नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
सेवानिवृत्त शिक्षकांनी उपेक्षित वंचित ग्रामीण भागातील शाळाबाह्य आणि अप्रगत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावे असे आवाहन राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ नांदेडे यांनी केले आहे. डॉ नांदेडे लोहा तालुक्यातील किवळा येथील गणपतराव मोरे माध्यमिक शाळेचे शिक्षक देविदास शंकरराव पांडागळे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. पुढे बोलताना माजी शिक्षण संचालक यांनी ग्रामीण भागात वीस टक्के शिक्षकांच्या जागा रिक्त असल्यामुळे अशा शाळांवर आपली अध्यापन सेवा देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
किवळा येथील उपसरपंच केशव पाटील टरके यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला. शिवाजी कपाळे प्राचार्य खुशाल पाटील पांडागळे, जयराम पाटील पांडागले ,संस्थेचे संचालक तथा प्राचार्य गणेशराव पाटील घोरबांड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माध्यमिक शिक्षक देविदास पांडागळे आपल्या तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य गणेशराव घोरबांड यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून प्राचार्य घोरबंड यांनी पांडागळे यांच्या संयमी स्वभावाचे कौतुक केले. त्यांची विद्यार्थ्यांना शिकविण्याची हातोटी कौशल्यपूर्ण असल्याचे सांगून ते विद्यार्थीप्रिय शिक्षक असल्यामुळे त्यांची उणीव शाळेला भासणार असल्याचे सांगितले.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल, श्रीफल, भेट वस्तू देऊन शाळेच्या वतीने देविदास पांडागळे यांना सपत्नीक सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे यांनी आपल्या मिश्किल भाषणात शिक्षकांची मौलिकता विशद केली. सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती सेवानिवृत्त शिक्षक देविदास शंकरराव पांडागले यांनी आपण आयुष्यभर विद्यार्थी हितासाठी अध्यापनकार्य प्रामाणिकपणे केल्याचे विशद करून यापुढेही आजन्म विद्यार्थी हितासाठी कार्य करण्याचा निर्धार केला . याप्रसंगी प्राचार्य खुशाल पाटील पांडागले, जयराम पाटील पांडागले, ग्रामीण बँकेचे निवृत्त व्यवस्थापक सुदर्शन पांडागले यांची समयोचीत भाषणे झाली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रवींद्र पांडागले यांनी केले तर कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन शिवाजी डांगे यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .