१६ एप्रिलला होणार माहूर येथे शिक्षक साहित्य संमेलन; स्वागताध्यक्षपदी गटशिक्षणाधिकारी आर.आर. जाधव यांची निवड

शालेयवृत्त सेवा
0

अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाचे आयोजन



नांदेड ( मिलिंद कंधारे ) : 

माहूर येथे शिक्षकांची नुकतिच एक बैठक धरमवाडी जिल्हा परिषद शाळेत घेण्यात आली. अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ ( महाराष्ट्र ) मराठवाडा विभागाच्यावतीने माहूर येथे शिक्षकांचे साहित्य संमेलन घेण्याचे ठरले असून स्वागताध्यक्षपदी गटशिक्षणाधिकारी  रविंद्र जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

           बैठकीच्या अध्यक्षस्थानी  गटशिक्षणाधिकारी आर.आर. जाधव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष रमेश मुनेश्वर आणि राजेंद्र चारोडे उपस्थित होते. यावेळी मराठवाडा विभागीय सचिवपदी शेषराव पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

      स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनानंतर बैठकीला सुरुवात झाली. साडेतीन शक्तीपीठापैकी एक जागृत शक्तीपीठ असलेल्या श्रीक्षेत्र माहूर येथे शिक्षकांचे साहित्य संमेलनाचे आयोजन एप्रिल महिन्याच्या सोळा तारखेला निश्चित झाले असुन त्यानुषंगाने विविध समित्या गठीत करण्यात आल्या. आयोजना विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी संमेलनाचे निमंत्रक म्हणून राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर यांची तर संयोजक म्हणून एस.एस. पाटील आणि राजेंद्र चारोडे यांची निवड करण्यात आली. संमेलनाचे निवेदन उत्तम कानिंदे करतील अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख तथा कवी-संगितकार मिलिंद कंधारे यांनी दिली. बैठकिचे सुत्रसंचालन अरुण धकाते तर आभार विजय घाटे यांनी केले.



         बैठकीचे सुंदर नियोजन प्रस्तुत शाळेचे मुख्याध्यापक श्याम राठोड यांनी केले. विविध समित्या प्रमुख चित्रकार रणजीत वर्मा, कवी सागर चेक्के, बाबुराव माडगे, भाग्यवान भवरे, संगीतकार भोला सलाम, धनंजय गिऱ्हे,  प्रवीण वाघमारे, गौतम सावंत, रघुवीरसिंह बैस, कवी सुरेशकुमार शेरे, आदि शिक्षक परिश्रम घेत आहेत.

                माहूर तालुक्यात नुकतेच गटशिक्षणाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर रवींद्र जाधव यांनी कलेचा विकास व्हावा,शिक्षकांतील साहित्यिक बाहेर यावा, त्याचबरोबर त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी प्रयत्न चालवले आहेत.स्वतः साहित्यप्रेमी व गुणवत्ताप्रेमी असणाऱ्या रवींद्र जाधव यांनी माहूर व किनवट बरोबर संपूर्ण जिल्ह्यातील साहित्यिक शिक्षकांचा हा एकप्रकारे सन्मान केला आहे असे मत शिक्षकांनी दरम्यान बोलून दाखवले आहे.माहूर येथील हे पहिलेच साहित्य संमेलन भरवून एका नव्या युगाची सुरवात आपण करत आहोत या भावनेने सदर बैठक महत्वाची आहे अशी भावना यातून निर्माण झाली. वेगवेगळ्या मतांनी समृद्ध या बैठकीत या संपूर्ण संमेलनाचे एक सुंदर हस्तलिखित तयार व्हावे आणि त्याचेही प्रकाशन व्हावे या मतासह बैठकीत सहमती झाली. 


शिक्षक सर्वगुण संपन्न असतो त्यांना विचारमंच उपलब्ध करून देण्यासाठी अखिल भारतीय शिक्षक साहित्य मंडळ नेहमी अग्रेसर असते. श्रीक्षेत्र माहुरगड येथे होणाऱ्या एक दिवसीय साहित्य संमेलनात ग्रंथ दिंडी, कथाकथन, कवीसंमेलन, चीत्र प्रदर्शन, अशा भरगच्च कार्यक्रमाचे नियोजन आहे. शिक्षकांच्या साहित्य आणि कलेचे कौतूक व्हावे असा प्रामाणिक उद्देश आहे.

रवींद्र जाधव, गटशिक्षणाधिकारी माहूर



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)