे . या विचाराची चुनूक आमच्या वागण्यातून दिसली पाहिजे. एक आदर्श जिवनपद्धती आम्ही जगासमोर ठेवली पाहिजे.  आमचं स्वतंत्र अस्तित्व आमच्या आचरणातून अधोरेखीत झालं पाहिजे. आम्ही दैववाद व अंधश्रद्धेच्या आहारी न जाता डोळसपणे जीवन जगणं बुद्धाला व बाबासाहेबांना अभिप्रेत होतं. हे ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे . जिवन जगत असताना आम्हाला सत्य-असत्य यातील फरक ओळखता आला पाहिजे. आमची कवठी ही मेंदू असलेली असली पाहिजे. जर विवेकबुद्धी आमचेकडे असेल तर तिचा वापर आम्हाला करता आला पाहिजे. तरच आम्ही आमचं कल्याण करू शकतो. 'अत्त दीप भवं' याप्रमाणे आम्ही स्वत: स्वत:च्या आयुष्याचे शिल्पकार, प्रकाश झालं पाहिजे. आम्ही स्वयंप्रकाशीत झालं पाहिजे . आम्हीच आमच्या हक्कासाठी लढलं पाहिजे. आमच्या मदतीला कुणीही धावून येणार नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. या दिशेने भोयर यांची कविता जातांना दिसते.


"काल माझ्या स्वप्नात

शिवाजी येऊन भेटले

बाहेरून बाहेरून शांत होते

आतून होते पेटले !"


छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे लोक कल्याणकारी सुराज्य होतं. पण सद्याची राजकारणाची,समाजकारणाची,अर्थकारणाची,धर्मकारणाची,शिक्षणाची,संस्कृतीची स्थिती  बघितली तर कुणाचाही संताप झाल्याशिवाय राहणार नाही . कवी भोयर यांना यातून शिवाजी महाराजांची राज्यव्यवस्था कशी होती? आणि आजची वर्तमान राज्यव्यवस्था कशी आहे ? हेच  सुचवायचं असावं कदाचित. आजचे राज्यकर्ते महाराजांचं नाव घेऊन राज्य करतात पण त्या मार्गाने जातात का? हा चिंतनाचा विषय आहे. कवीची कविता प्रत्येक विषयातील योग्य-अयोग्यतेचे वर्गीकरण करून योग्य विचार समाजाला देण्याचे काम करतांना दिसते. आम्ही फक्त ओरड करतो. कृती मात्र नगन्य असल्याने त्यांचं फावतं. असंही कविला वाटतं.

" आमची फक्त मॅव मॅव

ते चालतेत डोक्यानं

डावे-उजवे चित करून

बाजी मारली बोक्यानं !"

    आम्ही वैचारीक लढाईसोबतच इतर आघाड्यांवरही लढलो पाहिजे. केवळ एकाच मार्गाने लढा उभारून चालणार नाही. तर सोशल इंजिनीअरींग करून आम्ही आमचं पुढील पाऊल योग्य दिशेने उचलंल पाहिजे. डोक्याला डोक्यानेच, म्हणजेच विचाराने विचाराला मात दिली पाहिजे. रस्त्यावरची लढाई रस्त्यावर लढलो पाहिजे. तरच आम्ही आमची लढाई यशस्वी करू शकू . अन्यथा लढाईचं आऊटपुट काहीच निघणार नाही. लोकशाहीत संविधानानुसार समता, स्वातंत्र्य, बंधुता ,न्याय या मूल्यांना अनुसरून आमची जिवनपद्धती असली पाहिजे.असे कविला वाटते. पण घडतंय मात्र वेगळच . म्हणून कवी व्यवस्थेलाच थेट प्रश्न करताना दिसतो....


" इरसाल प्रस्थापित कारट्यांनो

तुम्हीही त्याच मायच्या

उदरातून जन्मल्या

आणि आम्हीही त्याच मायच्या उदरातून

मग तुम्ही काऊन बेडवर अन्

आम्ही काऊन रोडवर ? "


             कवी म्हणतो माणसा-माणसातील विषमतेचं कारण मला कळलं आहे.कारण काहींचा इतिहासच स्वाभिमान गहाण टाकून काहीतरी पदरात पाडून घेण्याचा आहे.आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा आहे. मात्र आमचा इतिहास हा स्वाभिमानाने, बाणेदारपणे ,प्रामाणिकपणे जिवन जगण्याचा आहे. हा फरक दोन संस्कृतीतील आहे. असली लाळ घोटू विचारसरणी आम्ही कदापिही स्विकारू शकत नाही. असं कवी  व्यवस्थेला ठणकाऊन सांगताना दिसतो . 

