महाज्योती योजनेतून मोफत मिळणार लाभ: भावी डॉक्टर, इंजिनिअर मुलांची सोय
परभणी ( शालेय वृत्तसेवा )
शासनाच्या महाज्योती योजनेअंतर्गत इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहे. यात वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी शिक्षणासाठी महत्त्वाच्या असलेल्या नीट, सीईटी परीक्षासंदर्भात संबंधित विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
शासनाच्या महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत जिल्ह्यातील या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ३१ मार्चपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे. गरजू विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून आगामी काळात संबंधित विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत असून, ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
यासाठी कोणते विद्यार्थी ठरणार पात्र :
या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे. यासह यावर्षी दहावी परीक्षा उत्तीर्ण करून अकरावीसाठी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा ओबीसी, भटक्या जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहे. दहावीत शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी ७०, तर ग्रामीण भागातील आदिवासी, नक्षलवादी भागातील विद्यार्थ्यांना ६० गुण आवश्यक आहेत.
नेट, सीईटीसंबंधी मोफत प्रशिक्षण :
■ स्पर्धेच्या युगामुळे दहावीनंतर बहुताशी विद्यार्थी इंजिनिअरिंग आणि मेडिकल अभ्यासक्रमाला प्रवेश मिळावा, यासाठी प्रारंभीपासूनच तयारी करतात. परंतु, घरची बिकट परिस्थिती असल्यामुळे अनेकांना महागडे कोचिंग क्लासेस लावणे शक्य होत नाही. त्या अनुषंगाने होतकरु आणि गरीब विद्यार्थ्यासाठी या महाज्योती योजनेच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण देण्यात येते. यासह अकरावी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जेईई, नीट आणि सीईटी परीक्षेसंबंधीही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
घरबसल्या करा ऑनलाइन अर्ज या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी ३१ मार्चपर्यंत आपल्या नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे.
प्रशिक्षणासाठी टॅबही मिळणार या ऑनलाइन प्रशिक्षणासाठी संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी मोफत पुस्तके, टॅबलेट आणि दररोज सहा जीबी इंटरनेट डेटा देण्यात येणार आहे. आवश्यक कागदपत्रे योजनेच्या लाभासाठी दहावी उत्तीर्ण गुणपत्रक, अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचे बोनाफाईड, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आवश्यक आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .