३६ वर्षात ६४ वेळा रक्तदान करून गरजूंना २० लिटर पेक्षाही जास्त रक्तदान करणारा उपक्रमशिल शिक्षक चंद्रशेखर पाटील !

शालेयवृत्त सेवा
0


अबब !

३६ वर्षात ६४ वेळा रक्तदान करून गरजूंना २० लिटर पेक्षाही जास्त रक्तदान करणारा देशभक्त , देवदूत माणूस !

सर्व सामान्यांचा यावर विश्वास बसत नसला तरी हे खरे आहे .वय वर्ष 54 असलेले चंद्रशेखर शांताराम पाटील हे सध्या श्री सरस्वती भुवन प्रशाला कुंभार पिंपळगाव तालुका घनसावंगी येथे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहे .मानवाने आजपर्यंत अनेक शोध लावलेले आहेत परंतु रक्त निर्मितीचा शोध अजून तरी लागलेला नाही .रक्त हा मानवाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दुर्मिळ असा घटक आहे.त्याची किंमत अमूल्य आहे .आज रोजी आपण आपल्या देशाचा जरी विचार केला तरी 120 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात एक कोटी २०लाख लिटरच रक्तपुरवठा होतो .

या आकडेवारीवरून रक्तदात्यांची कमतरता सहजच नजरेत भरते .वेळेवर रक्त न मिळाल्यामुळे भारत देशात मृत्यूचे प्रमाण  15 ते 20 टक्के एवढे आहे .एका प्रसिद्ध कवीने" देणाऱ्याने देत जावे ! घेणाऱ्याने घेत जावे !घेता घेता 'देणाऱ्याचे हात ' अर्थात दान देण्याची वृत्ती घ्यावी !"असा उपदेश केला असला तरी देणाऱ्यांपेक्षा घेणाऱ्यांची संख्याच जास्त असल्याचे आपल्या लक्षात येते . 

मात्र देण्याचा दानशूरपणा चंद्रशेखर पाटील यांच्या  रक्तातच असल्याचा प्रत्यय  येतो आहे .देशाची भक्ती करायची असेल तर त्यासाठी रक्तच सांडावे लागतं हा समज 64 पेक्षा जास्त वेळा आपल्या देश बांधवांना रक्त देऊन , त्यांचे प्राण वाचवून चंद्रशेखर पाटील या शिक्षकाने दूर केलेला आहे . केवळ रक्तदान करून हा भला माणूस थांबत नसून क्रीडा सारख्या क्षेत्रांमध्ये ज्ञानदानाचे पवित्र कार्य करून हॉलीबॉल ,बेसबॉल , डॉजबॉल, तलवारबाजी,क्रिकेट ,इन डोअर क्रिकेट , रोप स्कीपिंगआधी क्रीडा प्रकारात अनेक नामवंत खेळाडू घडवून शिक्षक ,प्रशिक्षक , संघटक, पंच अशा चौफेर भूमिका निभावून आपले वेगळे स्थान निर्माण केलेले आहे.

त्यांचे क्रीडा ,सामाजिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन अनेक सामाजिक संस्थांचे राज्यस्तरीय पुरस्कार त्यांच्या नावावर जमा आहेत .आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सर्वसामान्यांना अनेक आजारांचा विळखा बसलेला असताना अशा आजारांना मात्र चंद्रशेखर पाटील  यांनी मात्र कोसो दूर ठेवले असून मरणोत्तर  देह दानाचा संकल्प सुद्धा केलेला आहे .सर्वांनी त्यांचा आदर्श घ्यावा अशा प्रकारचे हे आगळे वेगळे व्यक्तिमत्व ! या व्यक्तिमत्त्वाच्या दानशूर पणाला मानाचा मुजरा आणि निरोगी व दिर्घायुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा !!

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)