   या पुस्तकात विविध काव्य प्रकारातील एकूण ९६ रचना आहेत. यातील प्रत्येक रचनेत कविने समाजातील विभिन्न प्रकारची मानवी प्रकृती आणि मानवी प्रवृत्ती शब्दबद्ध केलेली दिसते. एकूणच कविने वर्तमानातील परिस्थीतीचा व मानवी मनस्थितीचा आढावा घेतलेला दिसतो. सामाजीक प्रश्नांचे कविने सुक्ष्म निरीक्षण, अवलोकन,वाचन,चिंतन,मनन करून  आपल्या कवितेत कुठे विद्रोहीपण ,कुठे सालस, कुठे चिडचिड, कुठे मनातील खदखद, कुठे आक्रोश तर कुठे संयमी शब्दातून समाजमनाची सल अधोरेखीत केलेली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दर्पणात वर्तमान लोकशाहीची आणि शोषिकतेची भयावह प्रतिमा प्रतिबिंबीत करणारी भोयर यांची कविता वाटते. कविने रडत बसण्यापेक्षा लढण्याचा निर्धार केलेला  दिसतो. शोषणविरहीत समाजरचनेसाठी अनेक महापुरुषांनी लढे उभारले,क्रांती केली. ती यशस्वीही झाली . सर्व जाती धर्माचे लोक सुखाने जिवन जगू लागलेत. पण पुन्हा तीच व्यवस्था अलीकडे डोके वर काढताना दिसते. तिच्या डोक्यावर शब्दप्रहार करण्याच्या कार्यात खेमराज भोयर यांची विद्रोही कविता योगदान देताना दिसते. तो हे कार्य करण्यासाठी बुद्ध व बाबासाहेब यांच्या प्रेरणेने व त्यांच्या मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करून मार्ग काढू इच्छितो. त्याच्या विचाराला कृतिशीलतेची जोड आहे. त्याचं हे कार्य त्याची कविता निश्चित पूर्ण करेल, असा विश्वास वाटतो .

   या कवितासंग्रहाला जेष्ठ आंबेडकरी साहित्तिक डाॅ. यशवंत मनोहर सरांची विस्तृत व समर्पक अशी प्रस्तावना लाभली आहे. त्यांच्या मते खेमराज भोयर यांची कविता ही " जळत्या वर्तमानाला पर्याय देणारी कविता आहे." तर पाठराखण करताना कवी लोकनाथ यशवंत म्हणतात.." " 'सांगणे वेगळे नि वागणे वेगळे' ही फसवेगीरी खेमराज भोयर यांच्या निकोप दृष्टीतून सुटत नाही. ते या भंकसगीरीवर सतत प्रहार करतात.आणि त्याच्याच कविता होतात. "

तर सागर सरहद्दी म्हणतात..." आपल्या कष्टाला काही किंमतच नाही. दोन हातांनी केलेल्या कष्टाने दोन सांजीची सोय होत नसेल तर, या ग्रामीण कष्टकरी,शोषित,पिडीतांच्या तोंडून निघणारे रोजचेच शब्द कागदावर मांडून ठेवतो.रात्री कागदावर उतरलेले शब्द ,सकाळी कविता बनून दिसतात ‌."

मुखपृष्ठ श्रीधर अंभोरे यांचे असून हे पुस्तक परीस पब्लीकेशन,पुणे यांनी प्रकाशीत केले आहे. 

कवी खेमराज भोयर यांच्या दमदार काव्य प्रकल्पाने आंबेडकरी साहित्यात मोलाची भर घातल्याबद्दल स्वागत करून पुढील साहित्यनिर्मीतीसाठी त्यांना मंगलकामना देतो.


समिक्षक : अरुण हरिभाऊ विघ्ने

रोहणा,आर्वी,जि.वर्धा

मो.८३२९०८८६४५


◾कवितासंग्रह: सालं अतीच झालं

◾कवि : खेमराज भोयर,नागपूर

◾मो. नं.९८६०६१४४७०

◾प्रकाशन:परीस पब्लिकेशन,पुणे

◾प्रस्तावना : डाॅ. यशवंत मनोहर

◾मुखपृष्ठ : श्रीधर अंभोरे

◾स्वागतमूल्य : २००/-₹

◾पृष्ठसंख्या : १५२

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)