युडायस प्लस बाबत महत्वाचा अपडेट

शालेयवृत्त सेवा
0

 



भारत सरकार शिक्षा मंत्रालयाकडून समग्र शिक्षा योजनेच्या प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने देशातील सर्व शाळांची माहिती ऑनलाईन पध्दतीने संगणकीकृत करण्यासाठी राष्ट्रीय सुचना केंद्र भारत सरकार यांच्या सहाय्याने यु-डायस प्लस प्रणाली विकसित केली आहे. यु-डायस प्लस प्रणालीमध्ये संकलित केलेल्या माहितीनुसार समग्र शिक्षा, मिड-डे-मील योजना, शिष्यवृत्ती योजना इ. योजनांकरिता निधी मंजूर करण्यात येतो. 

यु-डायस प्लस प्रणालीमधून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे केंद्र शासनाकडून समग्र शिक्षा योजनेचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रकास, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, राज्यनिहाय शैक्षणिक निर्देशांक (PGI), National Achievement Survey (NAS), School Education Qulity Index (SEQI ) निर्देशांकांची प्रभावीपणे अंमलबजावणी व नियंत्रण करण्याचे नियोजित केले आहे. राज्यातील पूर्व प्राथमिक ते इयत्ता १२वी पर्यंत शिक्षण देणाऱ्या शाळांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमध्ये माहे डिसेंबर, २०२२ पर्यंत टप्प्याटप्प्याने भरण्याकरिता कळविण्यात आले आहे. 


प्रथम टप्प्यामध्ये शाळांची प्रोफाईल व शिक्षकांची सविस्तर माहिती नोंदविण्याकरिता भारत सरकारकडून प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. दि. ०२/०२/२०२३ च्या प्रणालीमधील अहवालानुसार राज्यातील २२० शाळांची प्रोफाईल माहिती भरणे बाकी आहे व ३०९२७ शिक्षकांची माहिती प्रणालीमध्ये अद्यावत करणे बाकी आहे. शाळेतील शिक्षकांची माहिती अंतिम झाल्यानंतर शाळांनी शिक्षकांची माहिती भरून झाल्या असल्याबाबत प्रणालीमधील नोंद करणे आवश्यक आहे. दि. ०३ / ०२ / २०२३ च्या अहवालानुसार ३०६६२ शाळांनी शिक्षकांची माहिती अंतिम केलेली आहे आणि ७८७३१ शाळांमधील शिक्षकांची माहिती अंतिम केली नाही.


दुसऱ्या टप्प्यामध्ये भारत सरकारने विद्यार्थ्यांची सविस्तर माहिती भरण्याकरिता प्रणाली दि. १५/०१/२०२३ ला सुरू केलेली आहे दि. ०२/०२/२०२३ च्या प्रणालीमधील अहवालानुसार राज्यातील २.२० कोटी विद्यार्थ्यांपैकी ४५ लाख विद्यार्थ्यांची माहिती नोंदविण्यात आली आहे. दि. ०२/०२/२०२३ ला भारत सरकारकडून यु-डायस प्लस सन २०२२-२३ मध्ये विद्यार्थ्यांची माहिती नोंदणी करण्याबाबत राज्यांची व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली आहे. 

त्यामध्ये दि. १५/०२/२०२३ पर्यंत शासनाकडून शासकीय व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मोफत सुविधा पाठ्यपुस्तके, गणवेश, RTE प्रवेश, व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती, द्विव्यांग विद्यार्थ्यांची माहिती, द्विव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा केंद्र व राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप, शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती, संगणकीय सुविधा, मोबाईल, टॅबलेट सहाय्यभूत सुविधा, शालेय किचन गार्डन इ. माहिती नोंदविण्याकरिता निर्देश दिलेले आहे. 


विद्यार्थ्यांची माहिती प्रणालीमध्ये नोंदविण्याकरिता अडचणी येत असतील अथवा माहिती भरण्याकरिता अधिक कालावधीची आवश्यकता असल्याबाबत शाळांकडून मूदत वाढ मिळण्याकरिता विनंती केली असेल तर या कार्यालयास लेखी कळविण्यात यावे, जेणे करून भारत सरकारकडे मुदत वाढीसाठी राज्य कार्यालयाकडून विनंती करण्यात येईल.


भारत सरकारकडून प्राप्त झालेल्या सूचनांनुसार कळविण्यात येते की, सन २०२२-२३ या वर्षातील सर्व शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांची माहिती नोंदणी दि. १५/०२/२०२३ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने संगणकीकृत करून पूर्ण होईल याबाबत नियोजन करावे जेणे करून अंतिम अहवाल तयार करणे  सोयीचे होईल तसेच भारत सरकारकडून याबाबत माहे फेब्रुवारी, २०२३ च्या तिसऱ्या आठवड्यामध्ये सर्व राज्यांचा आढावा घेण्यात येणार असल्याचे सूचित केले आहे.


सन २०२३-२४ समग्र शिक्षा योजनेचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक भारत सरकारला दि. ३१/०१/२०२३ रोजी सादर करण्याकरिता कळविले आहे. भारत सरकारकडून वार्षिक नियोजन व अंदाजपत्रकास मंजूर करते वेळेस यु-डायस प्लस २०२३-२४ मध्ये संगणकीकृत करण्यात येणाऱ्या शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांबाबत आढावा घेण्यात येणार आहे, त्याअनुषंगाने आपल्यास्तरावरून यु-डायस प्लसचे काम करणारे जिल्हा, तालुका, केंद्र, शाळा स्तरावरील संबंधितांना वेळेत माहिती सादर करण्याच्या अनुषंगाने आपल्या स्तरावरून आदेशित करावे. यु-डायस प्लस सन २०२२-२३ मध्ये जिल्ह्यातील सर्व शाळांची माहिती अंतिम भरून झाल्यानंतर अंतिम माहितीचे प्रमाणपत्र आपल्या स्वाक्षरीने यु-डायस प्लस प्रणालीवर अपलोड करून संबंधितांना या कार्यालयास पाठविण्याकरिता सूचित करावे.


- राज्य प्रकल्प संचालक,

  ( म.प्रा.शि.प., मुंबई. )

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)